Friday, June 30, 2017

 

माणगाव ते गरूडेश्वर भाग ३

माणगाव ते गरूडेश्वर (३)
जराश्या आळसावणाऱ्या नि अंगावर येणाऱ्या मालवण मुक्कामानंतर आपण कोंकणाच्या ओटीपोटापासून नाभिस्थळाकडे मजल दरमजल करीत निघालों आहोत. हा काफिला साधासुधा  ऑर्डिनरी  मंडळींचा नसून तो जाणकार, सूज्ञ नि धीरगंभीर व्यक्तींचा असल्याची मला नम्र जाणीव आहे, म्हणून जास्त वेल्हाळ न लावता नि पाचकळपणाला आवर घालीत हा प्रवास आपण पूर्ण करणार आहोत. मात्र तुमचा सहवास मला फार वेळ गंभीर राहू देणार नाही याची देखील मला खात्री आहेच ! असो !!

कोकणातले रस्ते सरसकट नि सतत नागमोडी असतात. वळणावळणाचे वळणदार. या वळणांनासुध्दा एक लय आहे, एक विशिष्ट लकब. केवळ वळणांसाठी नाहीत ही वळणं तर आपल्याला वठणीवर ठेवण्यासाठीच आहेत ही वळणं ! (पुरे !  आता वळवळायला लागल्या असतील तुमच्या हातांच्या मुठी, म्हणून तुम्हाला मळमळण्याआधी पुढे सरकलेले बरें !)
 या अशा वळणावळणाच्या रस्त्यांबरोबच कोंकणाच्या अनेक विशेष बाबी नजरेत भरतात. पुरूषांचे पोशाख साध्या फुलपॅंटी, जीन्स किंवा अधिकतर अर्ध्या चड्ड्या आणि जर्किन्स असे असले तरी बहुतांश स्त्रिया गुढघ्यापर्यंतच्या नऊवारी साड्यांत वावरताना दिसतील. मात्र चापून चोपून बांधलेल्या अंबाड्यांवर सुंदर फुलांचा गजरा किंवा वेणी हमखास दिसणारच. बोली-भाषा तर इतकी वेल्हाळ, हेल काढून नि गोड की ऐकतच राहावी अशी ! ( मला कोणत्याही बोलीभाषेचं कायम अप्रूप वाटत राहिलेलं आहे. प्रत्येक काही मैलांवर बोलीभाषा बदलते हे वास्तव आहे. जोंवर समजते तोंवर प्रत्येकच सुंदर, श्रवणीय वाटते. मला महाराष्ट्रातल्या सर्व बोलीभाषा त्यांच्या प्रदेशांसह अचूक ओळखतां येतात. इतकेच नव्हे तर लंडनमध्ये बस, ट्रॅम किंवा ट्रेनने प्रवास करतांना सहप्रवाशांच्या आपसातील संवादावरून यूरोपातील जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश किंवा अमेरिकन ॲक्सेंट मी ढोबळमानाने ताडूं शकतो ! (त्याचे मूळ मी एक चांगला श्रोता असण्यांत आहे !) तथापि, खरी कर्णमधुर बोलीभाषा कोंकणीच होSSS !! ) असो !!!
तर मग, आपण कुडाळ कणकवली खारेपाटण मागे टाकत राजापूर नजिकच्या घाटाघाटातून सफाईने गाडी हाकत आहोत. सर्वच भूप्रदेश विलक्षण सृष्टिसौंदर्याने विनटलेला आपण अनुभवीत आहोत. सर्वत्र हिरवेगार गालिचेच जणूं अंथरलेले, डोंगरांवर दऱ्याखोऱ्यांतसुध्दा. नि सर्वच नदीनद स्वच्छ नितळ पाण्याने तुडुम्ब भरलेले. अनेकानेक नीलकण्ठ, भारव्दाज, सारस पक्षांच्या जोड्या नि कावळेपण !
राजापूर शहर डोंगराच्या पायथ्यापासून कळसापर्यंत दोन्हीकडच्या डोंगरांवर वसलेले असून मधोमध नदी वाहते. (असे डोंगरांवरचे दुसरे शहर म्हणजे सिमला ! गतवर्षी इंग्लंडमधे असतांना आम्ही   कॉर्नवॉलच्या नयनरम्य भागांत सहल काढली होती. तिथल्या अनेक डोंगरांवर वसलेली अनेक राजापुरं मी सर्वांना दाखवत सुटलो होतो !!)
राजापूरची विशेष ओळख म्हणजे तिथले जगप्रसिध्द पंचे तसंच जम्बो आंबे !
 प्रा. मधु दंडवते एक महान समाजवादी सांसद,  नि कोंकण रेल्वेचे प्रणेते ; काही मोजक्या राजकारण्यांपैकी मला भावलेले. मधु आणि प्रमिला हे प्राध्यापक जोडपें समाजकारणाशी समरस होऊन राजकारण करणारे, म्हणून मला प्रिय ! फार पूर्वीं बॅ. नाथ पै याच भागातून निवडून आले होते. असो.
राजापूर सोडल्यावर लांजाकडे जाणारा महामार्ग सोडून आपण पांवसच्या रस्त्याला लागूं. पांवस पासून तीन किलोमीटर अलिकडे पर्वताच्या मधोमध जराशी वाकडी वाट करून आपल्याला "गणपती गुळे" येथे जाता येईल. (मात्र गणपती पुळे इथून पन्नास किलोमीटर आहे!)
इथें श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती विराजमान आहे. अतिशय शान्त , रम्य नि अजिबात वर्दळ नसलेलं हे स्थान कित्येकांना माहीत देखील नाही. येथूनच डोंगरासमोरचा विस्तीर्ण सागर किनारा मन मोहून टाकणारा आहे. अरबी समुद्राचा हा विस्तीर्ण किनारा भल्या मोठ्या बीचमुळे अतिशय प्रेक्षणीय आहे, नजरेचं पारणं फेडणारा.
आतां पांवस खरोखरच हाकेच्या अंतरावर आहे. तिथे लगबगीने पोहचून आपल्या नेहेमीच्या आवडत्या 'माऊली माहेर' मधे आपण मुक्काम करणार आहोत. श्री टिळकांनी आपली राहण्याची चोख व्यवस्था आधीच करून ठेवली आहे केवळ एका फोनकॉलवर  नि आपल्या फरमाइशीप्रमाणे फणस भाजीसकट जेवण तयार असेल.
तर चला बिगीबिगी !


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?