Monday, June 26, 2017

 

माणगाव ते गरूडेश्वर (१)

माणगाव ते गरूडेश्वर
माणगाव हे कोंकणातील परम पूज्य वासुदेवानंद सरस्वती यांचे जन्मस्थान आणि गुजरातेतील गरूडेश्वर त्यांचे विश्रांतिस्थान.  साहाजिकच दोन्हीही परम पावन, प्रेरणादायी नि उल्हसित करणारी तीर्थस्थानें ; म्हणून चला माझ्याबरोबर निदान एक सहल म्हणून ! या सहलीतून काही भरीव मिळो न मिळो, तुमचा कायम सहवास तर नक्कीच मिळेल ! तर मग चलताय ना माझ्यासोबत ?
प्रवासासाठी आपली घरचीच गाडी घेवूंया . नको, वेगळ्या ड्रायव्हरची गरज नाही, मला अगदीच थकवा आला तर तुम्ही काही वेळ सारथ्य करा ! (पण ती वेळ बहुधा यायची नाही, तुम्ही निवान्तपणे सहलीचा आस्वाद घ्या )
बरोबर काय काय घेतलंय् ? म्हणजे वाटेत जे जे मिळेल ते तर आपण घेणार आहोतच , तरी पण खारे दाणे, सुका मेवा (नि थोडी उकडलेली अंडीं) हॅंडी राहातील नाही ? नको, जोवणाचे डबे वगैरे नकोत ; असंय् की आपण ज्या ज्या प्रदेशांतून जाऊ तिथली खासीयत तर चाखायला हवीच ना !
पुणे-मुम्बईहून कोकणात उतरायला किमान एक डझन घाटरस्ते आहेत. सगळेच भन्नाट आहेत, मात्र यावेळेस आपण सातारा कोल्हापूर निप्पाणी बेळगांव करीत आंबोली घाट उतरूंया . त्याचे कारण असे की हा सम्पूर्ण बेल्ट कायम हिरवागार नि आल्हादित करणाराच असतो.
बेळगांव पर्यंतचा रस्ता तर इतका गुळगुळीत आणि अप्रतिम झालाय की आपण तिथे कधी पोंचलो ते समजणारच नाही. बेळगावीं पोहोचल्यावर श्रद्धा असेल तर नजीकच्या बाळेकुन्द्रीला दत्तस्थानी मथ्था टेकून यायला माझ्यासारखेच तुम्हालाही आवडेल. एक अतिशय रम्य परिसर आणि बाळेकुन्द्रीकर महाराजांच्या वास्तव्याने आणि तिथे येणाऱ्या असंख्य साधकांमुळे इथे नेहमीच प्रसन्न वातावरण असते नि म्हणून किमान एकदा तरी भेट द्यावी अशी मी शिफारस करेन. बेळगांवला पूज्य कलावतीदेवींचा (आई) सुंदर आश्रम आहे ; बहुधा तुम्हालाही तिथे यायला नक्कीच आवडेल.
ते असू देत ; निदान कर्णाटकी पद्धतीचे इडली-वडा-साम्भार तरी तुम्हाला आवडेलच, मैसूर डोश्यासमवेत ! भरपूर नारळाच्या वापरामुळे एकतर तीं जळजळीत नसतात नि दोनच तासांत पचल्यामुळे बेळगांवी कुन्दा, धारवाडी पेढा वगैरे मटकवायला आपण मोकळे !
निप्पाणी किंवा बेळगांवहून आंबोलीकडे जायला दोन मार्ग आहेत ; एक राजमार्ग आणि दुसरा जरा आडवळणीचा. मला दुसरा मार्ग कायम भावतो, कारण माझ्या स्वप्नांतली अनेक खेडीपाडीं मला जवळून पाहता येतात. अंमळ थांबून वाडीवरचा रानमेवा चाखता येतो ; मुख्य म्हणजे त्या खेडुतांशी जरा संवाद साधतां येतो. पिका-पाण्याच्या गप्पांबरोबरच त्यांच्या भल्यामोठ्या अनुभवांची झलक पाहायला मिळते (नि आपल्या निव्वळ पुस्तकी ज्ञानाची कधीकधी कींव कराविशी वाटते. ) असो !
खरंतर घाटमाथ्यावरची खेडीपाडीं नि माणसें आणि तळकोकणांतील वास्तव किंचित तिरक्या नजरेने (Squint)  पाहायला जमलं तर बराचसा विरोधाभास नजरेस येईल. पण तेही जाऊं देत ; आज तो विषय चर्चेसाठी नको . पुन्हा कधीतरी.
आंबोली ते सावंतवाडी असा अतिरम्य आणि बराचसा खट्याळ घाट सर्वांनाच पूर्णपणे जागृत ठेवून अनेकांना सक्तीचे नामस्मरण करायला भाग पाडतो ! वळणावळणावर दृग्गोचर होणारी निसर्गकिमया मोहित करते, भुलवते, एका वेगळ्याच पातळींवर विराजमान करवते आणि पुढच्याच वळणाआधी करकचून दाबलेल्या ब्रेकमुळे पुन्हा भानावर आणते !!
सावंतवाडी हे शहर अति पुरातन असून अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. इथली लांकडी खेळणीं जगप्रसिद्ध आहेत. इथे आपल्या इच्छाशक्तीची परीक्षा असते. एक मन म्हणते डावीकडे वळून गोवा सफर करावी. दुसरे मन म्हणते नको माणगावलाच जाऊंया ! पुन्हा सरशी होते दुसऱ्या मनाची ; आपण उजवीकडे कुडाळच्या दिशेने गाडी वळवतो !
सावंतवाडीपासून सतरा किलोमीटर कुडाळच्या अलीकडे नऊ किलोमीटर आतल्याबाजूस डोंगराच्या कुशीत माणगांव वसवलेलं आहे. परमपूज्य टेम्बेस्वामी, वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ थोरले महाराजांनी इथे जन्म घेतला. दत्तसंप्रदायातील या कर्मठ कर्मयोग्याने स्वकर्तृत्वावर दत्तसंप्रदायाची धुरा समर्थपणे वहन केली. सम्पूर्ण भारतभर हिंडून अनेकानेक चातुर्मास अतिशय चोखंदळपणे पार पाडले. भरगच्च स्तोत्रें, आरत्या आणि विपुल आध्यात्मिक वाड्मयाची संस्कृत आणि मराठी भाषेंत  निर्मिती केली. पूर्ण अनासक्त विरागी सत्पुरूष म्हणून त्यांची ख्याती असून परमपूज्य नानामहाराज तराणेकरर, वामनराव गुळवणीमहाराज, नारेश्वरचे रंगावधूत महाराज, संत गांडामहाराज इत्यादी नामवंत शिष्योत्तम त्यांचे कार्य पुढे चालवीत राहिले. त्यांची अनेक स्तोत्रें, करूणात्रिपदी इत्यादी लाखों घरांतून प्रत्यहीं भक्तीभावाने आळवली जातात.
इथला संपूर्ण परिसर एका अनामिक दैवी स्पंदनांनी भारलेला आहे याची जाणीव आपण इतरांपासून थोडे बाजूला होऊन एकट्याने फिरताना अनुभवता येवूं शकते. खरंतर अशा ठिकाणी तरी आपले आपण मौन धारण करून संपूर्ण परिसर पाहावा, अनुभवावा. संतांनी वास्तव्य केलेले प्रत्येक स्थान प्रचंड शक्तीची पीठें असतात ही वस्तुस्थिती ध्यानांत ठेवायला हवी. आणि जमेल तेव्हढी आपल्या अंतर्मनांत साठवून घ्यावी. त्यासाठीच मौन बाळगीत अंतर्मुख होण्याची संवय लावायला हवी !
जरा विषयांतर झाले खरे, पण मला थोडं सहन करणे तुम्हाला क्रमप्राप्त आहे ! असो !!
आश्रमातील सुग्रास, रुचकर अन्नप्रसाद ग्रहण करून तेथील अतिशय सुंदर दत्तमंदिरादि परिसर पुन्हा एकदा डोळाभरूम पाहिल्यावर आपण पिंगुळी मार्गे मालवण-तार्कर्ली कडे कूच करूया. ( तिथे पापलेट, सुरमई, बांगडा, झिंगे वगैरे मंडळी तुमची आतुरतेने वाट पाहात असणार !! )
क्रमश:...............



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?