Sunday, September 03, 2017

 

प्रौढपणी निज शैशवास जपणे

प्रौढपणीं निज शैशवास जपणें......!

आज सकाळपासून हीच ओळ सारखी रूंजी घालत्येय् . शिशु, बाल, तरूण नि प्रौढावस्था मागे टाकत आता वृध्दत्वाकडे वाटचाल कधीच सुरू झालीय्, पण आत्त्तां तरी प्रौढ म्हणूनच वावरायला आवडेल ! निदान तारूण्यातला काहीसा उच्छ्रुंखळपणा दूर ठेवतां आला तरी खूप झाले !
हा प्रौढपणासुध्दा खूप सुखावह आहे कारण दैनंदिन आयुष्यातली धावाधाव, कटकटी, काळज्या नि संकल्प-विकल्पांना केव्हाच तिलांजली दिलेली आणि ‘रब्’ रखेगा वैसेच् जीनेका – क्या बोले तो ! मात्र हा ‘रब्’ अनेक रूपांनी सामोरा येतो हे नि:संशय. मग तो लेकीचं रूप घेईल किंवा लेकाचं . सुनेचं किंवा जांवयाचं . नातींचं किंवा भावंडांचं. मित्रगोत्री किंवा सुहृदांचं. अगदी शत्रूचंदेखील ! खरं तर आता शत्रू कुणी राहिलेच नाहीत – होते-नव्हते ते कधीच पडद्याआड गेले असावेत. आत्ताचा काळ केवळ निवांतपणी स्वत:तच रमण्याचा, जुन्याजुन्या आठवणींना गोंजारत बसण्याचा, स्वत: केलेल्या बोवकूफींवर मोकळेपणे हसण्याचा नि भळभळ होऊं न देतां अलगद खपल्या काढून पाहण्याचा !! खूप खूप मागे ऐकल्या-वाचल्याचा मागोवा घेत भूतकाळात रमून जाण्याचा नि पुन्हा नवीन सृजनाची वाट चोखाळण्याचा . खरंच किती रम्य कालखंड आहे हा !

म्हणूनच आज प्रकर्षांने आठवतेंय माझेच शैशव. एका सुखवस्तू, कुटुम्बवत्सल घरात जन्मलो. वडील, आजोबा, काका उच्चशिक्षा विभूषित. आईचे संस्कार आणि लालनपालन एका खानदानी नामवंत घराण्यांत झालेले, त्यामुळे सर्वच संस्कार आम्हा भावंडांवर वारसा हक्काने पाझरलेले. एकूणच सर्व प्रकारची सुबत्ता अनुभवतां आली.
त्यावेळीं दारात तीनतीन गाड्या नि दोन ड्रायव्हर्स (आजोबा त्यांना शोफर म्हणत) होते, शिवाय घरकामासाठी दोन ‘देवराम’ (गडी) , स्वयंपाकासाठी सोंवळ्या काशीबाई, धुण्याभांड्यांसाठी ताईबाई वगैरे मोठा सेवक परिवार असे. सर्वांचें भोजन वगैरे आमच्याच घरी असे. पै-पाहुणा तर हमखास कायमच ! असो.

तेव्हा वडिलांची एक सुंदर फोर्ड प्रिफेक्ट कार होती, हलक्या निळसर रंगाची. छोटीशी, हल्लीच्या ‘नॅनो’ सारखी पण खूपच देखणी. (लंडनला असतांना एका रिटायर्ड आर्मी अफसर कडे उत्तम अवस्थेतील तश्शीच कार पाहून तिचा फोटो काढण्याचा मोह मला आवरतां आला नाही) . तर, त्या प्रिफेक्टने लहानपणी खूप प्रवास केलेला स्मरतोय. मी नेहमीच ड्रायव्हरच्या शेजारील सीटवर उभा राहून गंमत पाहात राही आणि तासनतास उभा राहूनही याचे पाय कसे दुखत नाहीत याचे आईला कोडे नि कौतुकही वाटत राही. वडिलांना रानावनातून खूप भटकंती करायला आवडे; कधीकधी अनाठायी ॲडव्हेंचर्स घडत. एक प्रसंग खोलवर दडी मारून बसलाय. एकदा इंदोरहून गरोठला जाताना अगदी संध्याकाळ होत होती आणि आई-अण्णांना सोमवारचा उपास सोडायचा असल्याने वडिलांनी मुकुंदरावांना (शोफर) एका भल्यामोठ्या नदीकाठी गाडी थांबवायला सांगितली. त्यांनी नम्रपणे , ‘भय्यासाहेब, आता वाघ आणि इतर जंगली जनावरांची नदीवर येण्याची वेळ झालीय् , आपण पुढच्या डाकबंगल्यावर थांबूं.’ पण वडिलांनी गाडी थांबायला लावली. सोबतीचे जेवणाचे डबे काढून आम्ही सर्व नदीकाठच्या मोठ्या खडकावर बसून जेवायला बसलो. वडील स्वत: नदीवर जाऊन संध्या करून आले आणि जेवण करू लागले. मात्र आम्ही सर्व भावंडें वाघाच्या भीतीपोटी फारसे काही न खातांच गाडीत गुडीगुप बसलेलों ! आई-अण्णा नि मुकुंदराव जेऊन नदीवर हातपाय धुवून गाडीत बसले , दारें बंद करून गाडी स्टार्ट केली आणि त्याचवेळी वाघाची भली मोठी डरकाळी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली !!
वडील असे कायम धाडसी प्रयोग करीत, पण आईची अशी श्रध्दा होती की, ‘ मारनेवालेसे बचानेवाला हमेशा बडा होता है !’

तूर्तास अल्पविराम !
पुणे ३ सप्टेम्बर २०१७


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?