Wednesday, September 27, 2017

 

Internal Environment

“मिल्यू इंठीरियर” (अंतर्गत व्यवस्था) (Internal Environment )

आम्हाला वैद्यकीय शिक्षण घेत असतांना सॅमसन राईटचे एक सुंदर पुस्तक क्रमिक म्हणून होते. त्यातील पहिली दीड पाने शरीरातील अंतर्गत व्यवस्था कशी सांभाळली जाते त्याचे थोडक्यात पण अतिशय बहारदार वर्णन निबंध स्वरूपात केले होते. त्याहीपेक्षा त्यावेळचे प्राध्यापक एम्. एम्. माथुर हा विषय इतक्या रसाळपणे शिकवीत की आम्ही नवशिके ‘वुड बी’ डॉक्टर तल्लीन होत त्यांची व्याख्यानें ऐकत असूं. एव्हडी दीड पानें शिकवायला त्यांनी तब्बल तीन आठवडे सलग खर्चीं घातलेले मला स्मरतात. (मात्र प्रत्येक व्याख्यान सुरू करताना ‘मिल्यू इंठीरियर’ हा शब्द ते अशा विशिष्ट लकबीत उच्चारित की हाच शब्द त्या प्राध्यापकांच्या संदर्भात अख्ख्या कालेजात रूढ झाला होता ! ) असो.
खरं तर पहिली दोन वर्षें शरीरशास्त्र -घडण नि कार्य – याच परीघांत फिरत राहिली आणि आधीचे काही महिने काहीशा व्यग्रतेत घालवल्यानंतर निसर्गाच्या या अचाट कर्तृत्वाचे अप्रूप जाणवायला सुरूवात झाली. इतके गुंतागुंतीचे हे शरीर त्याची “वेळ” येईपर्यत कसे तग धरून राहातें ही बाब अक्षरश: दिंगमूढ करते ! होय, अजूनही !!

व्याख्यानाचा प्रारंभ ते मेंदूतील “बॅंड मास्टर” पिट्यूटरी या ग्रंथीपासून करीत नि शरीरातील प्रत्येक पेशी या मास्टरमाईंडच्या अधिपत्त्याखाली कशी काम करते ते समजावून सांगत. डॉक्टरी शिकतांना ते सर्व ज्ञान निरतिशय मोलाचे होते यांत दुमत नाहीच . पण नंतरच्या वर्षांत याच शरीरातील काही पेशी किंवा घटक आपली मनमानी करायला लागले की शरीराची कशी ‘वाट’ लावतात तेही शिकायला मिळाले. तेही असो.

माझा आजचा मुद्दा जरा वेगळा आहे. तुम्हाला वाचायला वेळ असेल तर हा मुद्दा थोडा सविस्तरपणे मांडूं.
खरं तर आपले आंतरिक विश्व कल्पनेपलीकडे विशाल, खोल आणि विलक्षण मोहक, गंभीर पण अतिशय सुखकारक उल्हसित नि आनंददायी असते हे कोणा टी. व्ही. वरच्या बाबा बुवाने सांगायची गरज नाही. आपण आपले डोळे, कान आणि वृत्ती अंतर्मुख केल्या तर आपल्याला तो अनुभव घेणे अजिबात कठीण नाही. सम्पूर्ण त्रैलोक्य आपल्यातच सांठवलेले आहे असा विचार थोडा अधिक काळ रेंगाळूं दिला तर पुराणांत वर्णिलेली सात पाताळें, सात स्वर्ग, सप्त धातू, इतकेच नाही तर विश्वातले सर्व ज्ञान आपल्यातच आहे याची जाणीव “अहं ब्रह्मास्मि” या उक्तीची तात्काळ अनुभूती देऊं शकेल.
मात्र खरी अडचण आहे ती डोळे, कान नि चित्तवृत्ती ‘आंत’ वळवण्याची ! दृष्टीला अंतर्मुख करणे म्हणजेच ‘उफराटी दृष्टी’ आणि कानाची छिद्रें न झाकतांही ऐकता येतो तो अनाहत नाद ओंकार किंवा प्रत्येक श्वासागणिक चालणारी “सोहं-हंस:” ही सिध्दी !! वृत्ती अंतर्मुख करणे म्हणजेच बाह्य जगाशीं मनाने केलेली ताटातूट !!!
किती सोपं वाटतंय् नाही सांगायला नि ऐकायला ? प्रॅक्टिस करायला अवघड वाटले तरी अशक्य नक्कीच नाही. असो !

मेडिकल कालेजात शरीरशास्त्र शिकतांना टेबलावरच्या मृत शरीराचा प्रत्येक अणुरेणू अक्षरश: पिंजून काढला होता, पण त्याच चिंधड्यांत एकेकाळीं चैतन्य सळसळत होते ही जाणीव तेव्हासुध्दा मनाला बेचैन करीत असे. मेडिसीन विभागाचे एमेरिटस् प्रोफेसर मुखर्जी आणि विकृती विज्ञानाचे (Pathology) प्राध्यापक  शिकवता शिकवतां तत्वज्ञानाच्या घनदाट अरण्यांत शिरत आम्हाला बरोबर घेवून नि सुरू होई एखादे दिव्य प्रवचन -जीवनमृत्यूच्या अनाकलनीय तत्वज्ञानावर ! खरंच, ते भारावलेले दिवस आठवले की हेवा वाटतो मला माझाच !! ते सुटबुटातले ऋषितुल्य योगीच होते हे नि:संशय !!!

डिसेक्शन हालमध्ये हृदय, फुफ्फुसं, जठर, आंतडी, किडनी वगैरे मोठी अवयवं अभ्यासल्यावर आम्ही मणक्याच्या आतली नि शेजारची स्पायनल कार्ड आणि मज्जातंतूंचा अभ्यास सुरू करायचो.
खरं तर पातंजल योगसूत्रातील या अतिमहत्वाच्या नाड्या, अंतर्गत विश्वाचे संचलन करतात (Autonomic Nervous System द्वारें) . या आटोनोमिक नर्व्हस सिस्टममुळे आपल्याला न जाणवणऱ्या क्रिया घडत राहतात (Involuntary actions) , जसे अन्नपचन, मलमूत्र तयार होणे वगैरे. त्या क्रियांवर ताबा ठेवला जातो केवळ आपसातील समन्वयामुळे. तेथे मानवी बुध्दीचे, मनाचें किंवा कोणत्याही बाह्य वस्तूची लुडबुड चालत नाही, पूर्णपणे स्वयंचालित नि स्वसंवेद्य !!

जरा अवघड होतंय् नाही ? मला मानवी शरीराच्या अंतर्विश्वातलं स्थूलमानाने विवरण करायचं होतं. हरकत नाही ; आपण ते क्लिष्ट शब्द नको वापरूंया.
सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे आपली ‘इंटर्नल एन्व्हिरानमेंट’ अक्षरश: ‘अणोरणीयम् महतोमहीयान्’ या उक्तीला सार्थ ठरवते. ब्रह्मांडांत जे जे आहे तें सर्व आपल्या पिंडांत म्हणजेच शरीरांत सामावलेले आहे, इतके आपले अंतरंग विशाल आहे !
“मिल्यू इंठीरियर !’ हा शब्द आठवतांच ‘ज्ञान-विज्ञानाची’ मोट बांधण्याचा हा अल्पसा प्रयोग केला आणि तुम्हाला तो सांगावा हा पायंडा मोडवेचना म्हणून हा लेखनप्रपंच !!

इति शम् !
२७ सप्टेम्बर २०१७
पुणे





Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?