Thursday, September 08, 2016

 
एक आवाहन !

प्रिय आत्मीय,
आज या पत्राच्या निमित्ताने माझे ह्रद्गत तुम्हाला सांगण्याचा मानस आहे. तुम्ही सर्वच आपापल्या व्यापात व्यस्त आहात, नुकतीच शाळा आणि महाविद्यालये सुरू झालीत आणि दैनंदिन व्यवहारांना गती मिळते आहे. त्यात माझे हे मनोगत निवांतपणे वाचणे अंमळ त्रासदायक होईल याची सुप्त जाणीव मला आहे ; तथापि तो धोका पत्करून हे आवाहन करतोय, त्याची कृपया दखल घ्यावी ; इति प्रस्तावना !!

मला असं म्हणायचंय की बाहेरच्या जगातली इत्थंभुत माहिती आणि ज्ञान तर आता तुमच्या बोटांवर आहे ; क्षणार्धात तुम्हाला हवे ते तुम्ही वाचतां, ‘शेअर’ करता, मनसोक्त आनंद देखील घेतां ! पण मला खरे खरे सांगा, यातले कितपत तुमच्या कायम स्मरणात राहते ? त्याचा कितपत कायम स्वरूपीं उपयोग टिकतो ? मी कदाचित चुकत असेन, पण कितीजण हातात ग्रंथ किंवा पुस्तके घेतलेली दिसतात ? काही सन्माननीय अपवाद वगळतां अत्यल्पच.
या जमान्यात ग्रंथांची आवश्यकताच काय असा प्रश्न साहाजिक आहे, कारण आता सगळेच ‘ओनलैन मिलते नथी’?!

हा बाह्य जगातला व्यवहार पाहतांना आपल्या अंतरंगातला व्यवहार आपण जाणून घेणार आहोत कां? त्याची गरज कदाचित जाणवत नसेल या घडीला. पण जरासे अंतर्मुख व्हायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे ?

 काय म्हणून ??

मित्रानो ! आपण कोण, कुठले, इथे काय करतोय, काय करायला हवे आहे, हे जग नि सगेसोयरे कुठले, हे जगच निर्माण का झाले, असेच का झाले, पुढे यांचे नि माझे काय होणार वगैरे वगैरे वगैरे प्रश्न बालपणापासून आजपावेतो कधी ना कधी प्रत्येकाच्या मनांत येऊन गेले असणारच. काही प्रश्नांची तरी शहानिशा झाली काय ?

विश्वास ठेवा, यांतील काही प्रश्न केवळ अर्धा इंच ‘अंतरंगात’ डोकावून मिळतील ! यासाठी कुणी गुरू, सत्संग, मंदिर-मस्जिद धुंडत बसायला नको ; पूजा पाठ, जप जाप्य, आराधना, व्रतवैकल्यें नकोत. बस् दररोज थोडा वेळ नियमितपणे स्वत:शी स्वत: निश्चळपणे ‘असणें’ !

यांत नवीन ते काय, आम्ही रोजच स्वत:शी स्वत: एकटेच तर असतो ; आम्ही पण ध्यान धारणा वगैरे वगैरे करतोच की !! चोक्कस ! पण त्यातून कितपत ऊर्जा मिळते? कितपत अधिक शांती लाभते? कितपत ‘प्रकाश’ मिळतो?
खरे तर ‘ध्यानाच्या’ अपरंपार पद्धती प्रचलित आहेत, इतक्या की, जस्ट कन्फूजिंग ! मी कुठलीच रिकमेंड करणार नाही; प्रत्येकानेच आपापल्या सोयीची पद्धत निवडावी, मात्र तींत अग्रेसर मात्र व्हावे !!
दासबोध, गाथा, गीता, ज्ञानेश्वरी सारखे अप्रतिम ग्रंथ मराठीत उपलब्ध आहेत. दररोज नाही तरी आठवड्यातून एकदा तरी ते चाळावेत , जमल्यास अभ्यासावे, पहा तर खरे एकदा तरी करून ! घरात यांतील काही असतील तर उत्तमच, नसतील तर उसने घ्यावे पण वाचावे नक्की !
(आपल्या पुस्तकाची जाहिरात करण्यासाठी हा पत्रप्रपंच नाही; केवळ पोटतिडकीने हे आवाहन करतोय. मला स्वत:ला हे सर्व जाणवायला पंचाहत्तर वर्षें लागली ! निदान तुम्ही तरी वेळच्यावेळीं मनावर घ्या अशी मनोमन कळकळ आहे, म्हणून हे आगांतुक आवाहन !!)

आवश्यकतेपेक्षा जरा जास्तच लांबण लागली, तरी क्षमस्व !!
तुमचाच,
प्र. शं. रहाळकर
८ सप्टेम्बर २०१६


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?