Sunday, July 16, 2017

 

Mangaon to Garudeshwar (9)

माणगाव ते गरूडेश्वर (९)
पुळ्यापासून संगमेश्वर कडे परस्पर जाण्यासाठी एक आडवळणी रस्ता नुकताच चोखाळला होता ( तसेही आडवळणी रस्ते शोधण्यात आमच्याइतका कोणी माहिर नसेल !) या रस्ताने जाताना कोंकण रेल्वेला आपण खूप वेळा छेद देत जातो (क्रास करतो !) त्याहीपेक्षा, विनाकारण उलटे हातखंबावरून न गेल्यामुळे आपला वेळ नि इंधनाचीही बचत होते. संगमेश्वरच्या बरेच अलीकडे आपण पुन्हा गोवा-मुंबई महामार्गाला लागतो. खरंतर याला ‘महामार्ग’ म्हणणे धाडसाचे ठरेल ! आत्तां कुठे हा रस्ता चौपदरी होऊं घातलाय ! (थॅंकयू नितिनजी !!)
तथापि, या रस्त्यावर ड्राईव्ह करण्यात एक वेगळीच थ्रिल आहे खरी. अर्थात पुढे एखादे संथगतीने जाणारे अवजड वाहन किंवा वाटच न देणारा टेम्पो नसेल तर ! खूप म्हणजे खूप चढ-उतार, वेडीवाकडी वळणें नि अचानक रस्त्यावर उतरलेली गुरं आपल्याला होश्शियार ठेवतात.
चिपलूनच्या (चिपळूण) जस्ट अलीकडे जरा वाट वाकडी करून वीसबावीस किलोमीटर डावीकडे देवी सरस्वतीचे मंदिर पाहता येईल. याचे वैशिष्टय असे की सरस्वती शारदेचे मंदिर अतिशय दुर्मिळ असते. महालक्ष्मी किंवा महाकालीची मंदिरें अनेक आहेत पण शारदेचे मंदिर क्वचितच आढळेल.  निदान आपण सरस्वतीपुत्रांनी तरी आवर्जून पहायला हवे !

चिपलूनच्या (चिपळूण) पंचक्रोशीत अनेकानेक प्रेक्षणीय तसेच श्रध्दास्थाने आहेत. मात्र समुद्रकिनारी वसलेले नि एकेकाळी पालशेत बंदर म्हणून प्रसिध्द असलेले ‘गुहागर’ पाहण्यासारखे आहे. कोणत्याही प्रकारचा ‘संसर्ग’ न झालेला इथला सागरकिनारा खराखुरा ‘व्हर्जिन’ आहे – अछूता ! व्याडेश्वर हे आमच्याप्रमाणेच अनेकांचे कुलदैवत आहे , त्यामुळे आमचेबरोबर तुम्ही दर्शनाला आलांत तर आमचेबरोबरच देवालाही बरें वाटेल . लगोलग दुर्गादेवी मंदिरातही ओटी भरून येऊं ! येथील अंजनवेल  दीपगृह तसेच वेतकामाच्या विविध वस्तू आणि मोठ्ठ्या आकाराच्या सुपाऱ्यांसाठीही गुहागर प्रसिध्द आहे. हाप्पुसची देणगी तर आख्ख्या कोंकणाला बहाल केलीय निसर्गाने ! असो.
आज आपण खेडमार्गें दाभोळ, दापोली, हर्णै, केळशी कडे आपला काफिला वळवूं. चिपळूणपासून या मार्गावर बरेच अंतर कोयनामाई आपल्यासंगट असणार आहे. तिचे मोहून टाकणारे नि क्षणोक्षणी बदलत जाणारे रूप पाहून आपण स्वत:तच गुंतून जातो नि अचानक आठवतात ज्ञानेक्श्वरीतील ओळी – “ या गीतार्थाची थोरी / स्वयें शंभू विवरी / जेथ भवानी प्रष्नु करी / चमत्कारौनि // तेथ हरू म्हणें नेणिजे/ देवी जैसें कां स्वरूप तुझें / तैसें हें नित्य नूतन देखिजे / गीतात्त्व // १/७१

खरोखर, आपल्या अवतीभवती इतके विलक्षण बदल प्रत्यहीं घडत असतात, मात्र त्यांची दखल आपण किती कॅज्युअली घेतो. अनेक स्थूल किंवा ढोबळ फरक नजरेस पडतातही, पण सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म बाबी हमखास निसटून जातात ; काय गवसले, काय हरवले याची मोजदाद क्वचित् केली जाते. खरे तर दोन्हीही कधीच गळून गेल्या असतात काही थोडक्या पाऊलखुणा मागे ठेवून ! त्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्यात मजा असते.
फारच ॲबस्ट्रॅक्ट व्हायला लागलंय का ? तर मग ते असो . आपण कोयनामाईला नजरेआड होऊ न देतां मार्गक्रमणा करीत राहूं . डोंगराच्या घाटमाथ्यावरून दूरवर दाभोळ वसलेले दिसेल . होय, ते अजून तिथेच आहे. राजकारण्यांच्या ‘अरबी समुद्रात दाभोळ प्रकल्प बुडवून टाकू’ अशा बेछूट वल्गनांके बावजूद !
दापोलीत जयराम फाटकांच्या “रिसोर्ट”वर उतरूंया का ? या सधन शेतकरी/बागायतदाराने आपल्या भल्यामोठ्या घराशेजारी चारपाच टुमदार बंगलीवजा माडर्न घरकुलं उभारलीं आहेत. अशा सधन शेतकऱ्याचे वर्णन  लक्ष्मण देशपांडे (वऱ्हाड निघालय् लंडनला फेम) यांनी आपल्या सदाबहार एकपात्री प्रयोगांतून मराठवाड्यातील बाप्पांना जगभरात नेऊन ठेवले होते. गर्भश्रीमंतीचे ते अप्रतिम सादरीकरण ठरले. दापोलीतले फाटक कदाचित अतिश्रीमंत नसतील, पण स्व-कष्टाने त्यांनी आपला वारसा वृध्दिंगत केला हे नि:संशय. एकत्र कुटुंबांत गुण्यागोविंदाने राहात प्रत्येकजण हसतमुख नि सतत कार्यमग्न ! खूप छान वाटतं अशी कुटुंब नि त्यांचे अगत्य पाहून. स्वत: जयराम वयाची सत्तरी झालेली असूनही पहांटे सहा ते रात्री अकरापर्यंत कुठल्या ना कुठल्या कामांत मग्न (त्यांना पाहून आमच्या नाना सोमण-कर्नल प्र.का.सोमण- यांची प्रकर्षांने आठवण झाली ) ; साहजिकच त्यांना बोलते करणे सोपे नाही, मात्र (आपुन फारसे बोलत नसूनही) त्यांना बोलते करणे अस्मादिकांना लीलया जमले नि आख्ख्या कोंकणचा इतिहास त्यांनी आपल्या खास शैलींत आमच्या मागील भेटीत कथन केला होता. मात्र त्याविषयीं पुन्हा कधीतरी !
त्यांच्या घरी चापलेले भरपूर कांदा-नारळयुक्त दडपे पोहे, गरमागरम आंबोळ्या नि मलईदार श्रीखंडाची चव अजून जिभेवर रेंगाळत आहे !!

दापोलीपासून पाच किमी. भर घाटांत व्याघ्रेश्वराचे मंदीर आहे (अनेक वर्षें याच ठिकाणाला आमचे कुलदैवत समजून होतो, पण आवडी बदलतात तशा कावडी बदलत गेल्या नि एकाहून अधिक कुलदैवतें कळलीं !!) (खरंतर जेव्हा तो जगन्नियंता सर्व विश्वें व्यापूनही शेष उरतो, तिथे त्याला एका किंवा अनेक ठिकाणीच काय म्हणून पाहावें ?)
विषयांतर फारच वाढतंय्, तेव्हा तूर्तास छोटीशी विश्रांती !!
(क्रमश: .........




Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?