Wednesday, July 12, 2017

 

Ganapati Pule and Malgund

माणगाव ते गरूडेश्वर (८)
श्रीदेव गणपती पुळे ! लाखो भाविकांचे श्रध्दास्थान नि असंख्य पर्यटकांचे पसंतीचे स्थळ असलेले हे रम्य क्षेत्र अगदीं अलीकडच्या काळात प्रसिध्दीस आले. मला निश्चितपणे आठवते की साधारण पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत गणपती पुळ्यास जाणारे मोजके लोक असत. मुंबईहून जाण्यासाठी मुंबई-गोवा बोटीने जावे लागे नि ती बोटही जयगड, हर्णे,  वगैरे बंदरें घेत रत्नागिरीनजीक खोल समुद्रांत थांबून तेथून छोट्या होड्यांतून रत्नागिरीत प्रवाशांना उतरवीत असे. तेथून दिवसात एकदा धावणाऱी टूरिस्ट बस पुळ्यास येई ! माझे आईवडील नि धाकटी भावंडं जवळ जवळ चारपाच पिढ्यांनंतर प्रथमच १९५८ सालीं पुळ्यास अशा सायासाने पोहोचली होती !  मात्र गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून तेथील चित्र पालटत गेले नि आता तें अग्रगण्य पर्यटनस्थळांत गणले जाते. संपूर्ण मंदिर आणि परिसराचा उत्तम प्रकारे विकास झाल्यामुळे येथे कायम गजबज असते. मंदिरासमोरचा समुद्र जवळ या म्हणून खुणावत असतो पण बिवेअर ! अत्यंत धोकादायक आहे हा किनारा. काठालगत एक महाभयंकर ‘ट्रफ’ (खोलवटा) असल्यामुळे पट्टीचे पोहोणारेही येथे हतबल होऊन प्राण गमावून बसतात. किमान इथे तरी सागरराजाला दुरून नमस्कार करणे श्रेयस्कर !
स्वयंभू गजानन मूर्ती खरोखर खूप लोभस आहे हे नि:संशय. शांतपणे दर्शन घेऊन तिला अंत:करणांत साठवून घ्यावी नि मग निवांतपणे समोरच्या सभागृहात ठाण मांडून आपली वैयक्तिक सेवा-साधना श्रीचरणीं रूजूं करावी. श्रींना प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगर चढून उतरावा लागतो, मात्र ते अजिबात कठीण नाही. प्रदक्षिणामार्ग छान टाईल्सनी आच्छादित केवळ एक कि.मी. इतकाच लांबीचा आहे नि अथर्वशीर्ष म्हणता म्हणतां  चुटकीसरसा पूर्ण होतो. असो.
हल्लीं सर्वच देवस्थानांवर भोजन-प्रसादाची चांगली सोय असते. मात्र रूचिपालटासाठी आपण अन्यत्र जायचे ठरविले तर डाळिम्बी उसळ, उकडीचे मोदक, आळूचे फदफदे वगैरे खास कोकणी पदार्थ (आगाऊ आर्डर देऊनच !) उपलब्ध होवू शकतात. तथापि, मोदकांचा निश्चित आकडा सांगणे महत्त्वाचे आहे ; संख्येपेक्षा उणे-अधिक मागणी अपमान करू शकते !!
श्रीदेव गणपती पुळ्यापासून केवळ दोन किलोमीटरवर कविश्रेष्ठ केशवसुतांचे जन्मस्थान ‘मालगुंड’ वसलेले आहे. तिथे त्यांचे भव्य स्मारक नि संग्रहालय पाहण्यासारखे आहे.
बाय द वे, केशवसुत आणि माझे आजोबा नरहर शंकर रहाळकर हे दोघे जीवश्च-कंठश्च मित्र ! दोघांचेही प्राथमिक शिक्षण खानदेशातील जळगांव जिल्ह्यातल्या गिरणा नदीकाठच्या भडगांवला झाले. माझे आजोबा एक किस्सा रंगवून सांगत असत. तेव्हांसुध्दा गिरणा नदी वर्षातले अकरा महिने उताणी असे ; जेमतेम पाऊल बुडेल इतक्या पाण्यातून ही शाळकरी मुले नदीपलीकडच्या शाळेत जात. एकदा मात्र गिरणेला पूर आला म्हणून मोठाल्या वेताच्या टोपल्या (डोंगा) होडीप्रमाणे पाण्यात टाकून या मुलांनी नदी पार करण्याचा प्रयत्न केला. डोंगा अर्ध्यापर्यंत पोचता पोचतां तो अचानक बुडाला नि ही मुलें पाण्यांत चक्क उभी राहिली ती कमरेभर पाण्यांत ! (इतका तो “पूर” मोठ्ठा होता गिरणेचा !!) असो . आजोबांनी केशवसुतांच्या कवितांचे एक समीक्षक म्हणून उत्कृष्ट परिशीलन करून ‘केशवसुत आणि त्यांची कविता’ हा शोधप्रबंध लिहिला नि तो पुढे पुणे-मुंबई विद्यापीठांत एम्. ए. च्या विद्यार्थ्यांसाठी क्रमिक पुस्तक म्हणून नावारूपाला आला.
तर अशा माझ्या दृष्टीने पवित्र स्थळाला भेट देऊन आपण पुळे-मालगुंडचा निरोप घेऊं आणि संगमेश्वर मार्गें आपल्या पुढच्या प्रवासासाठी प्रयाण करू.
(क्रमश:......)


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?