Tuesday, August 09, 2016

 

श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ                        ।। श्रीहरि ।।

                     ज्ञानेश्वरी नित्यपाठ 

ओम नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या । जयजय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।१।।

देवा तूंचि गणेशु । सकळ मतिप्रकाशु ।

म्हणणे निवृत्तिदासु । अवधारिजोजी ।।२।।

आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी । श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ।।३।।

मज हृदयीं  सदगुरू । जेणें तारिलों हा संसारपूरू। म्हणौनि  विशेषें अत्यादरू । विवेकावरी ।।४।।

या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य  असे सर्वगत ।तें तत्वज्ञ संत । स्वीकारिती  ।।५।।

उपजें तें नाशें । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमें गा ।।६।

जैसें मार्गेचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । 

कां दीपाधारें वर्ततां नाडळिजे ।।७।।

तयापरी पार्था  । स्वधर्में राहाटतां । सकळकामपूर्णता । सहजें होय ।।८।।

सुखीं संतोषां  न यावें  । दु:खीं विषादां  न भजावें  । आणि लाभालाभ न धरावें  । मनामाजीं  ।।९।।

आपणयां उचितां  । स्वधर्में राहाटतां । जें पावें तें निवान्तां । साहोनि जावें ।।१०।। 

आम्हीं समस्तहि विचारिलें । तंव ऐसेचि हें मना आलें । जे न सांडिजें तुवां आपुलें ।  विहित कर्म ।।११।।

परि कर्मफळीं आस न धरावी  । आणि  कुकर्मीं   संगती न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतुविण ।।१२।

तूं योगयुक्त होऊनि । फळाचा संग टाकूनि । मग अर्जुना चित्त देऊनि । करीं कर्में  ।।१३।।

परि आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावें । तरि विशेषें तेथ तोषावें । हें हि नको ।।१४।।

कां निमित्तें कोणें एकें ।  तें सिध्दी न वचतां ठाके । तरी तेथीचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ।।१५।।

देखें  जेतुलेनि कर्म निपजें । तेतुलें आदिपुरूषीं अर्पिजे ।  तरी परिपूर्ण सहजें ।  जाहलें जाण ।।१६।।

म्हणौनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचरे तूं ।।१७।।

देखें अनुक्रमाधारें । स्वधर्म जो आचरे ।तो मोक्ष तेणें व्यापारें । निश्चित पावें ।।१८

स्वधर्म जो बापा । तो नित्ययज्ञ जाण पां । म्हणौनि वर्ततां ते थ पापा । संचारू नाही ।।१९।।

हा निजधर्म जैं सांडे । आणि कुकर्मीं रति घडे । तैंचि बंध पडे । सांसारिक  ।।२०।।

म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञयाजन । जो करी  तया बंधन । कहीं  चि न घडे ।।२१।।

अगा जया जे विहित । तें ईश्वराचें मनोगत । म्हणौनि केलिया निभ्रान्त । सांपडेचि  तो  ।।२२।।

तें विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा । आणि हेंचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ।।२३।।

तया सर्वात्मक ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।पूजा केली होय अपारा । तोषालागीं ।।२४।।

तें  क्रियाजात आघवें । जें जैसें निपजें  स्वभावें । तें भावना करोनि करावें । माझियां मोहरा ।।२५।।

आणि हें  कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था । ऐसा अभिमान झणें चित्ता । रिगों देसी ।।२६।।

तुवां शरीरपरां नोहावें । कामनाजात  सांडावें । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ।।२७।।

तूं मानसा नियमु करीं । नश्चळु होय अंतरीं । मग कर्मेन्द्रियें व्यापारीं । वर्ततु सुखें ।।२८।।

परिस पां सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ।।२९।।

देश पां जनकादिक । कर्मजात अशेख ।

न सांडितां, मोक्षसुख । पावते जाहले ।।३०

देखें प्राप्तार्थ जाहले । ते निष्कामता पावले ।

तयांही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ।।३१

मार्गीं अंधासरिसा । पुढे देखणाहि चाले जैसा ।

अज्ञाना प्रगटलात धर्म तैसा । आचरोनी ।।३२।।

एथ वडील जे जें करिती । तया नाम धर्म ठेविती 

तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ।।३३।।

हें ऐसे असे स्वभावें । म्हणौनि कर्म न सांडावें ।

विशेषें आचरावे लागे । संतीं ।।३४।।

दीपाचेनि प्रकाशें । गृहींचें व्यापार जैसें ।

देहीं कर्मजात तैसें । योगयुक्ता ।।३५।।

तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे ।

जैसें न सिंपे जळीं जळे ।पद्मपत्र ।।३६।।

तयाही देह एक कीर आथी । लौकिकीं सुखु:खीं तयातें म्हणती । परी आम्हातें ऐसी प्रतीति । परब्रह्मचि हा ।। ३७।।

देह तरी वरिचिलीकडे । आपुलियापरी हिंडे ।

परि बैसका न मोडे । मानसींची ।।३८।।

अर्जुना समत्व चित्ताचे । तेंचि सार जाण योगाचे 

जेथे मन आदि बुद्धीचे ।  ऐक्य आथी ।।३९।।

देखें अखंडित प्रसन्नता  । आथी जेथ चित्ता । तेथ रिगणें नाहीं  समस्तां । संसारदु:खां ।।४०

जैसा अमृताचा निर्झरू । प्रसवे ज़याचा जठरू । तया क्षुधेतृषेचा अडदरू । कंहीचि नाहीं ।।४१

तैसें ह्रदय प्रसन्न होये । तरी दु:ख कैंचे कें आहे । 

तेथ आपैसि बुद्धी राहें  । परमात्मरूपीं  ।।४२

जैसा निर्वातींचा दीपु । सर्वथा नेणें कंपू । तैसा स्थिरबुद्धी स्व-स्वरूपु । योगयुक्त  ।।४३।।

जया  पुरूषाच्या  ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं 

आणि फलापेक्षा कहीं । संचरेना  ।।४४।।

आणि हैं कर्म मी करीन । अथवा आदरिलें सिद्धी नेईन । येणें संकल्पें जयाचें मन । विटाळेना ।।४५।।

ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणे जाळिलीं कर्में अशेखें । तो परब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ।।४६।।

तें ज्ञान पैं गा बरवें । जरी मनीं आथी जाणावें । तरी संतां या भजावें । सर्वस्वेंसी ।।४७।।

जे ज्ञानाचा कुरूठा । तेथ सेवा हा दारवंटा ।

तो स्याधीन करी सुभटा । वोळगोनी ।।४८।।

तरी तनुमनु जीवें । चरणांसि लागावें ।

आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ।।४९।।

मग अपेक्षित जें आपुलें । तेही सांगती पुसिलें । जेणें अंत:करण बोधलें । संकल्पा न ये ।।५०।।

ते वेळीं आपणपेयां सहितें । इयें अशेषेहि भूतें ।

माझ्या स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं ।।५१।।

ऐसें  ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारू जाईल 

जैं गुरूकृपा होईल । पार्था गा ।।५२।।

जरी कल्मषाचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरू । 

व्यामोहाचा डोंगरू । होऊन अससी ।।५३।।

तरी ज्ञानशक्तिचेनि पाड़ें । हैं आघवेंचि गा थोकडें 

ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानीं इयें ।।५४।।

मोटकें गुरूमुखें उदैजत दिसे । ह्रदयीं स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावों लागे तैसें । आपैसयाचि ।।५५।।

सांगें अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं काय अग्नि आहे ? । तैसा विकारू  हा मी नोहें । ज़रि विकारला असे  ।।५६।।

देह तंव पांचांचे झाले । हें  कर्माचे  गुणीं गुंथलें । 

भंवतसे चाकीं सूदलें । जन्ममृत्यूच्या ।।५७।।

हें काळानळाच्या तोंडीं । घातली लोणियाची  उंडी। माशी पांख पाखडी । तंव हें सरे ।।५८।।

या देहाची हें दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा । पैं  नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणें ।।५९।।

सकळ ना निष्कळ । अक्रिय ना क्रियाशीळ ।कृश ना स्थूळ । निर्गुणपणें   ।।६०।।

आनंद ना निरानंद । एक ना  विविध । मुक्त ना बद्ध  । आत्मपणें  ।।६१।।

ते परम तत्व  पार्था । होती ते सर्वथा । जे आत्मानात्मव्यवस्था । राजहंस ।।६२।।

ऐसेनि जे निजज्ञानीं । खेळत सुखें त्रिभुवनीं । जगद्रूपा मनीं । सांठवूनि मातें ।।६३।।

हें विश्वचि माझें घर । ऐसी जयाची मती स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ।।६४।।

मग याहीवरी  पार्था  । माझियां भजनीं आस्था । तरी तयांते मी  माथां । मुकुट करीं ।।६५।।

तो मीं वैकुंठीं न दिसे । वेळु एक भानुबिंबीं न दिसें वरी योगियांचीहि मानसें । उमरडोनि जाय ।।६६।।

परी तयांपाशीं पांडवा । मीं हारपला गिंवसावा । जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ।। ६७

कृष्ण  विष्णु हरि गोविंद  । या नामाचे निखळ प्रबंध । माजीं आत्मचर्चा विशद । उदंड गाती ।।६७।।

जयांचिये वाचें माझे आलाप । दृष्टी भोगी माझेचि रूप । तयांचें मन संकल्प । माझेचि वाहे ।।६८।।

माझियां कीर्तीविण । जयांचें रिते नाहीं श्रवण । जयां सर्वांगीं भूषण । माझी सेवा ।।६९।।

ते पापयोनीहि होतु  कां । ते श्रुताधीतहि न होतु का । परि मजसी  तुकितां तुका । तुटी नाहीं ।।७१ ।।

तेंचि भलतेणें भावें । मन मज आंतु येतें होआवें । आलें तरी आघवें । मागील वावो ।।७२।।

जैसें तंवचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ । मग होऊन ठाकती  केवळ । गंगारूप ।।७३।।

तैसें क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शुद्र अंत्ययाजि इया । जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ।।७४।।

यालागीं पापयोनीहि  अर्जुना । कां वैश्य शुद्र अंगना । मातें भजतां सदना । माझियां येती ।।७५।।

पैं भक्ती एकी मी जाणे । तेथ सानें थोर न म्हणें । आम्ही भावाचे पाहुणे  । भलतेया ।।७६।।

येर पत्र पुष्प फळ । हें भजावया मिस केवळ । वांचुनि आमुचा लाग निष्कळ  । भक्तितत्व ।।७७।।

मग भूतें हें भाष विसरला । जे दिठी मीचि आहे सूदला । म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजें ।।७८।।

हें समस्तहि  श्रीवासुदेव । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भाव । म्हणौनि भक्तांमाजीं रावो । आणि  ज्ञानिया तो चि ।।७९।।

तूं मन हें मीचि करीं । माझियां  भजनीं   प्रेम धरीं । सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ।।८०।।

माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें नि:शेख । मद्याजी चोख । याचिकांच नांव ।।८१।। 

ऐसा मियां आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरूपा पावसी । हें अंत:करणींचें तुजपाशीं । बोलिजत असें ।।८२।।

तूं मन बुद्धि साचेंसि । जरी माझियां स्वरूपीं अर्पिसी । तरी  मातें  चि गा पावसी । हें माझी भाक ।।८३।।

अथवा हें चित्त । मनबुद्धिसहित  माझ्या हातीं अचंबित ।  न शकली देवों ।।८४।।

तरी गा ऐसें करीं । यया आठां पहारांमाझारीं । मोटकें निमिषभरीं । देतु जाय ।।८५।। 

मग जें जें  कां  निमिख । देखेल माझें सुख । तेतुलें  अरोचक । विषयीं घेईल ।।८६।। 

पुनवेहूनि जैसें । शशिबिम्ब दिसें दिसें । हारपत अंवसें । नाहींचि होय ।।८७।।

तैसें  भोगांआंतुनि निघतां । चित्त मजमाजीं रिगतां । हळूहळू पंडुसुता । मीचि होईल ।।८८।।

म्हणौनि अभ्यासासीं कांही । सर्वथा दुष्कर नाहीं । यालागीं  माझ्याठायीं । अभ्यासें मीळ ।। ८९।।

कां जे यया मनाचें एक निकें । जे गोडीचिया  ठाया  सोके । म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें । जावीत जाइजे ।।९०।।

बळियें इन्द्रिये येती मना । मन एकवटे  पवना । पवन सहजें गगना । मिळमिळीत  लागे ।।९१।।

ऐसे नेणों काय आपैसें । तयातेंचि  कीजे अभ्यासें । समाधि घर पुसे । मानसाचें ।।९२।। 

ऐसा जो कामक्रोध  लोभां ।  झाडी करोनि ठाके उभा । तोचि येवढिया लाभा । गोसावी होय ।।९३।।

पाहे  पां  ओम् तत्सत् ऐसें । हें बोलणें तेथ नेतसे । जेथुनि  कां हे प्रकाशें  । दृश्यजात ।।९४।।

सुवर्णमणि   सोनया । ये कल्लोळु जैसा पाणिया । तैसा मज धनंजया । शरण ये तूं ।।९५।।

म्हणौनि मी होऊन मातें । सेवणें आहे आयितें । तें करीं हाता येते । ज्ञानेश  येणें ।।९६।।

यालागीं सुमनु आणि शुद्धमति । जो अनिंदकु अनन्यगति । पैं गा गौप्यहि परी तयाप्रति । चावळिजे सुखें ।।९७।।

तरि प्रस्तुत आता गुणीं इहीं । तूं वांचुन आण्विक  नाहीं । म्हणौनि गुज तरि तुझ्याठायीं । लपवून  नये ।।९८।।

ते हे मंत्ररहस्य गीता । मेळवी जो माझियां भक्तां । अनन्यजीवना माता । बाळकां जैसी ।।९९।।

तैसी भक्तां गीतेसी । भेटी करी जो आदरेंसि । तो देहापाठीं मजसी । येकचि होय ।।१००।।

ऐसें सर्वरूपरूपसें । सर्वदृष्टिडोळसें । सर्वदेशनिवासें । बोलिलें श्रीकृष्णें ।।१०१।।

हें शब्देंविण संवादिजें । इन्द्रियां नेणतां भोगिजें । बोलांआदि झोंबिजें । प्रमेयासि ।।१०२।।

जें अपेक्षिजें विरक्तीं । सदा अनुभविजें संतीं । सोहंभावें पारंगतीं । रमिजे  जेथ ।।१०३।।

हें गीतानाम विख्यात । सर्व वाड्ऱ्मयाचें मथित । आत्मा जेणें हस्तगत । रत्न होय ।।१०४।।

वत्साचेनि वोरसें । दुभतें होय घरोद्देशें । जालें पांडवाचें मिषें । जगदुध्दरण ।।१०५।।

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान  हें ।।१०६।।

जे खळांची  व्यंकटी  सांडो । तयां सत्कर्मीं रति वाढो  । भूतां परस्परें  पडो  । मैत्र  जीवाचें ।।१०७।।

तेथ म्हणें श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ।१०८।।

भरोनि सद्भावाची अंजुळी  । मियां  वोंवियां  फुलें  मोकळीं   । अर्पिलीं अंघ्रियुगुलीं । विश्वरूपाच्या ।।१०९।।

इति श्री स्वामी स्वरूपानन्द संपादितं श्रीभावार्थदीपिका-सार-स्तोत्रं संपूर्णम् ।। हरयेनमह: । हरयेनमह: । हरयेनमह: ।।

                      श्रीकृषणार्पणमस्तु 







Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?