Wednesday, July 05, 2017

 

माणगाव ते गरूडेश्वर (६)

माणगाव ते गरूडेश्वर (६)
स्वामींचा आत्मबोध –
स्वामी स्वरूपानंदांनी विपुल वाड्मय निर्माण केले. यांत ‘अभंग-ज्ञानेश्वरी’, ‘अभंग-अमृतानुभव., ‘संजीवन गाथा’, ‘अमृतधारा’ वगैरे प्रामुख्याने सांगतां येतील. स्वामींनी ‘आत्मज्ञान’ या शब्दाचा ‘आत्मबोध’ या अर्थाने उल्लेख केलेला आढळेल. दोन्हीत म्हटले तर अतिसूक्ष्म अथवा वाटल्यास ढोबळ फरक आहे. जमल्यास त्याची मीमांसा नंतर करूं.

स्वामी स्वरूपानंद ‘नाथपंथी’ होते आणि त्याबद्दलची ग्वाही ते पुढील रचनेतून सहजपणे देतात. –
     “अवघें हरिमय योगबळें”
           हरि: ओम्
कृपावंत थोर सद्गुरू उदार / तेणें योगसार दिलें मज //
मन-पवनाची दाखवोनि वाट / गगनासी गांठ बांधियेली //
शून्य-नि:शून्याचें बीज महाशून्य / भेटविलें धन्य हरिरूप //
स्वामी म्हणें माझा नाथ-संप्रदाय / अवघें हरिमय योगबळें //

संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांप्रमाणेच ते सद्गुरूंना वारंवार नमन करताना एक सुंदर नवरत्नहार त्यांचे चरणीं अर्पण करतात –

जय जय जी जगदात्मया / सच्चिदानंदसूर्या /
स्वामी समर्था सद्गुरूराया / गणेशरूपा //
करोनि आत्मत्वें वंदन / घातले चरणीं लोटांगण /
सहजें आलें लीनपण / कृपाबळें //
जी प्रभु आपुला म्हणितला / तेणे संसार मोक्षमय जाला /
देखें उन्मेष उदैजला / नित्य नवा //
तुटला विषयांचा लाग / निमाला जन्ममरणाचा भाग /
फिटला जीवदशा-पांग / सामरस्यें //
देहीं अहंता मुरली / वृत्ति स्व-रूपीं विराली /
व्दैताव्दैत गिळोनि ठेली / अखंडत्वें //
सरली कर्माकर्म-विवंचना / कीं आपैसी साध्य-साधना /
उरलें करोनि अकर्तेपणा / ठायींचा चि //
बोलीं अबोलता जाहलों / सहजसुखें सुखावलों /
धन्य धन्य देवा पावलों / परमसिध्दि //
स्व-रूपीं विश्व-रूप देखिलें / विश्वरूपीं स्वरूप सामावलें /
स्वरूपा-विश्वरूपाआगळें / नित्य त्तत्व //
स्वामीचा सेवकु जाहलों / तैं येतुले भाग्य लाधलों /
अक्षय-पदीं लाचावलों / ह्या चि लागीं //

     नव ओंविया नवरत्नहार / स्वामींस समर्पिला सादर /
     तेणे संतोषौनि अभय-कर / ठेविला माथां //
                              (स्वामी स्वरूपानंद )

इतका सुंदर नवरत्नहार अर्पण केल्यावर सद्गुरूंपाशी काय मागायचे त्याचा उत्तम गृहपाठ ते आपल्या सर्वांसाठी सांगतात –

उदारा जगदाधारा देई मज असा वर /
स्व-स्वरूपानुसंधानीं रमो चित्त निरंतर //
काम-क्रोधादिकां थारा मिळो नच मदंतरीं /
अखंडित वसो मूर्ति तुझी श्रीहरि साजिरी //
शरीरीं हि घरीदारीं स्त्रीपुत्रादि परिग्रहीं /
अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रहीं //
नको धन नको मान नको लौकिक आगळा /
सोडवीं हा परी माझा मोहपाशांतून गळा //
नको भोग नको त्याग नको विद्या नको कला /
अवीट पदपद्माची अमला भक्ति दे मला //
नर नारी हरीरूप दिसो बाहेर-अंतरीं /
‘राम कृष्ण हरि’ मंत्र उच्चारो मम वैखरी //
मी-माझें मावळो सर्व, तूं-तुझे उगवो अतां /
मी तूंपण जगन्नाथा,  होवो एकचि तत्त्वतां //
देव-भक्त असें व्दैत, अव्दयत्व न खंडितां /
दाखवीं देव-देवेशा , प्रार्थना ही तुला अतां //

            ।।  ओम राम कृष्ण हरि ।।

सरतेशेवटीं , त्यांची श्रीज्ञानदेव वंदना आपल्याही नित्यपाठात असायला हवी . ती अशी –
“नमितों योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत ।
तो सत् कविवर परात्पर गुरू ज्ञानदेव भगवंत । ।
स्मरण तयाचे होतां साचें चित्तीं हर्ष न मावे ।
म्हणुनि वाटतें पुन: पुन्हा ते पावन चरण नमावे ।।
अनन्यभावें शरण रिघावें अहंकार सांडून ।
झणिं टाकावी  तयावरूनियां काया कुरवंडून ।।
आणि पहावें नितांत-सुंदर तेजोमय तें रूप ।
सहज साधनीं नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ।।

ज्ञानेशाला नमितां झाला सद्गुरूला तोष ।
वरदहस्त मस्तकीं ठेवुनी देई मज आदेश ।।

हा आदेश होता सातशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचा सोप्या सरळ मराठी अभंग स्वरूपात गौरव करण्याचा आणि तें महत्कार्य स्वामींनी पूर्ण करून स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळांने अभंग ज्ञानेश्वरी हा पावन ग्रंथ छापून प्रसिध्द केला. कोणालाही सहज परवडेल अशा केवळ चाळीस रूपयांत हा ग्रंथ उपलब्ध आहे. केवळ विकत न घेतां तो नित्य वाचनात ठेवावा अशी नम्र आणि कळकळीची विनंती तुम्हा सर्व सुहृदांना करीत आजचे हे लांबलेले वर्णन थांबवितो !!!

जय साईराम !





Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?