Wednesday, January 25, 2017

 

श्रोते हो....!

श्रोते हो....!
नवविधा भक्तीमध्ये ‘श्रवणाला प्रथम स्थान मिळाले आहे. संत कबीर म्हणतात, ‘सुनो भई साधो !’ स्वामी म्हणतात, ‘Listen ! God’s voice can be ‘heard’ (only in the depth of Silence) ‘ ! आमची वेद-उपनिषदें जतन केली गेलीं ‘श्रुति’-स्मृतीं मुळेंच. ज्ञानेश्वर महाराज एक पाऊल पुढे जावून म्हणतात, ‘ अवधारिजो जी !’ -लक्ष देऊन श्रवण करा ! आमची सगळी संतचरित्रें गात असताना श्रोत्यांना आळवले आहे प्रत्येक चरित्रलेखकाने. समर्थांनी तर श्रोता कसा असावा यांवर एक संपूर्ण समासच लिहिला आहे श्री दासबोध या ग्रंथांत !
असा हा श्रोता !
नुकतेच श्री मुरारीबापूंचे एक प्रवचन ऐकण्यात आले. त्यांत त्यांनी श्रोत्यांची केलेली गटवारी उद्बोधक वाटली. खरं तर ती गटवारी नसून एका पायरीवरून दुसरीवर चढत जाण्याचा सोपान (जिना) वाटला. श्रोत्याची पहिली पायरी ‘विद्यार्थी-रूपी’, -जिज्ञासू, परिक्षा घेणारा- परिक्षा देणारा . दुसरी पायरी -‘साधकरूपी’ - प्रात्यक्षिक (practice ) करून पाहणारा ; तिसरी पायरी शिष्य-स्वरूपातील , व्यास गादीला - नव्हे वक्त्याला गुरूसमान मानणाऱ्या शिष्याची . ज्या ज्या व्यक्तीपासून , नव्हे , वस्तूपासून जे जे शिकायला मिळेल ते ते ग्रहण करणाऱ्या या शिष्योत्तमाची - दत्तात्रेयांचा आदर्श डोळ्यांपुढें ठेवून शिष्यरूपी श्रोत्याची ! चौथी पुत्रवत . पूर्ण श्रध्देने आदरपूर्वक पित्याकडून मिळणाऱ्या विचाररूप सम्पत्तीचा संचय करीत प्रत्यक्ष आचरण करणारा आज्ञाधारक , कर्तव्यतत्पर सुपुत्र .
असा हा श्रोत्यांचा ‘ सोपान ‘!
खरं तर हा सोपान येथेच संपणारा नाही . असे म्हणतात कीं येशू ख्रिस्ताने जेव्हा आपले इहकार्य सुरू केले तेव्हा तो आपल्याला ईश्वराचा ‘प्रेषित’ ( messenger of God ) असे म्हणें ; कालांतराने तो स्वत:ला ‘ईश्वरपुत्र’ म्हणू लागला आणि सरतेशेवटीं पूर्ण जाणीव होतांच ‘मी आणि ईश्वर एकच आहोत’ असा साक्षात्कार त्याला घडला !
खरं तर वक्ता आणि श्रोता पूर्णपणे समरस होण्यासाठी लागणारी तन्मयता येण्यासाठी ज्या प्रकारच्या ध्वनिलहरी -wavelengths- जुळायला हव्या त्या जुळल्या की झालं. त्या कशा जुळतील , केव्हा जुळतील ते सांगणे अवघड आहे . मात्र इतकं खरं की शुष्क, जड,   अभिरूचीहीन तत्वज्ञानापेक्षा कथानक स्वरूपातील वक्तव्य अधिक जीवन्त , गतिमान वाटतं. ते एवढ्यासाठी की श्रोता त्या कथानका सोबत स्वत:ला समरस करून घेत त्या प्रवाहात मनाने चालत राहतो . त्याचे मन:चक्षूंसमोर जणू त्या कथानकाचे चलचित्र चालू असते !
मात्र डोळ्यांना जे पाहायचे नाही ते टाळण्यासाठी डोळे बंद करण्याची सोय आहे ती कानांना नाही ! इच्छा असो वा नसो , कानांवर पडणाऱ्या सर्वच ध्वनिलहरी ऐकण्याचे सक्ती निसर्गाने केली आहे. म्हणजेच कानावर जे जे पडेल त्याचा विनियोग किंवा विल्हेवाट लावायची जबाबदारी त्या श्रोत्यावर येऊन पडते !!
या निमित्ताने बिरबल-अकबराची एक आख्यायिका आठवली . बिरबलाचे बुध्दिचातर्यास आव्हान म्हणून तीन हुबेहूब अर्धपुतळे तयार करून घेण्यात आले - अगदी बारीकसारीक तपशीलात सारखे दिसणारे . मात्र मूर्तिकाराने मूर्ती घडवताना प्रत्येक पुतळ्यांत एकेक खुबी गुप्तपणे ठेवली होती आणि त्या खुबीद्वारे त्या मूर्तींमधील वेगळेपण सिध्द करायचे होते. बिरबलाने तिन्ही पुतळे काळजीपूर्वक पाहिले. बाह्यत: एकाही पुतळ्यात काहीच वेगळेपण दिसले नाही. त्याला एक युक्ती सुचली ; त्याने एक लवचिक तारेचा तुकडा मागवला ; त्याचे एक टोक एका पुतळ्याच्या कानातून आत सरकवले आणि ती तार दुसऱ्या कानातून बाहेर आली . दुसऱ्या पुतळ्याच्या कानातून सरकवलेली तार त्या पुतळ्याच्या तोंडातून बाहेर आली आणि तिसऱ्या पुतळ्याच्या कानात घातलेली तार बाहेर आलीच नाही - बहुधा ती पुतळ्याच्या पोटात किंवा डोक्यात गडप झाली होती !!
यांतील मतितार्थ समजायला सोपा आहे - काही लोक एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून देतात ; काही लोक जे जे ऐकतील ते - अगदी गौप्य असलं तरी - जगजाहीर करायला मागेपुढे पाहात नाहीत. काहीजण मात्र ऐकलेले चित्त्तांत सांठवून घेतात , चिंतन करतात आणि त्यातून ज्ञानप्राप्ती साधून घेतात .
मला वाटतं, श्रोत्याची खरी जबाबदारी एक चांगला चिंतनशील होण्याची आहे. चिंतनाद्वारें विचारांना योग्य दिशा मिळू शकते आणि योग्य दिशेने केलेले विचार अतिसूक्ष्म असले तरी अतिशय प्रेरक आणि शक्तिमान होवू शकतात - होमिओपॅथीच्या वाढत्या ‘पोटन्सी’ प्रमाणे ! किंवा एखाद्या ‘लेजरबीम’ प्रमाणे. असा एखादा चिंतनशील साधक , नव्हे सिध्दच , दुसऱ्यांच्या मनातील भाव सहज ओळखूं शकतो - ज्याला clairvoyance असेही म्हणतात. कारण कदाचित योग्य चिंतनाद्वारे त्याचे अंतर्मन विश्वमनाशी एकरूप होत असावे.........!
थोडं विषयांतर होतंय , तथापि चिंतन करावे - चिंता करू नये ; आणि केलीच तर ‘समर्थांच्या - चिंता करितो विश्वाची’ -  या स्वरूपात असली तर हरकत नाही !!!
असा चिंतनशील श्रोता व्हायला कुणाला आवडणार नाही ?

जय साईराम !

प्र.शं.रहाळकर
पुणें



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?