Saturday, October 14, 2017

 

आरोग्य-धाम (खंड पहिला)

“ आरोग्य-धाम “  (खंड पहिला)
अनेक वर्षांपूर्वी एक सुंदर कादंबरी वाचली होती स्व. ताराशंकर बंद्योपाध्याय यांची नि तिचे शीर्षक होते ‘आरोग्य निकेतन’. मी नुकताच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून एका जिल्हा रूग्णालयांत असिस्टंट सर्जन म्हणून रूजूं झालो होतो. आमच्या वयस्कर घरमालकाने हे पुस्तक मला भेट म्हणून दिले आणि याचा तुला निश्चितपणे फायदा होईल असा भरभरून आशीर्वादही दिला. मी ते पुस्तक अनेकवेळा वाचले. व्यावसायीक लाभ मिळाला नसला तरी आदर्श रूग्णसेवा कशी असावी याचा वस्तुपाठ मला निरंतर मिळत गेला हे आता पन्नास वर्षांनी मागे वळून पाहतांना मला प्रकर्षांने जाणवत आहे.
पश्चिम बंगालमधल्या एका दूरच्या खेड्यात ही कहाणी आकार घेते ; काळ मागच्या शतकातील पस्तीस-चाळीस सालचा नि एकंदर वातावरण शान्त, बऱ्यापैकी सुखासीन. मात्र दारिद्र्य देखील पाचवीला पुजलेले . त्यामुळे वर्गसंघर्ष होताच पण दारिद्ऱ्याबरोबर असणारे अज्ञानही अफाट होते. त्यामुळे अंधश्रध्दा चांगलीच फोफावलेली. या आणि अशा अनेक बाबींचा समावेश त्या कादंबरीत पाहायला मिळाला. या पुस्तकासाठी ताराशंकर बंद्योपाध्याय यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार दिला गेला (नि ‘गणदेवता’ या पुस्तकासाठी ‘ज्ञानपीठ’ देखील )
मात्र हे पुस्तक मराठीत उपलब्ध असल्याचे समजूं शकले नाही ; सबब या सुंदर पुस्तकाचा गोषवारा देण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. हे भाषांतर वा रूपांतर नाही, म्हणून शीर्षकात किंचित बदल केला आहे. तथापि, एकूणच कादंबरीचा विषय इतका भावला की मराठी सुहृदांपर्यंत तो पोहोचवावा या तळमळीतून ही दीर्घकथा !

डॉ. प्र. शं. रहाळकर

भूमिका
स्व. ताराशंकर बंद्योपाध्याय यांची ही कादंबरी बंगालमधल्या लाल मातीच्या बीरभूम जिल्ह्यातील एका लहानश्या खेड्यात फुलते. नव्या-जुन्यातला संघर्ष, पारंपरिक उपचार पध्दती आणि पाश्चिमात्य ॲलोपॅथी यांतील विसंवाद, तसेच नवनिर्माणाचे वाहात असलेले वारे यांचा सुरेख समन्वय या निर्मितींत आढळेल.
पारंपरिक आयुर्वेद म्हणजे अक्षरश: जीवनाचा वेद, आयुष्याचा वेद, हा भारतीय तत्वज्ञानाच्या पुनर्जन्माच्या संकल्पना आणि मृत्यूच्या प्रतिष्ठेवर आधारलेला आहे. हिंदूंची धारणा अशी आहे की मृत्यू हा जीवनांत अव्याहतपणे चालणाऱ्या पुनर्निर्मितीचाच एक अविभाज्य भाग आहे, एक दुवा ! मात्र आजचा कोणीही डॉक्टर मृत्यूला एक सहजसुंदर, स्वाभाविक बहिर्गमन मानायला तयार होणार नाही ; झुंज दिल्याशिवाय मृत्युला  सामोरे जाऊं देणे त्याला अनैतिक वाटेल.
नेमका हाच मुद्दा ग्रंथकाराने अतिशय हळुवारपणे माणसाच्या दुर्बलतेवर अधोरेखित केला आहे आणि मृत्यूभय दूर करण्याचा विलक्षण प्रयत्न अतिशय प्रभावी रीतीने मांडला आहे.



ग्रंथारंभ
आरोग्य-धाम किंवा देवीपूरच्या मोशाय (महाशय) कुटुम्बाने तीन पिढ्यांपासून चालवलेला दवाखाना / इस्पितळ  कोणत्याही दृष्टीने खैराती किंवा मोफत कधीच नव्हते. जवळजवळ ऐंशी वर्षांपूर्वी सुरू केलेले हे क्लिनिक आता मोडकळीला आले आहे. चुनामातीच्या भिंतींना तडे गेलेत, शाकारलेल्या छपराचे सांधे खिळखिळे झालेत, जमीनीवर मधोमध खळगा पडलाय - एखाद्या कुबड आलेल्या मानेसारखा ! खरे तर ते केव्हाही कोसळू शकते.
मात्र या वास्तूच्या मालकाचा, म्हणजेच ‘जगत् बंधू कविराज महाशय’ यांचा होरा जरा वेगळा होता ; “जोंवर ही पृथ्वी, चंद्र, सूर्य आहेत तोंवर ही वास्तू टिकेल असे म्हणण्याचा अतिरेक मी करणार नाही, पण जोंवर माझे कुटुंब या गावात राहील तोवर ही वास्तू धडधाकट आणि सुरक्षित राहील” असे ते आपला अंतरंग मित्र ठाकुरदास मिश्रजवळ बोलून दाखवीत. “आणि लक्षात ठेव, ही पोकळ बढाई नाही” असे म्हणताना ते खळखळून हंसत.  दोन्ही हात जोडून कपाळावर अतिशय नम्रपणे टेकवीत ते म्हणत, ‘हा व्यवहार निव्वळ फायद्याचा आहे, जितके तुम्ही द्याल तितके तुम्हाला मिळेल, जसे साजूक लोणकढ्या तूपाचे मोल दिवसागणिक वाढत जाते . खरंतर जगातला हा सर्वात फायदेशीर व्यवसाय होय. दोघांचाही फायदाच – देणारा नि घेणारा ; यांत  कुणाचेच नुकसान असे नाहीच !’
गावच्या पाटलाचा हिशेबनीस असणारा मित्र ठाकुरदास मिश्रा अधिक व्यवहारीक होता ; कठिणातल्या कठीण बेरजा-वजाबाक्यांना तो गडबडत नसे, तसेच कोर्ट-कचेऱ्यांच्या बाबतीतही तो निर्धास्त राहात असे. मात्र तत्त्वज्ञान विषयक कोणताही विषय त्याच्या आवाक्याबाहेर होता. छद्मीपणे हंसत तो उद्गारला,  “जाऊ दे, जाऊ दे ! निव्वळ नाडी पाहून नि कुठल्यातरी बुटीचा काढा देऊन तूं नव्वद टक्के नफा कमवतोस अशी माझी खात्री आहे. पण त्या रूग्णांचे काय ? त्यांना फायदा कसा ? मित्रा जगत्, तूं असे कसे म्हणतोस ? त्या बिचाऱ्यांना तर कर्ज काढून तुझी ‘फी’ देणे भाग पडते ! खरोखर ते आरोग्य नि पैसेही गमावून बसतात !”
‘तू खरंच विचित्र आहेस ‘ जगत् बंधू त्याला मध्येच थांबवत उद्गारले ; ‘पैशांचा व्यवहार नंतरचा ; मी सांगितलेला फायदा पैशांचा नसून आयुष्यातल्या अति मौल्यवान अशा आरोग्याचा आहे. एकाला आरोग्यप्राप्ती नि दुसऱ्याला रूग्णसेवेने मिळणारी ईश्वरकृपा ! आरोग्यप्राप्ती ही माणसाला मिळणारी सर्वोत्तम लाभदायक देणगी आहे हे विसरू नकोस .
महाभारतात एक कथा येते – यक्षरूपात आलेला धर्म युधिष्ठिराला काही प्रश्न विचारतो. त्यातला एक – ‘ सर्वोत्तम फायदा कुठला ?’  युधिष्ठिर उत्तरतो , ‘ आजारातून बरे होणे हा सर्वोत्तम लाभ होय !”
त्यांच्या मित्राला मात्र ते पटले नाही आणि त्याने केवळ स्मित केले ; “असं म्हणतात ना की भाजीपाल्याच्याt टोपलींत दडवलेली  मासळी लपून राहात नाही ; तसंच तुझ्या संस्कृतप्रचुर भाषणातून पैशांचा दर्वळ लपू शकत नाही !” तो आपल्याच विनोदावर मोठ्याने हंसला.
मात्र दुर्दैवाने त्याला काही दिवसांनंतर संधिवाताने जखडले आणि तो तीन महिने पंगू राहिला. त्याच्यावर वयस्क मोशायने उपचार करून खडखडीत बरे केले. बरा झाल्यावर मिश्राने त्याचे आभार मानले आणि ‘ तूं मला जीवनदान दिले आहेस ; तुला गरज पडली तर तुझ्यासाठी मी माझा प्राणसुध्दा देईन !’
‘तर मग, आजारमुक्त होणे हा सर्वोत्तम लाभ आहे असे तूं  मानतोस?’ ‘होय, निश्चितपणें !’ क्षणाचाही उशीर न करतां तो उत्तरला !
दुसऱ्या दिवशी मिश्रा एक ब्रश आणि तेलात बुडवलेला शेंदूर घेऊन क्लिनिकवर आला आणि त्याने भिंतीवर ठळक अक्षरांत लिहिले, “आजारमुक्ती हाच सर्वोत्तम लाभ” !

आताचे आरोग्य-धाम हे नाव तेव्हा रूढ नव्हते ; लोक ‘महाशयांचे घर’ किंवा महाशयांचा दवाखाना असे संबोधत.
हे नांव रूजले दुसऱ्या पिढींत, जेव्हा जगत् बंधु महाशयांचे पुत्र जीवन  महाशय यांनी आपला पुख्तैनी वारसा पुढे चालवायला सुरूवात केली. तोंवर काळ बदलला होता. शहरांमध्ये नवीन बदल घडायला कधीच सुरूवात झाली होती, मात्र खेड्यांमध्ये ते हळूहळू जाणवूं लागले होते. जीवन महाशयांनी क्लीनिकचे “आरोग्य-धाम” असे नामकरण केले आणि एका मोठ्या लाकडी बोर्डवर ठळक काळ्या अक्षरात ते लिहून बाहेरच्या व्हरांड्याच्या दर्शनी भागांत बसवले.  इतरही काही जुजबी बदल त्यांनी केले. पारंपरिक आसन आणि मोठा जाजम अंथरलेला दीवाण तसाच ठेवला मात्र चार-दोन खुर्च्या, एक टेबल नि रूग्णांसाठी बांकडी वाढवली.
डुगडुगणारे ते फर्निचर अजून तसेच आहे, खुर्च्यांच्या हातांशिवाय. मात्र बांकडी अजून तग धरून आहेत !
डळमळणारी इमारत तिच्या नावाच्या पाटीसह आणि तिचा मालक जीवन महाशयांना तुम्ही आजही पाहूं शकाल, काळाशीं झुंज देत ! शहरापासून अदमासें शंभर मैल ब्राडगेज रेल्वेने तुम्हाला प्रवास करावा लागेल. जंक्शनवाल्या स्टेशनपासून एक लहान फाटा तुम्हाला दहा मैलांवरच्या एका सधन खेड्याकडे घेऊन जाईल. या खेड्यात काही मोजक्या टॅक्सी, बसेस, सायकल-रिक्षा आणि बैलगाड्या आढळतील, बदलत्या काळानुरूप.  आरोग्यधाम इथून फार लांब नाही, फक्त एकाध मैल. एवढे अंतर रिक्शा किंवा बैलगाडीने सहज जाण्यासारखे, पण चालत जाणे अधिक सोयीस्कर कारण चालतांना जुने टाकून नवे स्वीकारत असलेले ते निरागस लहानसे गाव आपल्याला जवळून पाहता येईल.
ही लाल मातीची पाऊलवाट  एकेकाळच्या सधन जमीनदारांच्या जुनाट घरांवरून, अस्ताव्यस्त झालेल्या मळ्यांवरून, शेवाळ्याने माखलेल्या मंदिरांवरून, इतस्थता पसरलेल्या कचऱ्याच्या ढिगांजवळून आणि ओसाड माळरानांवर अमाप वाढलेल्या तणांमधून वाट काढत जाते. बाजूला तुटलेल्या पायऱ्या अनेक तळीं नि डबक्यांकडे नेतात. सर्वदूर घाणीचे साम्राज्य दिसेल.  एक अवाढव्य वडाचे झाड लक्ष वेधून घेईल वाळलेल्या फांद्यांचे. त्या वडाच्या बुंध्याभोवती सिमेंटचा पार असेल, जिथे कधीकाळी पूजाअर्चा होई. पायवाट येथे संपते आणि सुरूं होतो एक पक्का खडीचा रस्ता.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूंस काही दुकानें लागतील विविध प्रकारची. हा मुख्य बाजार आहे इथला, कायम गजबजलेला नि गोंगाट असणारा, विलक्षण दर्प असलेला. आताशा हे मार्केट बरेच वाढले आहे. थकल्याभागल्या वाटसरूंसाठी चहा नि खाण्यापिण्याचे पदार्थ मिळण्याची आता चांगली सोय झाली आहे. सर्वोत्तम चहा तुम्हाला नवग्राम मेडिकल स्टोअर च्या शेजारच्या दुकानात मिळेल. हे मेडिकलचे दुकान चटकन नजरेला पडते त्याच्या रंगीबेरंगी पाट्या नि जाहिरातीच्या फलकांमुळें. हे दुकान आणि त्यांतील फर्निचर नवे असल्याने लक्ष वेधून घेईल. पॅंट आणि बुशशर्ट घातलेला नि गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेला डाक्टर हिरेन इथल्या फार्मसीवर देखरेख ठेवतो.
एक फाटा उत्तरेकडे जातो आणि एकावेळी एकच वाहन जावू शकेल इतकीच त्याची रूंदी आहे. इथून पुढे तीनचार फर्लाँग रस्ता दाट झाडे असलेल्या सावलीचा. आंबा, जांभुळ, शिरीष आणि चिंचेची झाडें आहेत  शेजारी मोठी तळीं आहेत, पक्कया पायऱ्या अससणारी.
याच्या पुढे मात्र अतिशय रम्य चित्र तुम्हाला खिळवून ठेवील. हल्लीची प्रगत वास्तुकला दर्शवणारे काही नवीन बंगले दिसतील ; त्यांत कालवा बांधणीवरचे इंजिनियर्स नि वरीष्ठ अधिकारी राहतात. त्या बंगल्यांच्या पलीकडील सुंदर घरांच्या रांगा आहेत. तिथे कनिष्ठ अधिकारी नि इतर सेवकांचा निवास असतो. मधोमध कालव्याचे सुसज्ज कार्यालय आहे. या नवीन कालव्याच्या खोदाई बरोबरच उर्वरित घरांचेही काम जोरात सुरू आहे, गवंडी त्यांच्या कामात मग्न आहेत नि त्यांच्या बायका छतांवर चढून त्यांची मदत करीत आहेत मोठ्याने गाणी गात गात ! हॅट, फुलपॅंट नि जॅकेट  घातलेल्या इंजिनियर्सची लगबग ध्यानात येईल, ते आपापल्या  सायकलींवर फिरत कामांची देखरेख आणि सूचना देतांना आढळतील. पुढची ती नवी इमारत होऊं घातलेल्या हास्पिटलची आहे नि त्याच्याजवळच डाक्टर आणि कम्पाउंडर साठी क्वार्टर्सची देखील सोय होणार आहे. नर्सेस साठी काही मातीची घरें उभारली जातील. या सर्वांहून  थोडे अधिक पुढे मोती या भंग्याची झोपडी आहे.
मात्र या सगळ्यांपासून वेगळी पण हास्पिटलशी निगडीत अशी एक भव्य वास्तू लवकरच आकार घेणार आहे, या प्रदेशासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकणारे नवीन आरोग्य-केन्द्र ! इथे थोडा अधिक वेळ रेंगाळायला तुम्हाला नक्कीच आवडेल कारण इथे भविष्यातील एक दिव्य स्वप्न आकार घेत असल्याचे तुम्हाला जाणवेल. नूतन कालखंड अवतरतोय, नवनवीन कल्पना स्वप्ने आणि आशा-आकांक्षांना टवटवीत करीत !

तथपि, आपण आपल्या मूळच्या उद्दिष्टाला विसरूया नको – जुने आरोग्य-धाम पाहण्याचे !!
तर मग, आपण तब्बल मैलभर पुढे जाऊंया या सुंदर इमारतींच्या पुढे. तो लाल खडीचा रस्ता कणिसांच्या शेतांना वळसा घालीत देवीपूर गावात पोहोचतो. इथेच आहे जुने आरोग्य-धाम.
खरं तर, गरिबी आणि जुनाटपणाचे कढ सोसणारे देवीपूर अजिबात पाहण्यासारखे नाही.  घरांवर सावली धरणारे वृक्ष अतिप्राचीन आहेत, युवकांना प्रफुल्लित करेल अशी सुंदर हरियाली नावालाही नाही ! वाळके बकुळीचे रस्त्यालगत पडलेले खोड सर्वप्रथम नजरेस पडेल. त्याच्याखाली एक भग्न देवस्थान असेल जिकडे आता कोणी ढुंकूनही पहात नाही. सतत ठोकापीटी चालणारे लोहाराचे दुकान जवळच आहे आणि त्याचा प्रतिध्वनी थेट नवीन आरोग्यकेन्द्रापर्यंत ऐकू जातो.
शेतकरी मंडळी या लोहार दुकानाभोवती गर्दी करतात. लाकडाच्या ठिणग्या इतस्तथा उडत राहतात . बांबूच्या वनाभोवती पक्षांचा  किलकिलाट एरव्हीं गुडीगुप असलेल्या वातावरणाला छेद देत असतो.






खूप उंच वाढलेले अर्जुन वृक्ष घारी अन् गिधाडांना आश्रय देतात आणि त्यांचे कर्कश किंचाळणे कानठळ्या बसवते. दुसरीकडे रस्त्यावर चिमण्यांचा चिवचिवाट नि त्यांची आपसांतली भांडणे चित्त विचलीत करत राहतात. मात्र वाटेत एखाद दुसराच इसम भेटेल अन् तो देखील आजारी नि थकलाभागलेला. भेटलेला इसम तुमच्याकडे जरा संशयाने पाहील आणि पुढे गेल्यावर वळूनवळून पाहात राहील. त्याच्या मनांत तुमच्याविषयी प्रश्न येतील , कोण असावा हा नि कुठला ; काय हवे असेल याला ; उजव्या विचारसरणीचा की डाव्या : किंवा मतं मागायला आलेला की कशासाठी  वर्गणी मागणारा ?
पण जुन्या काळी जेव्हा आरोग्यधाम नुकतेच उदयाला आले तेव्हां लोक काही न्यारेच होते. त्यांची कोठारें धान्याने गच्च भरलेली असत ; दूध नि  गूळाची राब मुबलक असे आणि तलावांत खूप मासे ! लोकांना खाण्यापिण्याची ददात नव्हती आणि ते पूर्ण ताकदीने भरपूर कष्ट देखील करीत. ती जातकुळी काही और होती; सशक्त, निरामय नि आनंदी ! वेषभूषेबाबत त्यांचा आग्रह नसे नि जेमतेम गुडघ्यांपर्यंत त्यांचे धोतर पोहोचूं शके. शर्ट किंवा बुटांचा वापर नाहीच. मात्र झपाट्याने चालताना त्यांची उघडी शरीरयष्टी ठळकपणे नजरेत भरत असे.
कधीकाळी एखादा परीटघडीचे कपडे घातलेला शहरी गृहस्थ त्या खेड्यात आलाच तर ही साधीसुधी गावकरी मंडळी त्याला वाकून अभिवादन करीत आणि नम्रपणे पृच्छा करीत, ‘ कुठून येणे केलेत महाराज, काय काम होते देवा ? ‘ आणि जेव्हा आरोग्यधामला भेट द्यायला आल्याचे त्यांना कळे तेव्हा ते उद्गारत, ‘ होय अर्थातच ! तुमच्यासारख्या गृहस्थाने भेट द्यावी अशी आरोग्यधाम ही एकमेव वस्तु या गावांत आहे ! असेच पुढे चालत राहा महोदय, काली मंदीराच्या जरा पुढे किराणा दुकानाच्या डाव्या बाजूला आणि पक्क्या बांधलेल्या विहिरीच्या उजवीकडे तुम्हाला जीवन मोशाय यांचे क्लिनिक ‘आरोग्यधाम’ सापडेल ! ‘ तिथे अनेक बैलगाड्या नि बरीच गर्दीही आढळेल. जा, असेच पुढे जा महाराज.


मात्र आता ही जागा बरीचशी विराण भासेल. इथे कधीकाळी खूप गर्दी होत असे ही कल्पनासुध्दा आता अविश्वसनीय वाटेल. काही मोजके रूग्ण सकाळच्या प्रहरी येवून जातात.  डाक्टर त्यांची नाडी तपासून कागदावर औषध लिहून देतात. औषधांची कपाटें आता रिकामी असतात. त्यांच्यावर भरपूर धूळ साचलेली आहे. कपाटांची दारेंसुध्दा खिळखिळी झालींत. आता येथे औषधें मिळत नाहीत. पेशंट्स केवळ प्रिस्क्रिप्शन घेऊन जातात. उर्वरित दिवसभर चिटपाखरूंही तिथे फिरकत नाही.
दुपारचे वेळी जीवन महाशय तिथे एकटेच बसलेले दिसतील, झावळ्यांचे छत असलेल्या त्यांच्या घरातल्या फरशी अंथरलेल्या सज्जांत. हा सज्जा घराचा संपूर्ण दर्शनी भाग व्यापून आहे. मात्र तिथेही धुळीचे साम्राज्य आहे नि तो सुध्दा मोडकळीला आलेला ; तीन बाजूंची भिंत खचली आहे.
ओलिएंडरची दोन झुडुपं वाऱ्याच्या झोक्याने झुलतात नि त्यांच्या  लालभडक टवटवीत फुलांचे झुपके हिंदोळत राहतात.

जीवन महाशय याच फुलांकडे टक लावून पहात विमनस्क अवस्थेत बसलेले दिसतील. एखाद्या म्हाताऱ्या हत्तीप्रमाणे वृध्द नि अंगभर सुरकुत्या पडलेले . सत्तर वर्षांचे ऊन-पावसाळे पाहिलेले त्यांचे भारीभरकम शरीर मात्र आता बरेच थकले आहे. एकेकाळी अतिशय कणखर  असलेल्या बरगड्या आता वर आल्यात. त्यांचे हात आणि पाय तेव्हा चांगलेच भारी होते. पायांजवळच त्यांचे मोठ्या आकाराचे झिजलेले पायताण आहे. कपडे मळलेले नि ठिगळं लावलेले. मात्र जमेची बाजू म्हणजे त्यांची पांढरीशुभ्र लांब दाढी नि मिशा आणि खूप छाटलेले पांढरे केस !
एका ठेंगण्या लाकडी आसनावर बसून त्या फुलझाडांकडे एकटक पाहात असलेले जीवन महाशय आपल्या विचारांत गुरफटून गेले होते.
त्यांच्या मनांत माणसें नि झाडें यांच्यातील चैतन्याचा विचार तरळून गेला. ती फुलझाडें त्यांच्या वडिलांनी जवळ जवळ साठ वर्षांपूर्वी लावली होतीं, पण त्यांचेवर वार्धक्याच्या कुठल्याही खुणा अजून दिसत नव्हत्या.
एका विलक्षण अपरिचित आवाजामुळे त्यांची तंद्री मोडली ; कुणीतरी मोडक्यातोडक्या शब्दांत बोलत होता. त्यांनी आजूबाजूचा कानोसा घेतला पण कुणीच दृष्टिपथात नव्हते. मग त्यांच्या लक्षात आले की तो आवाज हत्कुरो नावाच्या एका कोळ्याच्या पाळीव पक्षाचा होता (बहुधा काकाकुवा) आणि ते स्वतःशीच हसले. त्या पक्षाने कदाचित कुणा आगंतुकाला पाहून त्याच्या संवईनुसार “ आज मासळी नाही, आज मासळी नाही, आज मासळी नाही” असा नेहमीचा घोषा लावला असावा. हा पक्षी मात्र होता विलक्षण. सर्वच पिंजऱ्यातले पक्षी त्यांना बाहेर सोडल्यावर पुन्हा कधीच आपण होऊन पिंजऱ्यात परत जात नाहीत. मात्र हा पक्षी सकाळी पिंजऱ्याबाहेर काढल्यावर संध्याकाळी पुन्हा न चुकतां पिंजऱ्यात आपण होऊन जाऊन बसत असे. पण कधी पिंजऱ्याचे दारं उघडले नसेल तर पिंजऱ्यावर बसून तो म्हणत राही “ मां, मां , ए म्हाताऱ्या, ए म्हाताऱ्या “ ! नि हा म्हातारा म्हणजे हत्कुरो कोळी, कारण त्याची बायको त्याला याच नावाने बोलवित असे !! त्या पक्षाने तिच्याचकडून हे शब्द उचललेले होते. कदाचित तो पक्षी आत्तां त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करीत असावा, असे जीवन महाशयांना काहीशा आश्चर्याने वाटले. लोक म्हणत की या पक्षाच्या पूर्वपुण्याईमुळेच  त्याला ही विलक्षण देणगी मिळाली आहे. तर काही म्हणत पूर्वजन्मी हा नक्कीच माणूस असला पाहिजे आणि मागील जन्मातील कुठल्यातरी पापामुळे आता पक्षी झाला आहे.

आपली पांढरी दाढी कुरवाळत जीवन महाशयांचे विचारमंथन सुरू झाले जन्म नि पुनर्जन्मांवर. जरा ‘हट् के’ विचार होता हा. खरंच ! कल्पना- —विश्व कसे झपाट्याने बदलत जाते नाही ? ते आपली दाढी कुरवाळत राहिले. अधूनमधून बारीक कापलेल्या डोक्यावरच्या केसांतून हात फिरवीत ; ते टोकदार केस हातांना गुदगुल्या करीत. खरंतर त्यांना तो स्पर्श हवाहवासा वाटे. एकाएकी त्यांना सिताब आठवला. काय झालंय् त्याला?  तो जेव्हा येई तेव्हा वेळ घालवण्यासाठी समोर मांडलेला बुध्दिबळाचा डाव हमखास रंगत असे.
आजचे वातावरण बरेचसे ढगाळ नि पावसाळी आहे नि दुपारी तर एक मोठी सर येऊनही गेलीय. किंचित् अंधारून पण आलंय बाहेर. मात्र सिताबची उघडलेली पांढरी छत्री न दिसण्याइतपत गडद नक्कीच नाही. वयाच्या मानाने जीवन महाशयांची दृष्टी अजून खरंच छान आहे, लांबवर असलेले दृष्य त्यांना सहज दिसते, विशेषत: छत्रीसारखी मोठी वस्तू; अर्थात् सुईंत दोरा ओंवण्याइतपत नाही !
सिताब मुखर्जीची प्रकृतीसुध्दा अजून ठणठणीत आहे. अधूनमधून जीवन महाशय त्याची नाडी तपासतात नि अजून तरी त्याचा अंत निकट आला नसल्याची खातरजमा करून घेतात. अजून घोडदौड चालू राहणार, ते उद्गारतात !
याचे कारण जीवन महाशयांना नाडी परीक्षेवरून मृत्यूची चाहूल कळत असे. ती त्यांना प्राप्त झालेली पारंपरिक विद्या होती, “हेरिडेटरी” !  पारंपरिक वैद्यकी करणाऱ्या कुटुंबात पाश्चात्य वैद्यकी शिकणारे ते पहिलेच होत. मात्र त्यांना पारंपरिक भारतीय वैद्यकीची सुध्दा चांगली जाण होती आणि प्रसंगानुरूप कोणत्या साधनाचा अवलंब करावा याचे तारतम्य देखील त्यांना होते. तथापि त्यांची खासियत होती नाडी परिक्षेच्या बाबतींत. नाडी परीक्षेवरून ते रोगाचे निदान, त्याची व्याप्ती, बरे होण्यासाठीचा कालखंड आणि मृत्यू नजिक आहे किंवा कसे याचा निश्चित होरा सांगूं शकत, केवळ नाडी परिक्षेवरून !!
अशा प्रकारच्या भविष्यवाणीमुळे त्यांचा लौकिक दूरदूरवर पोहोचला होता. तो लौकिक अजूनही अस्तित्वात आहे. आपल्या खूप मोठ्या वैद्यकीय कालखंडांत त्यांनी अनेक वेळा केलेले मृत्यूचे भाकीत खरे ठरत आले आहे.
अनेक चेहेरे नि प्रसंग त्यांच्या नजरेसमोर तरळून गेले. एक चेहरा मात्र बराच वेळ दिसत राहिला एका रूग्णाच्या तरूण बायकोचा, तिचा नवरा लवकरच मरणार आहे असे सांगितल्यानंतरचा. रूग्णाचे नाव होते शशांक,    सुरेन मिश्राचा मुलगा. त्यांना अजून आठवतोय तिचा संतापाने कृध्द झालेला चेहरा नि तिने त्यांना वाहिलेली शिव्यांची लाखोली !

अशा अनेक प्रसंगांना आठवत त्यांनी एक दीर्घ नि:श्वास टाकला.
खूप कठीण, दु:खद नि जीवघेणे आजार तसेच अनेक मृत्यू त्यांनी अगदीं जवळून पाहिले होते. अनेक वेळा त्यांना मृतदेह मागे ठेवून घराबाहेर पडावे लागले होते, त्यांच्या अथक नि शेवटपर्यंत केलेल्या प्रयत्नांना न जुमानतां. कोणत्याही प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असत. मात्र अशा दु:खद प्रसंगी ते स्वतःच्या खोल विचारांत इतके गढून जात की समोरचे ओळखीचे चेहरेदेखील त्यांना दिसेनासे होत. आजार नि उपचार, तसेच मृत्यूबाबत ते सखोल विचारमंथन करीत. बाह्य जगाशीं पूर्ण ताटातूट करीत त्यांचे अंतर्मन वैद्यक शास्त्रातील पुस्तकांची
पानें धुंडाळत राही. दूरवरच्या एकाकी खेड्यात, जिथे कुठल्याही प्रकारच्या जलद वाहतुकीची नेहमीच वानवा असे, अशा त्या खेड्यात शोकाकुल लोकांच्या मधोमध एका मोठ्या वृक्षासारखे ठाण मांडून बसत अविचल, तटस्थ. असं म्हणतात की डाक्टर मंडळी पाषाण-हृदयीं असतात. एका दृष्टीने ते खरेही असेल, कारण त्यांना दुःख नि वेदना पाहायची इतकी  सवय झालेली असते की त्यांच्या भावना सुन्न होऊन ते असंवेदनशील बनतात.

शशांकला जेव्हा जीवघेण्या आजाराने पछाडले तेव्हा सत्य वस्तुस्थिती सांगणे त्यांचे कर्तव्य होते, त्यामुळे सर्वांनाच खूप त्रास झाला असला तरीही आणि त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या बाबतींत ? ते खिन्नपणे हसले. मुलाच्या मृत्यूपूर्वी तीन महिने आधीच त्यांनी ओळखले होते, बायकोला सांगितले होते नि मुलाला सूचकपणे दर्शविले होते, जो स्वतःच डाक्टर होता.
त्यांना आता पश्चात्ताप होतोय त्यांनी तसे सांगितल्याचा. का बरे ते तसे बोलले ? व्यावसायीक अहंकारापोटीं ? मग त्यांना आतां पश्चात्ताप काय म्हणून होतोय् ?  त्या आठवणींनी त्यांना लाजिरवाणे कां वाटतेय् ?

डाक्टरांनी आपली नजर निळ्या आभाळाकडे वळवली. पण डाक्टरांनी खरें ते सांगायलाच हवे ना ? ते परंपरेने बांधलेले आहेत. अर्थात, ते परिस्थितीवर अवलंबून असायला हवे म्हणा .

(क्रमश:


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?