Friday, September 23, 2016

 
“कर्म-योगी”
प्रत्येक माणसाला त्याच्या भौतिक आणि पारमार्थिक उन्नतीसाठी कर्मयोगावांचून पर्याय नाही. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत, तमोगुणी प्रकृतीपासून शुद्ध सत्वगुणी प्रकृतीपर्यंत आणि साधकांपासून सिद्धांपर्यंत स्वत:च्या जीवनसाफल्याचा निश्चित मार्ग म्हणजे कर्मयोगच होय. भक्तीयोगी, ज्ञानयोगी, राजयोगी वा हठयोगी, इतकेच नव्हे तर सिद्ध आणि अवतारांसाठीही कर्मयोगाचे आचरण अटळ आहे !
       समर्थ रामदास स्वामी म्हणतात, “ जीवा कर्मयोगें जनीं जन्म झाला “, आणि मना त्वांचि रे पूर्व संचीत केलें, तयासारिखें भोगणें प्राप्त झालें !” म्हणजेच आपल्या कर्माचे फळ ‘संचित’ रुपाने जमा होते आणि तोच कर्मफळाचा भाग ‘प्रारब्ध’ म्हणून बरोबर घेवून आपण पुन्हा जन्म घेतो. या कर्मफळाला “ऋत” असेही म्हणतात.
          खरे तर कर्मयोग स्वहित साधण्याची जीवनप्रणाली होय. समर्थांचें असे सांगणे आहे की जाणतेपणाने कर्म केले तर गुणांचा विकास होऊन भाग्य आपसूक प्राप्त होते आणि जीवन सर्वार्थाने धन्य होते. कर्मयोगच सर्वसामान्यांना तारील हे जनमनाला समजावण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. ते म्हणाले :- “ सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणि स्वधर्म । सत्संग आणि नित्यनेम । निरंतर ।। ऐसे हे अवघीचि मिळे । तरीच विमल ज्ञान निवळे । नाहीं तर पाषांड संचरे । बळेच समुदायीं ।। “
        त्यांच्या साऱ्या शिकवणुकीचे सार म्हणजे ‘ परमार्थाचा मार्ग कर्ममार्गातच सुरू होतो, भक्तीमध्ये दृढ होतो, ईश्वराच्या ध्यानात स्थिर होतो आणि शेवटीं राजमार्ग होऊन ज्ञानात (आत्मज्ञानात ) संपतो. तात्पर्य, कर्मप्रवृत्तीतच माणसाने विवेक, वैराग्य आणि ईश्वराचें अनुसंधान ठेवावे.
       समर्थ रामदासांच्या नंतरच्या काळात भारतीय संस्कृतीची पुन्हा गळचेपी झाली. समाज भरडला गेला . नीतिमूल्यें हरवली. तरूण पीढी निस्तेज झाली. तेथे स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांनी “ उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत,” आचार: प्रथमो धर्म:” ही बोधवाक्यें अभिमंत्रित करून जनजागृती केली. लोकांना स्वकर्माचा मार्ग दाखवून प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल राखायला शिकवले. ‘कर्म उदंड करा ; देवावर, प्रारब्धावर भार टाकून आशाळभूत आणि नेभळट होऊ नका’ असा संदेश त्यांनी दिला.
         नंतर लोकमान्य टिळकांनी ‘ भक्तिप्रधान कर्मयोग ‘ हे निष्काम कर्मयोगातूनच होते असा गीतेचा सारांश ठामपणे सांगितला. “कर्तेपणाचा अहंकार’ कर्मयोगानेच क्षीण होतो, पण तोपर्यंत तुमचा कर्तेपणा जगाच्या परोपकारासाठी वापरा, समाजाच्या उन्नतीसाठी आणि राष्ट्रकार्याचा उदात्त हेतू लक्षात ठेऊन कर्म करा’ हा त्यांचा संदेश “केसरी” मधून समाज जागृती करीत राहिला.
         श्रीकृष्णाने अर्जुनाला समोर ठेऊन आपल्या सर्वांसाठी गीता सांगितली. श्रीकृष्णाने मोक्षप्राप्तीचा नवीन मार्ग ‘ निष्काम कर्मयोग ‘ सांगितला. म्हणाले, ‘ऊठ आणि आपले स्वधर्म कर्म कर ; त्यातून तुला इहलोक, परलोक आणि परमार्थ सारेच काही मिळेल ‘!
        मात्र थोड्याच काळात आम्ही हे सर्व विसरलो, म्हणून श्रीकृष्ण ज्ञानेश्वर महाराजांच्या रुपाने पुन्हा अवतरले. त्यांनी कर्मयोगी व्हा आणि प्राप्त कर्म ( विहित कर्म ) करा, हेंच सांगितले. ज्ञानेश्वरीत या संबंधी खूप ओव्या आहेत.
श्रीज्ञानेश्वर केवळ ओव्या लिहून थांबले नाहीत. या अवतारी संत पुरूषाला पुरेपूर ठाऊक होते आम्ही पुढे कसे वागणार ते !! त्यांनी “विश्वेशरावो” , परमात्म्याचे सगुण साकार रूप श्रीनिवृत्तिनाथ, यांच्याकडे कृपाप्रसाद मागितला. या जीवांच्या जीवनात ‘स्वधर्मसूर्य’ उगवून यांचा ‘अज्ञानाचा अंधकार’ नाहीसा होवो’ आणि या जीवांना ‘सत्कर्माची आवड लागो ‘; ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ‘ या पृथ्वीतलावर अवतरो व ते या सर्वांचे ‘ ‘सोयरे होऊन ‘ त्यांना स्वधर्म कर्माच्या मार्गात सर्व प्रकारें मदत करोत.’  त्यांचें मागणे श्रीनिवृत्तिनाथांनी मान्य करून आपल्या सर्वांना कृपाप्रसाद दान दिले !!!
               हरये नम:  । हरये नम: । हरये नम: ।।

प्र.शं.रहाळकर
लंडन २३ सप्टेंबर २०१६

       


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?