Saturday, July 08, 2017

 

माणगाव ते गरूडेश्वर (७)

माणगाव ते गरूडेश्वर (७)
 पावस मधून पाऊल निघत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र पुढच्या प्रवासासाठी दुसरा पर्यायही नाही म्हणा ! सबब एकवेळ पुन्हा समाधीमंदिरात जाऊन धावते दर्शन घेऊं नि मार्गस्थ होऊं. तथापि मंदिरासमोरील देसाईबंधूंच्या रिनोव्हेटेड विकानाला भेट दिल्याशिवाय वारी पूर्ण होणार कशी? ( विकान हा शब्द माझे एक आवडते लेखक पुरूषोत्तम भास्कर ऊर्फ पु.भा.भावे यांनी प्रचारात आणला. मराठी भाषेचे शुध्दीकरण करीत त्यांनी असे अनेक नवनवीन शब्द प्रचलित केले. स्वातंत्रवीर विनायक दामोदरांनीही अशीच भाषाशुध्दी केलेली स्मरते. माझ्या शुध्द मराठीसाठी त्यांनाही रिस्पान्सिबल् सॉरी जबाबदार धरण्यास हरकत नाही !) असो !!
तर, देसाईबंधूंचे आमरस डबे, फणसपोळी-आंबापोळीची भरपूर पाकिटं नि कोकम सरबतांच्या कॅन्स (बरण्या) आणि खूपशी मिरगुंडं, मिरच्या, सांडगे (अन् दिसेल ते) तसंच काजूपाकिटं गाडीच्या डिक्कीत भरता भरतां जीव मेटाकुटीस येतो. (तरी सांगत होतो काजू घ्यावे तर मालवणचेच. पण डायरेक्ट कारखान्यातून घेऊ म्हणतां म्हणतां अखेर  देसाईबंधूंचेच देणे द्यावे लागले ना ? असो !)

आज आपण रत्नागिरीमार्गे गणपती पुळ्याकडे प्रस्थान करूं. रत्नागिरी शहराच्या अलीकडे समुद्रसपाटीपासून जरा उंचीवर एक भव्य रिसोर्ट कोहिनूरवाल्या मनोहरपंतांनी उभारला आहे. अम्मळ महाग आहे म्हणतात पण आपण कुठे तिथे राहणार आहोंत ? जस्ट माहिती दिली एव्हडेच. तिथलं रेस्टारेंट मात्र मोठ्ठ्या बोटीच्या आकाराचे असल्याचे बाहेरूनही कळते.
पुळ्याला जाणेसाठी दोन मार्ग प्रचलित आहेत. एक हातखंबा-जाकादेवी-चाफे वरून जाणारा लांबचा नि दुसरा रत्नांग्रीच्या पोटातून मिऱ्याबंदर पार करीत समुद्राच्या काठाकाठाने जाणारा. कोकणातून जाणारे कोकणस्थ लांबचा खर्चिक मार्ग कसा निवडतील ? बिसाईड्स, समुद्रशोभा आयतीच बघायला मिळणार नाही का !
 रत्नांग्रीचा माझा डायरेक्ट संबंध खरं तर मराठी वांड्मयातूनच अधिक आला. पु.लंचा अंतू बरवा किंवा विंदा करंदीकरांच्या धोंडंया न्हाव्याने कोकणाची भुरळ पाडली हे खरे आहे. इथून जवळच असलेल्या साखरप्यानजिकच्या गावात विनोबा भावे जन्मले हेही ऐकून माहीत होते. अखिल महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राला ललामभूत असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक महाराजा रत्नागिरीचेच.
कालेजात असतांना पुलंची एक अफलातून एकांकिका आम्ही गणेशोत्सवात सादर केली होती. त्यात वारंवार तपकिरीचा बार भरून ठ्यां करून मोठ्ट्याने शिंकणाऱ्या बेरकी ‘रे कुडाळकर’ या चाकरमान्या कारकूनाची भूमिका मला मिळाली होती. अंगच्या सहज नाटकी स्वभावामुळे नि वारसहक्काने मिळालेल्या भल्या मोठ्या नाकामुळे तपकिरीसोबतच माझी भूमिका ‘वठली’ हे वेगळे सांगणे नलगे ! असो.

मिऱ्याबंदर मागे टाकता टाकतांच डावीकडे अफाट पसरलेला अरबी समुद्रकिनारा आपली पुळ्यापर्यंत साथ सोडीत नाही. ओह! व्हाट ए ब्यूटिफुल साईट एंड मिल्यू ! किती किती सुंदर दृष्य नि वातावरण !! अथांग निळाशार समुद्र पाठीवर उन्हं असतांनाच अधिक रम्य असतो. समोरून येणारी सूर्यकिरणं एकतर दिपवतात तरी नाहीतर भाजून टाकतात आणि चांदीसारखा चकाकणारा समुद्र दुसरे काही दिसूच देत नाही. असो.
तर आपण या वळणावळणाच्या सुंदर सपाट रस्त्यावर लीलया गाडी हाकताना घाटमाथा संपताच आपली जणू वाट पहात उभ्या असलेल्या आपल्या नेहमींच्या शहाळीं वाल्याच्या हातगाडीसमोर आपली मोटारगाडी उभी करूं. अमृतासमान गोड शहाळें नि त्याहून गोड त्याच्याशी साधलेला कोकणी संवाद आपल्याला आज पुळ्यांत कितपत गर्दी असेल याची कल्पना देतो. घाटमाथ्यावरून खाली क्षितिजापर्यंत पसरलेला सागर नि सागरकिनारा ; त्यांवर डौलाने फिरणारी लहानमोठी गलबतं नि होड्या ; समुद्रात दूरवर फेकलेली मच्छीमारांची जाळीं ; लाटांचा मंद खळखळाट नि त्यांवरचा नाजुक फेंस ; सर्वच किती नयनरम्य नि मनोहारी ! केवळ लाजबाब !!
श्रीक्षेत्र देव गणपती पुळेच्या जस्ट अलिकडे आमचे पुख्तैनी गाव ‘नेवरे’ लागते. खरंतर आमचे आडनाव रहाळकर ऐवजी नेवरेकर का पडले नाही ते माहीत नाही. (तसंही रहाळकर हेच आडनाव बरें वाटते.) या नजीकच्या नेवरे गावामुळे आम्ही मूळचे गणपती पुळेयाचे असा लौकिक झाला असावा नि तसेंही रहाळकरांनी पुळे संस्थानला त्यांची वहिवाटीची जमीन भेट म्हणून दिल्याचा शिलालेख मंदिरात शिरताना डाव्या बाजूस आढळतो. असो.
आपण गणपतीपुळ्याच्या पंचक्रोषींत दाखल झालो आहोत. पार्किंगबरोबरच राहण्या-जेवण्याची तजवीज करायला हवी म्हणजे मग श्रीदर्शनाला निवांतपणे जाता येईल.
सबब, छोटीशी विश्रांती !



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?