Monday, October 17, 2016

 
संचित आणि प्रारब्ध

      भदवद्गीतेतील तिसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘नियतं कुरू कर्म त्वं ‘ ; तुझ्या वाट्याला आलेले कर्म तुला केलेच पाहिजे, कारण तें तूं निर्माण केले नसून तुझ्या प्रारब्धानुसार ते आलेले आहे.
     आता, प्रारब्ध म्हणजे काय ? या विश्वाच्या एकूण कर्मसंचयातील माझ्या वाट्याला जे काही जन्मजात आले असेल ते . व्यक्तिश: मी अमुक ठिकाणी, अमक्या वेळीं, अमुक कुटुम्बांत जन्म घेणे, स्त्री किंवा पुरूष होऊन आणि माझ्या हातून जे काही कार्य घडणार, ते त्या विश्वाच्या योजनेमध्ये ठरवलेले आहे ; It is so ‘programmed!’
     रामकृष्ण परमहंस एकदा म्हणाले की साधू-संतांच्या नाटकामधील नाटक रंगवायचे असेल तर नाटकात काम करणारी पात्रे वेळीच जन्माला यावी लागतात. श्री समर्थ, शिवाजी, औरंगजेब हे सगळे आधीच ठरवलेले होते ! चवथ्या अध्यायात भगवंत अर्जुनाला सांगतात की तुम्ही-आम्ही मागे कितीतरी जन्म घेतलेले आहेत ; ते तुला आठवत नाहीत पण मला ते सर्व व्यवस्थित आठवतात. हे सगळे संबंध अनेक जन्मांपासूनचे आहेत.
     वेदव्यास म्हणतात, ‘ पूर्वदत्तेषु या भार्या, पूर्वदत्तेषु या विद्या, पूर्वदत्तेषु यत् धनं, अग्रे धावति धावति ‘! !
     असा हा प्रारब्धाचा विलास आहे.
     मात्र माणूस जन्मल्यावर त्याला थोडेफार स्वातंत्र्यसुद्धा मिळालेले असते, कारण ते नसेल तर तो केवळ इतर प्राण्यांप्रमाणे जगेल. त्याला विचारांचे स्वातंत्र्य आहे ; आपल्या मनांत कोणते विचार राखून ठेवायचे हे स्वातंत्र्य त्याला आहे, त्याला आपले मन आवरण्याचेपण स्वातंत्र्य आहेच. (अर्थात ते मर्यादित स्वरूपात असते !) आणि असे स्वातंत्र्य जर नसते तर ‘तूं नीतिधर्माने वाग ‘ असे सांगणे निरर्थक ठरले नसते काय ?
     या व्यक्तिगत स्वातंत्र्यानुसार माणूस जे कर्म करतो त्या कर्माच्या साठ्याला “ संचित “ असे म्हणतात. ‘मनाचें श्लोकात समर्थ म्हणतात, “मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले । तयासारिखें भोगणें प्राप्त झालें ।। - यालाच प्रारब्ध म्हणतात. म्हणून आपण एखादे कर्म करतो किंवा करत नाही या म्हणण्याला अर्थ नाही.
     आणि म्हणूनच भगवन्त सांगतात की आपले जीवन असे प्रारब्धाने बांधलेले आहे . (अर्थात्, भगवत्-चिंतनाचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच !!)

लंडन
१७ / १० / २०१६


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?