Thursday, August 03, 2017

 

Tenth episode

माणगाव ते गरूडेश्वर (१०)
दापोलीचा मुक्काम आवरता घेऊन आपण व्याघ्रेश्वराचे दर्शन घेत्साते पुढील मार्गक्रमणा करूयात. छोटासा घाट उतरताच पुन्हा सागरकिनारा लागेल नि आपण केशवराजाचा इटुकला डुंगर चढून घाटमाथ्यावरच्या अतिशय देखण्या गणपती मंदीराला आवर्जून भेट देऊं. खरोखर, इतकी सुंदर गणेशमूर्ती इतरत्र आढळणे दुरापास्त असावी. माझा एक निश्चित समज असा की विशेषत: कोकणांतील गणेशमूर्ती अत्यंत सुबक, देखण्या आणि प्रसन्नवदन असतात ; इतक्या, की त्यांचेवरून आपली दृष्टी क्षणमात्रही ढळत नाही. बरें, शृंगारसुध्दा इतका मनोवेधक की गजाननाचे लावण्य अधिकच बहारदार दिसावें. डोंगरावरून खाली खोलवर पसरलेली समुद्राची खाडी (Lagoon) मनोहारी आहे, वळणदार आणि लाल माती नि खडकांना बिलगून असणारी. पूर्वी या खाडीपलीकडे जायला ‘फेरी’चा वापर करावा लागे पण आता भलामोठा सुंदर पूल एकीकडे खाडीचे अंतरंग आणि दुसऱ्याबाजूस सागरकिनारा नि अथांग समुद्राचे विहंगम दर्शन घडवतो.
हेळामात्रें दर्शने घेत आपण पाहतापाहतां “हर्णै” बंदरानजीक पोचलोदेखील ! हर्णै गावातून गाडी काढणे जरासे त्रासदायक वाटते, कारण दोन्ही बाजूंस नुकत्याच जाळ्यांबाहेर ओतलेल्या माशांचे ढीगचे ढीग नाकाला रुमाल किंवा पदर लावल्याबिगर पर्याय ठेवत नाहीत. मात्र ज्यांना या प्रथम अवताराची जाण आहे ते अगदी चालत्या गाडीतूनही त्यांची जातकुळी सहज सांगूं शकतील !
हर्णैं बंदर माझ्या स्मरणांत आणखी एका वाकयामुळे (प्रसंगामुळे !) लक्षात आहे. जवळजवळ साठ वर्षांपूर्वी पाहिलेला आचार्य अत्र्यांचा बोलपट ‘श्यामची आई’ ! त्यांत श्यामला शिक्षणासाठी कोकणाबाहेर नि नंतर आईच्या देहावसनानंतर परत आलेल्या श्यामच्या हर्णैं प्रवेशाचे हृदयविदारक चित्रण तेव्हा खूपच बेचैन करणारे होते. अस्तु . कुणालाच हळवे करण्याचा उद्देश नव्हता, केवळ ओघाने आठवले म्हणून सांगितलं एवढंच !
हर्णैंपलीकडे सागरकिनारीच वसलेले ‘केळशी’ कुणालाही भुरळ पाडण्याइतपत सुरम्य आहे. खरंतर कोंकणातली सर्वच गावं निदान मला तरी रम्य वाटतात (कारण या मातीशी कुठे ना कुठे अजूनही नाळ जुडलेली आहेच ना !) . त्यातून, केळशी मला तरी सधन, विकसित नि ‘जीवंत’ वाटले. जरा अवास्तव रंगवलेलं कोकणाचं मागासलेपण अन् दारिद्र इथे अजिबात जाणवत नाही. सर्वसामान्य माणूसही प्रगल्भ, जाणकार, कामसू आणि पुरेशी विनोदबुध्दी असलेला भासला. मी अजून एक ठोकताळा मनांत राखून आहे ; माझ्या मते विनोदबुध्दी असलेला इसम सहसा बुध्दिमान असतो (पाचकळपणा करणारा नव्हे !) असो.
केळशीला एका विलक्षण व्यक्तिमत्वाची ओळख झाली. श्री वर्तक हे संघाचे स्वयंसेवक नि म्हणून मूल्याधिष्ठित आचरण करणारे (अन् करवून घेणारे !). त्यांनी आपल्या घरातच पर्यटकांच्या सोयीसाठी घरगुती ‘रिसार्ट’ चालवले आहे. मात्र राहण्या-खाण्याच्या अटी पाळणे बंधनकारक आहे. जसे, कुटुम्बाने (आई-वडील-पत्नी-मुलें वगैरे सर्वांनी ) एकत्र निवास करावा , टीव्ही तर नाहीच पण सेलफोनचा वापरही अत्यंत मर्यादित किंवा नसावा. मुख्य म्हणजे हल्लीं विरळ होत चाललेला कौटुंबिक संवाद घडू द्यावा. मांस-मच्छी-मच्छर-दारू-सिगरेट-बिडी-तम्बाकू साहजिकच ‘बॅंड’ (Banned) !!
त्यांच्या भल्यामोठ्या ‘वाडी’त फेरफटका मारतांना खरंच विलक्षण शांत, सुखकर वातावरणाची प्रचीती एका वेगळ्याच धरातलावर घेऊन जाते हे नि:संशय !
वर्तकांच्या घरापासून अक्षरश: हाकेच्या अंतरावरील दोन वास्तू लक्षवेधक आहेत. एक आहे अनेक कोकणस्थांची कुलस्वामिनी असलेलं महालक्ष्मी मंदीर नि अगदी सागरकिनाऱ्यावर छत्रपती शिवरायांनी अतिशय मुत्सद्देगिरीने अन् दूरदृष्टीने मुद्दाम बांधवून घेतलेला दर्गा ! दोन्हीबाबतचे किस्से वर्तकांच्याच तोंडून ऐकण्यात गंमत आहे. म्हणून आज त्यांच्या मनोरंजक आणि ‘एलिव्हेटिंग’ गप्पा ऐकत थोडी विश्रांती घेवूंया !

जय साईराम.
(क्रमश:..........


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?