Tuesday, June 27, 2017

 

माणगाव ते गरूडेश्वर (२)

माणगाव ते गरूडेश्वर (२)
माणगावच्या पवित्र वातावरणाला अंत:करणांत जपून ठेवत आपण जरा मौजमस्ती करायला जगप्रसिद्ध मालवण शहरीं कूच करूं. मालवणची ख्याती नजिकच्या काळांत जगभर पसरवणारे मच्छिद्र कांबळी ( पांडगो इलो रे इलो फेम ) नि आतां अस्मादिक !     खरोखर, प्रत्यक्ष भेट दिल्याबिगर तिथली खुमारी कळणारच नाही. म्हणतात ना – SEEING. IS. BELIEVING -  तसे !
मालवणकडे जाताना वाटेत पिंगुळी नावाचं एक खेडेगाव भेटतं. तिथे  हमरस्त्याच्या दोन्ही बाजूस पसरलेला एक आश्रम आहे (माझ्याबरोबर प्रवास करताना आश्रम, बाबा, बुवा, साधू, संत यांच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही बुवा !)  तर, तिथे एक भव्य आणि रम्य शिवालय तर आहेच पण तेथील मठाधिपती देखील अतिशय तेजस्वी, देखणे आणि सिद्धपुरूष भासले . मी सहसा कुणाला सिद्धबिद्ध मानायला तयार नसतो, पण प्रथम दर्शनाचे वेळीं नि नंतरही त्या व्यक्तिमत्वात काहीतरी विशेष असल्याची जाणीव होत राहिली एवढे मात्र खरे. असो !
वाटल्यास थांबून दर्शन घेत किंवा सरळ त्या सर्वांना डावलून पुढे सटकायला आपल्याला अडवायची कुणाला हिंमत होईल ?

मालवणच्या जवळजवळ जाताजाता समुद्रावरून येणारा खारट दमट वारा आपले स्वागत करतो. त्या वाऱ्यात परमेश्वराच्या प्रथम अवताराच्या  मांदियाळीचा सु (?) गंध दाटलेला असतो. माणगावचा विस्तार भारतातीलच सर्वच शहरांप्रमाणे सर्व बाजूंनी झालेला सहज जाणवतो. बऱ्यापैकी ‘माडर्न’ शहर आहे हे; तसेच काही सुंदर बंगले आणि लांबलचक बाजारपेठ लक्ष वेधून घेतात.
ते असो ! इथलच्या प्रेक्षणीय जागा म्हणजे ‘धी रॉक गार्डन’, धुरूवाडा बीच, किल्ले सिन्धुदुर्ग , तारकरली बीच ,  करली नदीचा समुद्रसंगम, जय गणेश मंदिर. (हे गणपती मंदिर श्री जयंत साळगावकर ( कालनिर्णय फेम) यांनी उभारलेले असून तेथील भव्य, दिव्य, सुंदर गणेशमूर्तीवर सोन्याचा मुलामा चढवलेला आहे. )

या मंदिराच्या सभागृहात काही वेळ विसावलो असतांना कुठून तरी अचानक दरबारी कानडाचे धीरगंभीर स्वर कानीं पडले आणि मन गेल्या शतकातील दिग्गज गायक-वादकांच्या स्मरणात रंगून गेले. खरंच, कोंकण, गोवा नि कर्नाटकातल्या कित्येक मातब्बरांनी सर्वच मराठी कानांना तृप्त तृप्त केलंय नाही ? ज्योत्स्ना भोळे, जितेन्द्र अभिषेकी, रामदास कामत, प्रभाकर कारेकर, प्रकाश घांग्रेकर, प्रसाद सावकार, मल्लिकार्जुन मन्सूर, भार्गवराम आचरेकर, श्रीपादराव नेवरेकर ; किती किती नांवे आठवावीत ? त्या रम्य दिव्य आठवणींतून बाहेर पडावेसे वाटेचना ! असो !!

माझा पहिला डोळा निकामी झाल्यावर काही दिवसांनी मी माझ्या भावंडांबरोबर तोंडवळीला आले असतांना  इथून जवळ असलेल्या अंगणेवाडीतल्या भराडीदेवीच्या जलमंदिराला भेट दिली होती. नवसाला पावणारी ही देवी एका मोठ्या वारूळाच्या स्वरूपात आहे, मूर्तीरूपांत नव्हे ! संपूर्ण मंदिर पाण्याने वेढलेले आहे. त्यावेळी संध्याकाळ झालेली असल्याने मला नीटसे काहीच दिसत नव्हते ; एरव्हीं नवससायासांवर फारशी श्रद्धा नसलेला मी कदाचित अगतिकपणे बोलून गेलो की हे देवी, मला बऱ्यापैकी दिसूं लागले तर पुनःश्च तुझ्या दर्शनाला येईन. आज तुमच्यामुळे तो नवस नकळत फेडला जातोय !

तुम्हाला तारकरली आणि धुरूवाडा बीचवर जाऊन तिथल्या दर्यासारंग किंवा चैतन्य मधे भरपूर मासे नि झिंग्यांचा समाचार घ्यायचा आहे याची मला नम्र जाणीव आहे, म्हणून तूर्तास क्षणभर विश्रांती !

मात्र उद्यापासून हे सर्व रजतमात्मक उपद्व्याप बाजूला ठेवून पांवस च्या पुण्यभूमीत आपल्याला मुक्काम करायचा आहे, तोंवर गुडनाइट नि बाSSय !!



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?