Sunday, April 23, 2017

 

निगूढ मन

निगूढ मन
मन या शब्दावरच इतके शब्द लिहिले-बोलले गेले आहेत की त्यांत आणखी काही शब्दांची भर पडली तर फारसे बिघडणार नाही ! संत, कवी, तत्वज्ञ, तर्कट, तसेच मनोवैज्ञानिकांची समस्त कुळी या मनाचा शोध घ्यायला सरसावली; मात्र स्पष्टपणे  कुणालाच याचा थांगपत्ता लागला असावा असे वाटत नाही. तसे झाले असते तर माणसाचे जिणे अवघड होऊन बसले असते कारण इतरांच्या मनाचा मागोवा सहजपणे घेतां आला असता आणि कोणाचीच ‘गुपितें’ गुप्त राहिली नसती; खरें तर आयुष्याला फारसा अर्थही राहिला नसता !
चिंता, भय, हुरहूर हे केवळ मनाचेच उपद्व्याप आहेत आणि त्याच अनुषंगाने उद्भवणारे बहुतांश आजार ‘मना’कडे अंगुलीनिर्देश करतात.
तर मग, हे “मन” म्हणजे नक्की काय आहे ? कुणी म्हणतात, ‘ It’s a bundle of thoughts and desires’! -विचारांचे भेंडोळे, वासनांचा गुंताडा !! “गीता” म्हणते - सहावें इन्द्रिय - अदृष्य, पण ‘असलेलं’!
म्हणजे, त्याचे अस्तित्व आहे तर . मग तें कसे असतं; कुठे असतं?  काय करतं नि कसं निर्माण होतं आणि कसं नष्ट होतं .....? ते सरळ राहूं शकतं की त्याला वाकवितां येते ? निदान वळवतां तर नक्कीच येत असेल नाही ? ते कसं फोफावतं नि कसं ऊन्मळून पडतं ? त्याला आटोक्यात ठेवतां येते का ? (आणि तें जर इन्द्रिय असेल तर त्याचे आरोपण  -‘ट्रान्स्प्लॅंट’ करता येईल काय ?!!!) (एका परीने तें अदृष्य असतं हे बरेच आहे म्हणा, कारण या ‘हाय-फाय’ टेक्नॉलॉजीच्या युगात कधीच एकाचे काढून दुसऱ्यावर ‘फिट्’ करून टाकले असते! तसे पाहूं गेल्यास  हवा, वीज नि इंटरनेटसुध्दा  अदृष्यच असतात की !! असो !!! )

आधीं पाहूंया या मनाच्या जडणघडणीचे शास्त्र ! स्वामी दृष्टान्त देतात कापडी वस्त्राचा. एकएक उभा-आडवा धागा विणून बनविलेले वस्त्र, एकेक धागा विस्कटून टाकल्यावर वस्त्र शिल्लकच राहात नाही ; अगदी तस्संच मन विणलं गेलंय एकेका विचाराचे, वासनांचे, इच्छा नि आकांक्षांचे. एकेक करून त्या काढून टाकल्या तर थियरॉटिकली मन संपविणे शक्य व्हावं. पण खरंच तें शक्य आहे कां ? कारण ही वीण वारंवार झालेल्या संस्कारांमुळे, आघातांमुळे आणि काळाच्या हातोड्यांमुळे इतकी घट्ट, चिवट झालेली असते की तिला उकलणे किंवा विस्कटणं अशक्यप्राय व्हावं ! पिळावर पीळ बसून भक्कम झालेल्या मनाला अधिक पीळ बसूंच शकत नाहीत ; तें निर्ढावतं , नि म्हणून मराठीतला वाक्प्रचार - ‘त्याच्या मनाला काही पीळ पडला नाही’!

मात्र या मनाचं एक बरं असतं - त्याला गोडी लागली तर ते सोकावतं ! ( कां जे यया मनाचें एक निकें । जे देखिले गोडीचिया ठाया सोके । म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजें ।। ( ज्ञा. ६/४२०) .
म्हणूनच मनाच्या घडणीला महत्व . आदर्श अशी उत्तम संस्कारांची, उत्तम विचारांची जडणघडण लाभली तर ते महद्भाग्यच. आपल्या धर्मशास्त्रांप्रमाणे पुनर्जन्म गृहीत धरून सुसंस्कारांचं, सद्वासनांचं गाठोडं घेऊन पुढील जन्म “शुचीनां श्रीमंतां गेहे......” या उक्तीप्रमाणे सम्पन्न करणे शक्य आहे ; पण आत्तां या जन्माचे काय ? आत्तां तरी मला याच मनाबरोबर जगणे क्रमप्राप्त, नव्हे अनिवार्य आहे ! आणि म्हणूनच केवळ जिज्ञासा म्हणून नव्हे तर गरज म्हणून थोडं अधिक ‘गंभीरपणे’ या प्रकर्णाकडे पाहिलं पाहिजे.

या मनाबद्दल देवांनी, संतांनी, सत्पुरूषांनी काय थोडं सांगून लिहून ठेवलंय ? ‘मनाचें श्लोक’, ‘मनोबोध’, ‘मन:शांती’, ‘मनोनिग्रह’ नि ‘मनोविकार’सुध्दा !
बरं, हे मन तरी प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व असलेले असेल काय ? बहुधा नाही . कारण जगांतील इतर कित्येक मनांबरोबर जोडलेले, निगडीत, ‘लिंक्ड’ ; त्या एकाच अतिविशाल विश्वमनाचा एक अंश!

मनाचें तीन घटक (components) वर्णन करता येतील ; त्रिगुणात्मक – सत्व, रज नि तम.
सत्व-गुणांत स्थैर्य, दया, क्षमा, शांती इत्यादींचा समावेश ;
रजो-गुणांत चांचल्य, धडपड, क्रोध, मोह इत्यादींचे प्राबल्य ;
तर तमो-गुणी सहसा त्रासदायक, स्वत:चे नि इतरांचे अहितच करणारा !
तीन स्तर – (levels) – जागृत, अर्धजागृत आणि अतिजागृत (conscious, sub-conscious and super-conscious ) .
चार कार्यें – संशय, निश्चय, स्मरण आणि अहंभाव !
पाच अवस्था – (१) क्षिप्र – सगळीकडे विखुरलेली,
(२) मूढ – भ्रष्टाचारी ; (३) विक्षिप्त ; (४) एकाग्र – अखंड तैलधारावत् आणि (५) निरूध्द (प्रतीकात्मक) !

मनाचें स्वरूप ? – सूक्ष्म देहाचं बनलेलं – गतिमान, शक्तीशाली.
खरं तर स्थूल आणि सूक्ष्म देहांमध्ये केवळ स्पंदनांचा फरक. Matter and Energy are in different ‘forms’, but are ‘inter-changeable’.
मनाच्या घडणीवर ‘अन्ना’चा विलक्षण प्रभाव सांगितला गेला आहे. जसं अन्न तसे मन. अन्न किंवा आहार म्हणजे केवळ तोंडावाटें पोटांत जाणारे नसून कान, डोळे, नाकाद्वारे शरीराने घेतलेला आहारदेखील ! म्हटलंच आहे –‘नजर चंचल, मन चंचल ; नजर स्थिर, मन स्थिर’! मनाला वासनेचा मसाला लावल्याशिवाय मन कोणत्याही गोष्टीच्या आहारीं जाऊं देत नाही. नजर बिघडली तर मन बिघडतं आणि अस्थिर मन एकाग्र होऊं शकत नाही !

मन इतकं चंचल, की त्याला माकडाची उपमा दिली -Monkey mind ! आणि सळसळणाऱ्या नागिणीचीसुध्दां . ‘विषयांचं मद्य, विषयाचा डंख, नागमोडी चाल, दोन विखारी दात- “मी नि माझं” ! तरीपण मन नागाप्रमाणे “नादा” बरोबर डोलतं – ओंकारनाद, नामस्मरण!!
 मग अशा मनावर अंकुश ठेवतां येईल ? मनोनिग्रह शक्य आहे? होय ; भगवन्त म्हणतात, “अभ्यासानं – वैराग्यानें”!
आणि मनोलय, मनोनाश, मन जाळणे ? – केवळ ज्ञानाग्नीतच!! (तुम्हांआम्हाला सोपं नाही !)
मग मनाला थोपवतां येईल -ब्रेक लावतां येईल ? निदान वळवतां तर येईल ? नक्कीच ! मनाला वर्तुळाकार वळवीत राहिलं तर त्याचा वेग मंदावेल आणि हळूहळू तें स्थिर करतां येईल.
आपल्या अनावर इच्छा-वासनांना हळूहळू आवर घालता आला तर? अन्न, पैसा, वेळ, शक्ती यांचा दुरूपयोग टाळायला शिकलो तर या अमूल्य बाबींची बचत तर होइलच नि मनाला तसे वळण लागेल. आणि या गोष्टींचा अति आणि अनिर्बंध वापर म्हणजे एकाप्रकारें हिंसा नव्हे काय ? कारण यापैकी प्रत्येक गोष्टीचा गैरवापर होत असतांना आपण वंचितांवर अन्याय करीत आहोत ही भावना अशा प्रकारच्या अपरोक्ष हिंसेपासून आपल्याला रोखूं शकते !

ज्ञानाचा नित्य वैरी म्हणजे इच्छा-आकांक्षा-वासना. म्हणून वासनांवर नियंत्रण आवश्यक. वासनांना रोखा, नियंत्रित करा, बंधन घाला, सुसूत्र करा, शुध्द करा – हा आहे दिव्य संदेश !
एकाग्रतेसाठी दोन बंध महत्त्वाचे – शिस्त व संयम. ध्यान म्हणजे चिंतन नव्हे – तर दोन विचारामधील गॅप किंवा अंतर – निर्विचार असणे !
मौनसाधना मनाला भरकटण्यापासून थोपवून शकते. म्हणूनच नि:शब्द, प्रशांत वातावरणात मनाचेंही व्यापार स्थिरावतात. मौनाला आध्यात्मिक साधनेत प्रचंड महत्व आहे.
‘एकान्त’ अतिशय पोषक आहे मन स्थिर करायला. स्फुर्ती-प्रतिभेसाठी एकान्त आणि अभिव्यक्तीसाठी लोकान्त – हे सूत्र आहे. समर्थ रामदास म्हणत, ‘जयाला एकान्त मानवला, सर्वकाही सुचे त्याला’. तुकाराम महाराज साधकांना उपदेश करतात, ‘बैसोनी निवान्त शुध्द करी चित्त, तया सुखा अन्त पार नाही’’
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या सुंदर इंग्लिश शैलीत सांगतात, ‘Solitude of the soul is the birthplace of religion’!
जेव्हा मनाच्या साऱ्या शक्ती एकाच विषयावर केन्द्रित करणे आवश्यक असते, तेव्हा एकान्ताशी नातें जोडावेच लागते. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, ‘शहरांतील माणसे सतत गर्दीत वावरत असतात ; त्यांच्या चित्त्ताची व्यग्रता वाढते ; तीं बहिर्मुख होतात ; त्यांना दिसेल ते पाहायला आवडूं लागते, मिळेल ते खाणे आवडूं लागते. आपल्या मनांत काय चालले आहे ते अभ्यासणे अवघड वाटते ; आपल्या मनोदेवतेची हाक त्यांना ऐकता येत नाही. थांबण्यापेक्षा धांवणे व पोहोचण्यापेक्षा परत फिरणे आवडूं लागते. कशाची तरी हाव नि त्यापायी धावाधाव असे जीवनाचे रूप होते.’

खेड्यापाड्यांत एकप्रकारचा सुखद एकान्त लाभतो ; रानामळ्यात निसर्गसहवास लाभतो. या सहलींत एकप्रकारचा गतिमान एकान्त मिळतो ; चालताचालतां वाट सोडतां येते, बाजूला होता येते, पुन्हा वाट वहिवाट होते! आकाशांत पक्षी भरारी घेतात. त्यांना दिशा असते पण वाट नसते. थव्याथव्याने आपले अस्तित्व न विसरतां परस्परांचें सहचर होतात, सहभागी होतात. माणसांनाच हे जमले पाहिजे. सतारीची प्रत्येक तार आपला स्वर आपल्याच ठायी ठेवून योग्य त्या क्षणी स्वरसंभारात तो समर्पित करते. माणसांनी आपले व्यक्तिमत्व जपावे, जोपासावे, पूर्णत्वाला न्यावे. जेव्हा सामाजिक संदर्भात गरज निर्माण होईल तेव्हां सर्वस्वानिशी त्या कोंदणांत प्रगट व्हावे. गरजेशिवाय गर्दींत घोटाळत राहणे, एखाद्या कोंडाळ्यात अडकून पडणे किंवा एखाद्या जल्लोशांत भान हरवून बसणे – ही समाजशीलता नव्हे. पंचतारांकित जीवनाकडे पाठ फिरवणे व धृवताऱ्यावर नजर ठेवून जीवनयात्रा पुरी करणे – हा स्वधर्म झाला पाहिजे. या धर्मपालनामुळे लाभणारी सिध्दी ही समाजसेवेसाठी उपयोगात आणली पाहिजे.
रामकृष्ण परमहंस म्हणत, ‘मन मुख एक करो’. म्हणजे योग्य कळतं, पण आचरणांत येत नाही – अयोग्य कळतं पण केल्याशिवाय राहवत नाही ! किंवा, व्यभिचार स्वत:शीच – जो सोचते हैं वह करते नही, लेकिन करते हैं बिना सोचे !!

स्वामी म्हणत, मनाला योग्य वळण लावण्यासाठी – ‘या क्षणींचा मोह टाळा ; आत्तां नाही – postpone ! वर्तमानात जगा. साक्षीपणाने बघा. उच्च विचारांचे चिंतन करा – विचार अतिशय महत्त्वाचे, शब्द नाही. आचारसिध्द विचार, कृतिप्रधान विचार खरा विचार !

‘मन’ या विषयावर लिहायला बसलो खरा, पण जसजसे विचार डोक्यात गर्दी करूं लागतात तसतसे माणसांच्या आचारविचारांवर , म्हणजेच परिणामी कृतीवर गाडी घसरतेच. कारण मनाच्या प्रेरणेशिवाय कृती घडणे अशक्यच.
कवीचे मन प्रतिभेच्या स्वरूपात उत्तुंग भराऱ्या घेते आणि कित्येकदां ‘जो न देखे रवि – वो देखे कवी’ ही उक्ती सार्थ करते.
चिंता करताना तेच मन वैरीही चिंतणार नाही अशा कल्पना करते. अतिशय चिवट, चिकट म्हणून मन वढाळ वढाळ म्हटलं जातं, नि तेच पाखरासारखं भिरभिरायलाही लागतं !
परमेश्वर म्हणतो, ‘मला पाहायचं असेल तर समाजांत शिरा आणि स्वत:ला पाहायचं असेल तर एकान्तांत बसून स्वत:ला न्याहाळा ! म्हणजे साक्षी बनून आपल्या मनाचें सर्व उपद्व्याप शांतचित्त होऊन पहा !
हें मन आपल्या अहंगंडाला, न्यूनगंडाला, अभिमान, मत्सर, तिरस्कार, क्रोध आणि निराशेला कारणीभूत नि तेंच आनंद, समाधान, संतोष, शांती आणि ऋजुता यांचेही माहेरघर. समाजांत आचरण करताना हे मनच – ‘सुखी लोकांशी मैत्री, दु:खितांविषयीं करूणा निर्माण  करते , पुण्यवानांबरोबर आनंदी असते नि पापी लोकांची उपेक्षा घडवून आणते’ !!

शेवटीं एकच विद्या महत्वाची – मनावर नियंत्रण ठेवण्याची ! जसं मन तसाच माणूस ; मन ठिकाणावर तरच समस्त मानव जातीचं अस्तित्व ; ते बिघडलं तर बाकी सर्व शून्य !!
मनावर नियंत्रण ठेवण्याचे सर्व उपाय खरे तर तात्पुरते असतात, या विधानावर दुमत असणे शक्य आहे, मात्र अनुभवून पाहाण्यासारखा एक प्रकार म्हणजे आपले मन, बुध्दी ईश्वरचरणीं, सद्गुरूचरणीं किंवा आपल्या उपास्याप्रत वाहून टाकणे. याचा अर्थ निष्क्रिय होणे नव्हे, तर सर्व विहित कर्में करीत राहून फळाची अपेक्षा न करता उपेक्षा करणे, निराश न होतां निराशी होणे !
असे काही अनुभव मनाला गोड लागतात, मन सोकावते पुन:पुन्हा तसा अनुभव घेण्यासाठी; कारण सद्गुरूचरण उपासता उपासतां मन शिल्लकच राहात नाही आपल्या माकडचेष्टा करायला ! (म्हणौनि हें अनुभवसुखचि कौतुकें / दावीत जाइजे // - ज्ञानेश्वर महाराज)

इति शम् !
प्र. शं. रहाळकर
पुणे २३ एप्रिल २०१७


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?