Friday, January 13, 2017

 
माझी कविता

१)
“एक वृध्दा ऐंशीतली....!
एक वृध्दा ऐंशीतली
    चढली बसमध्यें आधार घेत घेत
        नि धडपडत येऊन आदळली शेजारीं
सर्वांना केलं हाय् एल्लो
     मला विचारलं इटालीयन ? इंडियन ?
         मान डोलावतांच सांगत सुटली
            आपण होऊन आपलाच पूर्वेतिहास !
म्हणाली , मी आहे पेशंट सायकॉलॉजिक
     पॅरॅनॉइड सिझोफ्रेनिक !!
आधीं होत्यें नाजुक , सुंदर
     तीन मुलं झाली - माझी नव्हे , देवाची !
        सुखात आहेत आपापल्या बिऱ्हाडीं !!
आता फिरत्ये ‘नन्’ म्हणून
      सर्वांसाठीं ‘प्रे’ करीत -
         “गॉड ब्लेस् यू sss “ !!!
  खरंच का पेशंट ही, प्रश्न पडतो मला
     शाहाणी की सिझोफ्रेनिक -
        कुणी ठरवायचं बुवा !
तरतरीत नाकेली - गौर सुरकतलेली
    चमकदार बोलते डोळे -
        तोंडाची कवळी झालेली !!
मात्र त्या नजरेमागची
    खोलवर दडलेली वेदना, कणव, संवेदना -
       हेलावून गेली माझ्या अंतर्मनाला !
वार्धक्यही इतकी भुरळ पाडूं शकतं ?
    अंतर्मनाला जागं करीत
        तडफडायला लावूं शकतं ??
तेव्हां असेलही कदाचित नाजुक सुंदर -
   आज मात्र सौंदर्याचा
      निराळाच अर्थ सांगून गेली !
तो आत्मविश्वास , स्वाभिमान
    ती विजेरी नजरेची चमक , करूणभाव
       ती भावस्पर्षी दास्तां ,
जगत्कल्याणाची उठाठेव
   नि मंगल - सुमंगलाचाच उद्घोष !!

खरं सौंदर्य कुठे दडलंय ?
पाहणाऱ्याच्या नजरेत,
की अंतर्मनात दडून बसलेलं ??

उफाळून येतात अशा एखाद्या क्षणीं
आनंदाच्या सरी
आनंदविभोर मी - आनंदविभोर मी !!!

मु. पो. लंडन
२८.९.२००७

२).
“ कवी “

होय, मी पण आहे एक कवी -
   ‘कवीम् कवीनाम’ नसलों तरीही ......!
मी भावविश्वांत रमतो,
मला आकळतात भाव - भावना
मला थव्यांत माणसे नि माणसांचं थवे
पाहायला जमते - भावतें ,
त्या थव्यांतील ‘माणूसपणाशी’
माझे नातें जुळते - गट्टीही होते !
म्हणून मी कवी !!

मला कुणी एककल्ली , निगरगट्ट म्हटलं
तरी संवेदनशील आहे माझं मन -
तरल , भिरभिरणारं , बागडणारं ...
पण तरीही काळजाचा ठाव घेणारं
एकदा बसलं तर तिथून अजिबात न हलणारं !

निसर्ग मला खुणावतो, जवळ ये म्हणतो -
मीही हरखतो, हरवतो, गुंगून जातो -
मनाच्या कॅन्व्हासवर
त्याला शिगोशीग उतरून घेतो !

पक्षांच्या किलबिली बरोबरच
चर्चचा घंटानाद मला भुरळ घालतो
शांतीची - प्रशांतीची अनुभूती देतो -
मी रमतो , सुखावतो
म्हणून मी कवी !!

विंदा करंदीकर म्हणाले,
‘ज्याला कविता कळते - तो कवी ‘ –
माझ्यात तर कविता खोलवर दडी मारून बसते ,
खरं तर म्हणूनच मी कवी !!!

लंडन
९.९.२००७

३).
“ आई “
नमितो तुज शतशतदां आई
प्रेमस्वरूप तूं करूणासिंधू
चारित्र्याची मूर्तिमंत खाण तूं

भावुक म्हणुनी जगत् सुखास्तव
तळमळली धडपडलीस तूं
सांवरले तूं किती जणांना, आवरले तू
अन् कितिकजणांचा आधार तूंच तू   !

शांतिरूप अन् निगर्विताही
हरहुन्नरी जननी आई
मांगल्याची मूस जणूं तूं होसी
नमितों तुज शतशतदां आई !!

लंडन
१जुलाय२०१०




Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?