Sunday, July 02, 2017

 

माणगाव ते गरूडेश्वर (भाग ४)

माणगाव ते गरूडेश्वर  (४)
कोंकणातल्या नाभिस्थानी रत्नागिरीच्या अलिकडे बारा किलोमीटरवर वसलेल्या परम पवित्र 'पांवस' मुक्कामी आपण डेरेदाखल झालों आहोत. गणेश-गुळे येथील श्रीगणेशाचे मनोहारी दर्शन नि सागर-दर्शनाचा शान्त शान्त अनुभव यामुळे आपल्याला तशीही पांवसला लवकर पोहोचण्याची उत्कंठा लागली होतीच. त्यामुळे येथे पोंचताच 'माउली माहेर' येथील आपापल्या खोल्यांचा ताबा घेऊन   नि चहा-कॉफीचा मस्तपैकी घोट घेतल्यावर कसे 'फ्रेश' वाटतेय नाहीं ? नव्हे, चहा-कॉफीपेक्षांही इथल्या वातावरणाचा न कळत होणारा हा परिणाम आहे !  इतर लोक फ्रेश होऊन येईस्तवर अंगणात ठेवलेल्या प्रशस्त कोचांवर नि मोठ्ठ्या झोपाळ्यावर अंमळ विसावूंया. स्वामींचे समाधीमंदिर येथून हाकेच्या अंतरावर आहे - जस्ट ॲकरॉस  द रोड.
तशी संध्याकाळ झालेली असल्याने आज तरी आपल्याला केवळ समाधीच्या पायरीवरच डोकें टेकून वन्दन करता येईल ; उदईक मात्र निवान्तपणे दर्शन, आरती, स्वाध्याय आणि प्रसादाचा आनंद लुटतां येईल. म्हणून आज आपण स्वामींचे लांबून दर्शन घेऊन समाधान मानूंया.
तुमच्यापैकी काहीजणांना 'स्वामीं' विषयी फारशी माहिती नसण्याची शक्यता असल्याने त्यांची थोडक्यात जीवनी सांगण्याचा प्रयत्न करतो. स्वामी स्वरूपानन्द म्हणजे पूर्वाश्रमींचे श्री रामचंद्र विष्णुपंत गोडबोले. जन्म १५डिसेंबर १९०३ ; महासमाधी - १५ ऑगस्ट  १९७४ . दोन्ही पांवसलाच. वयाच्या विसाव्या वर्षीं नाथसंप्रदायातील सद्गुरू बाबामहाराज वैद्य यांचा अनुग्रह. ऐन तारूण्यात गांधीजींच्या असहकार आंदोलनात सहभाग आणि तुरूंगवास. पुन्हा पांवसला आल्यावर स्वावलंबनआश्रमाची मुहूर्तमेढ. मात्र वयाच्या तिसाव्या वर्षीं दुर्धर व्याधीने ग्रासल्याने प्रत्यक्ष मृत्यूशी 'हॅंडशेक' आणि विलक्षण अंतर्मुखता नि आत्मचिंतन. त्यातून आत्मसाक्षात्कार. सद्गुरूंनी नामकरण केलेल्या 'स्वरूपानंद' या नावाला पावसकर आणि इतर सुहृदांनी 'स्वामी'  हे बिरूद लावले ते कायमचे.
गंभीर आजार नि त्यामुळे आलेल्या  विलक्षण अशक्तपणामुळे स्वामी त्यानंतर कधीच पांवसबाहेर, नव्हे, देसाईबंधूंच्या राहत्या घराबाहेर चाळीस वर्षें पडले नाहीत. या दरम्यान भक्तांना मार्गदर्शन करणे आणि अनेक ग्रंथांची निर्मिती नि आत्मानंदांत तल्लीन राहणे हीच त्यांची जीवनशैली झाली. गीता-ज्ञानेश्वरीवरच्या विलक्षण ओढीपोटी "अभंग ज्ञानेश्वरी", "अभंग अमृतानुभव", ""संजीवन गाथा" सारखे अमूल्य वाड्मय त्यांनी निर्माण करून ते अजरामर केले.
जरासे घाईने नि थोडक्यात झालेल्या दर्शनाने आपले कुणाचेच समाधान झालेले नाहीं याची मला जाणीव आहे ; तथापि, ती कसर आपण उद्या भरून काढू ! माउली माहेर मधले गरमागरम जेवण करून आपण आपल्या खोलीत विश्रांतीसाठी जाऊं. सर्व आवश्यक सुविधा असलेल्या प्रत्येक खोलीच्या कपाटांत 'स्वामीं'ची सर्व पुस्तके वाचनार्थ ठेवलेलीं आढळतील. (असाच अनुभव मला इंग्लंडमधल्या सर्व दवाखान्यांत नि कांही होटेल्समधेही पाहायला मिळाला. तिथे 'बायबल' ची प्रत असते )
तर मग, शिरस्त्याप्रमाणे झोपण्यापूर्वी काहीतरी चांगले साहित्य वाचावे म्हणून ज्ञानेश्वरी उघडली नि नेमका अध्याय दृष्टीस पडला तो नववा ! या अध्यायाची सुरुवातच मुळी - "तरि अवधान एकवेळ दीजे / मग सर्व सुखासी पात्र होइजे / हे प्रतिज्ञोत्तर माझे / उघड ऐका //"
मात्र लगेच असेही म्हणतात, "परि प्रौढी न बोलें हो जी / तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं /  देयावें अवधान हे माझी / विनवणी सलगीची //"
याच मूळ ओव्यांना स्वामी अशा स्वरूपात मांडतात - 'आतां अवधान (लक्ष) / एकलेचि द्यावें / मग पात्र व्हावे / सर्वसुखा //' ऐसें असे माझे प्रतिज्ञावचन / ऐका संतजन / उघड हे // तुम्हां सर्वज्ञांच्या सभेमाजीं येथ / नसे हो बोलत / आढ्यतेने (गर्वाने) // द्यावें अवधान / तुम्हीं संतजनीं / माझी विनवणी / सलगीची //'
रहाळकर म्हणतात, " NOW, YOU SHOULD BE FULLY ATTENTIVE SO AS TO BE WORTHY OF TOTAL BLISS. THIS IS MY WORD OF PROMISE TO YOU, O NOBLE BEINGS ! INDEED, I AM NOT SPEAKING TO THIS AUGUST ASSEMBLY WITH A SENSE OF EGO AND PRIDE ON THIS OCCASION. I AM ONLY SUBMITTING TO YOU WITH GREAT AFFECTION.  THEREFORE PLEASE PAY ALL OF YOUR ATTENTION .”
 जरा जास्तच होतंय नाही ? म्हणून तूर्तास थांबतो, कारण तसेहि आपल्याला उद्या लवकर तयार होऊन स्वामी दर्शनाला जायचे आहे. (क्रमश:.....)


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?