Monday, July 03, 2017

 

माणगाव ते गरूडेश्वर (५)

माणगाव ते गरूडेश्वर (५)
आज भल्या पहांटे जाग आली ती कोकीळ, भारद्वाज नि इतर अनेक पक्षांच्या किलबिलाटानेच. झोप इतकी झकास झाली की विलक्षण ताजेतवाने नि उल्हसित वाटतेंय. चला, झटपट तयार होऊन स्वामी-दर्शनाला जाऊं. बाहेर इतकं प्रसन्न, ताजंतवानं नि मोकळं वातावरण आहे की इथेच खूप दिवस वास्तव्य करावं !
रस्ताच्या पलीकडे एक ओढा आहे, मात्र त्यावरून पलीकडे जायला एक सुरेख पादचारी पूल आहे. तो उतरून जाताच समाधी मंदीराचा परिसर सुरूं होतो. सगळीकडे कमालीची स्वच्छता लक्षवेधक आहे. समोरच हातपाय धुण्यासाठी अनेक नळ आणि भरपूर नि स्वच्छ पायपुसणींपण ! प्रवेशदाराच्या बाहेर एक छोटेखानी  स्टॉल आहे ; तिथे व्हेंडिंग मशीनवर चहा-कॉफी तसंच थंडगार कोकम सरबत अल्पदरात मिळण्याची सोय आहे. असो !
समाधीमंदिराचा परिसर भव्य, भलामोठा नि सुंदर आहेच पण पांढऱ्याशुभ्र संगमरवरी टाइल्सनी बांधलेलं समाधीमंदीर अप्रतिम आहे. परिसरांत सर्वदूर लावलेल्या शेकडों फुलझाडांमुळे सगळीकडे मंद सुगंध दरवळत आहे (नॅच्च्चरल !)
समाधीमंदिराच्या भव्य सभागृहांत प्रत्येक खांबांवर नि भिंतींवर संतंची भलीमोठी तैलचित्रें लक्षवेधक आहेत. खरंतर आपल्या विशेष आवडीच्या प्रत्येक संताचे चित्र तिथे आहे.
(या निमित्ताने मी नुकत्याच पाहून आलेल्या साताऱ्यातील ‘संत-नगरी’ची आठवण झाली. तेथील भल्यामोठ्या प्रार्थनामंदिरात भारतातील जवळजवळ पन्नास संतांचे फोटो एकसारख्या फ्रेममध्ये ओळीने लावलेले आहेत. प्रत्येक फोटोच्या खाली त्या त्या संताच्या वैशिष्ठ्याबद्दल चार चार ओळींचे सुंदर काव्य आहे. तेथे एकाही पारंपारिक ‘देवाचा’ , म्हणजे राम, कृष्ण , दत्त , गणपती , देवी इत्यादींचे चित्र किंवा मूर्ती नाही ! केवळ संतच !! खरंतर आपल्या या पारंपारिक देवी-देवतांना “प्रत्यक्ष” असं कुणी पाह्यलंय ! मात्र संतांना तर नक्कीच पाहिलं आहे कुणी ना कुणीतरी !! ) असो.
या विशाल सभागृहात दोन्ही बाजूंस बसण्यासाठी मोठाली जाजमे अंथरलेली असतात नि काही थोड्या खुर्च्यापण. थोडं पुढे दोन्ही बाजूला दोन मोठे चौरंग असून त्यांवर स्वामींची काही पुस्तकें वाचनार्थ ठेवलेली असतात. उद्देश असा की दर्शन झाल्यावर काही काळ स्वस्थपणे तीं चाळावीत. (स्वामी हयात असतांना त्यांचे दर्शनार्थ आलेल्या प्रत्येकाला ते एखादे पुस्तक देवून कोणतेही पान उघडून त्यातील मजकूर वाचायला सांगत. आणि अनेकांना अनुभव येई की त्याच्या मनातील प्रश्न किंवा ऐहिक पारमार्थिक पेचांची उत्तरें किंवा मार्गदर्शन त्याला त्या मजकुराद्वारे  हस्तगत होई.) काहीसा तत्सम अनुभव आपल्यालाही यायला हरकत नाही !
समोरच्या चार पायऱ्या चढून गेल्याचर स्वामींची सुंदर सजवलेली समाधी अधिक जवळून स्पष्टपणे पाहता येईल. आपले मस्तक भक्तीभावाने समाधीवर टेकवता येईल नि आतापर्यंतचा सर्व शीण, शारीरिक मानसिक नि आध्यात्मिकही, क्षणांत नाहीसा होईल !!
श्री ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीप्रमाणेच येथेही श्री विठ्ठल-रखुमाईंच्या सुंदर मूर्ती समाधीशिळेमागे वसवण्यात आल्या आहेत. प्रदक्षिणा करून खाली उतरल्यावर तीर्थ घेवून आपणही काही वेळ तरी तिथे ठेवलेल्या पुस्तकांना आपलेसे करूंया .
ज्यांना ‘ध्याना’ ची गोडी आहे त्यांनी समाधीखालच्या ध्यानकक्षांत उतरून शांतपणे ध्यानसाधना करण्याची मुभा आहे.
ठीक बारा वाजता होणाऱ्या आरतीला आपण आवर्जून हजर राहणे उपयुक्त राहील. केवळ तीनच आरत्या, पण इतक्या शिस्तबध्द आणि कर्णमधुर मी अन्यत्र ऐकल्याचे स्मरत नाही. स्त्री-पुरूष वेगवेगळ्या रांगांत एकापाठोपाठ उभे राहून, प्रत्येकाच्या हातात लॅमिनेट केलेल्या आरत्यांची प्रत असते. मंत्रपुष्पांजलीच्यावेळीं प्रत्येकाला एकेक टप्पोरे सुगंधित फूल वाटतात जे आपण समाधीवर प्रत्यक्ष वाहायचे असते. आरती-मंत्रपुष्पांजलीनंतर संस्थानचे मुख्य कार्यवाह “ओम रामकृष्णहरी”चा जप सर्वांकडून म्हणवून घेत असतांना प्रत्येक रांग संथपणे मंदिरात प्रवेश करून समाधीवर स्वहस्तें फूल वाहते आणि प्रदक्षिणा पूर्ण करीत तीर्थप्रसाद घेऊन बाहेर पडते.
अत्यंत शिस्तबध्दपणे नि भक्तिभावाने इथले सर्व कार्यक्रम होतात त्याचा हा उत्तम नमूना !!
संपूर्ण मंदिर परिसर अत्यंत चोखंदळपणे घडविला/सजवलेला आहे. स्वमींचे जन्मस्थान, तसेच त्यांनी वास्तव्य केलेले घर उत्तम प्रकारें जतन करून ठेवलेले आहे. तेथील शेवग्याच्या झाडावर स्वयंभू प्रकट झालेल्या गणेश प्रतिमेभोवती प्रदक्षिणेसाठी सुंदर पार बांधला आहे.
एकूण सर्वच वातावरण प्रसन्न, आल्हाददायक आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत पोषक आहे यांत शंका नाही.
मला इथे किमान पंधरा-वीस वेळा येण्याचे भाग्य लाभले. साहाजिकच गाठीशी अनेकानेक वैयक्तिक अनुभव आहेत. मात्र त्याविषयीं आज तरी चर्चा करणार नाही ; यावेळच्या वारीतच मुक्त विहार करणार आहे, तस्मात्, एक छोटीशी विश्रांती ( कुठेही जाऊं नका, हा आलोच !)


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?