Sunday, September 17, 2017

 

राहून गेलेल्या गोष्टी !

राहून गेलेल्या गोष्टी………!
गतायुष्यातल्या ‘राहून गेलेल्या’ गोष्टी आठवताना मजा येते. क्वचित् त्या न घडल्याचेही समाधान मिळते ; मसलन्, मला लहानपणीं खूप केस वाढवून कपाळावर रेंगाळणारी झुलपं नि मानेला झटका देऊन त्यांना मागे उडवायची हौस होती. मात्र आधीच घनदाट असलेले केस लवकर लवकर वाढत आणि कानांवर येण्याआधीच त्यांची कत्तल होई. एकापरीस तशी खोड जडली नाही ते बरेच झाले (कारण आता शशी थरूरला तसले चाळे करताना पाहून कीव वाटते, खरं तर किळस वाटते !) असो. डोईवर घनदाट केस (तेव्हां !) असल्याने देवआनंद सारखा ‘फुगा’ काढायचाही मोह होई.  मात्र तो वसा धाकट्या बंधूंनी घेतल्याने घरात दोन दोन देवानंद नकोत म्हणून केसांना अक्षरश: मुरड घातली. असो असो.
लहान असतांना माझ्या पुण्या-मुंबईकडच्या स्मार्ट मावसभावांना पाहून आपणही स्मार्ट, चुणचुणीत, रुबाबदार दिसावे अशी मनोमन इच्छा होई. मात्र त्याबाबतीत अस्मादिक आणि पु. लं. ची नाळ सारखी निघाली. तसा मी अगदीच गबाळा नव्हतो, पण बऱ्यापैकी होतो. ते गबाळपण आमच्या शहरात (त्या काळी) साधा, सरळ, भाबडा, शांत इत्यादी विशेषणांनी सहज झाकले जाई. अर्थात् मी अगदीच ‘हा’ नव्हतो, पण माझं गबाळपण ‘तो खरंच बुद्धिमान आहे, मात्र अंमळ आळशी !’  या वाक्यांमुळे नक्कीच वाढलं ही वस्तुस्थिती आहे !!
मला खरं तर इंजिनिअर व्हायचं होतं नि त्याची चुणूक मी सायकल, घड्याळ, रेडियो वगैरे आधीं ‘खोलून’ पुन्हा असेम्बल करण्याचा अट्टाहास करी. मात्र बहुतांश वेळी तीं सर्व ‘तज्ञां’कडेच न्यावी लागत. आई म्हणें पठ्ठे बापूराव इंजिनेर होणार, मामा म्हणें ‘घिसाडी’ ! (झालों डॉक्टर ) असो.
एकदा “दिलरूबा” या वाद्याचं नाव ऐकले नि अस्मादिक ते तंतुवाद्य शिकायला मुंग्रे मास्तरांच्या क्लासमध्ये दाखल झाले. मात्र त्यांनी आधी हार्मोनियम बरोबर तोंडाने “सा” लावायची आज्ञा केली. ‘मला गाणे नव्हे, वादन शिकायचं आहे’ असे वारंवार सांगूनही त्यांनी “सा चाच” आग्रह धरला. अस्मादिक क्लासला रामराम करीत घरीं !
पुढे अनेक वर्षांनी लेकीबरोबर “गाणे” शिकण्यासाठी राम माटे यांच्या क्लाससाठी गेलो ; त्यांनी जे काही येते ते म्हणा असे म्हटल्यावर भीमसेनजींचं एक भजन (खरं तर ) खूप छान म्हणून दाखवले. पण तुमचा गळा क्लासिकलसाठी नाही असे सांगत माझी बोळवण केली (त्यावेळीं गळा काढून जोरात रडावेसे वाटले).
थोडक्यात, गायन नि वादन दोन्ही शिकायचे राहिले ते राहिलेच ! मात्र ती खामी मी माझे दोन्ही कान कुठल्याही प्रकारच्या संगीताला उत्तमप्रकारें ‘दाद’ देण्यांत ‘तयार’ करून घेतले आहेत.
लहानपणापासून आजपावेतो उत्तमोत्तम वक्त्यांची व्याख्याने मी अक्षरश: हजारोंनी ऐकली आहेत. साहाजिकच, आपल्यालासुद्धां प्रभावीपणे बोलतां यावे ही आंतरिक तळमळ अजूनही आंतरिकच राहिली. मी खरं तर चांगला संवाद साधू शकतो अशी माझी पक्की धारणा आहे. पण सभेसमोर बोलताना मला जे काही सांगायचे ते वाचूनच दाखवावे लागते ! मला (निदान सभेसमोर) सुसंगतपणे बोलतां येत नाही याची कायम रूखरूख वाटते.
डॉक्टरी शिकत असतांना आणि नंतरही अत्यंत यशस्वी आणि उत्कृष्ट सर्जन्स नि फिजिशियन्सच्या संपर्कांत आलो. साहजिकच या क्षेत्रात लौकिक मिळावा, मानमान्यता मिळावी, आंतरिक समाधान लाभावे अशी मनापासून इच्छा होती. ती अल्पांशाने का असेना पूर्णही झाली, पण आत्त्तासुद्धा पन्नास वर्षांपूर्वी एकेकदांच वाचलेले पुन्हा सहज आठवतांच, आपण अधिक काही नक्कीच मिळवूं शकलो असतो असे विचार आपसुक तरळून जातात.
कालांतराने ज्ञानेश्वरी, दासबोध यासारखे अप्रतिम ग्रंथ हातीं आले, त्यांचे अल्पसे परिशीलन झाले. स्वामींची आणि स्वामींवरची अमाप ग्रंथसंपदा नजरेखालून गेली. मात्र बारा वेळां इंग्लंडला जाऊन, प्रत्यक्ष त्याचे जन्मगावी भेट देवूनही ‘शेक्सपियर ‘ मात्र आत्मसात राहू देत, धड वाचतांदेखील आला नाही ही खंत मी अनेकांजवळ अनेकदा बोलून दाखविली आहे.

माझे इतके विपुल ज्ञान (!!)  (ज्ञान-विज्ञान सहित !) असूनही मला एका गोष्टींचे वैषम्य वाटणे साहाजिक नाही काय ? अन् ती बाब म्हणजे भारताचा आस्कर म्हणतां येईल असा “ज्ञानपीठ पुरस्कार” माझेपासून अजून इतका लांब कसा ??? !!!!!

प्रभु रहाळकर
पुणे   १७ सप्टेंबर २०१७    


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?