Wednesday, October 29, 2025

 

वार्धक्य - एक वेगळा दृष्टिकोन !

 


वार्धक्य - एक वेगळा दृष्टिकोन

म्हातारपणाकडे पाहायचा एक वेगळा दृष्टिकोन मी अनुभवूं शकलो माझ्या तीर्थरूपांच्या प्रत्यक्ष आचररणातून. आपण पाहात आलोंय् ते कित्येक वृद्धांच्या दैनंदिन व्यवहारांतून डोकावणारे वैफल्य नि अगतिकपण आणि नकळत येणारे केवलवाणेपण देखील. अशी वृद्ध मंडळी दिसली की आतून गलबलायला लागणे खूप साहाजिक असते. आणि मग यातून अशा वृद्धांना कसे बाहेर काढता येईल हे विचार नकळत मनात घोंगावू लागतात.  

माझ्या वडिलांचे पूर्वायुष्यातील दैनंदिन आचरण आणि निवृत्तीनंतर त्यांनी अंगिकारलेला जीवनक्रम आम्हाला साहाजिकच जवळून पाहता आला आणि त्या दरम्यान त्यांचे विविध पैलूही दृष्टीस पडत गेले. ते निराश असे फार क्वचित् दिसत, जवळजवळ कधीच नाही, कारण त्यांचा विलक्षण आत्मविश्वास सहज दृग्गोचर होत असेत्यांची इच्छाशक्ती अतिशय प्रबळ होती, दुर्दम्य म्हणता येईल इतकी. एऱ्हवी सहज येणारेविस्मरणकधीकधी स्तिमित करणाऱ्या स्मरणशक्तीने सहज नामोहरम होत असे. त्यांचे चारही भाषांवरील प्रभुत्व आणि नेमकेपण चकित करणारे असे. त्यांचा नर्म विनोद आणि मिश्किलपणा खरोखर जगावेगळा होता. त्यांना खूप खूप बोलायला आवडत असे कोणत्याही विषयावर आणि आपली ठाम मतें ते अतिशय परखडपणे आणि आक्रमकतेने प्रतिपादित करीत. शेवटचा एक महिना सोडला तर त्यांची तशी दिनचर्या अव्याहत चालू राहिली. आम्हा सर्व भावंडांना असाच अनुभव कायम येत राहिला


अगदी अखेरचा एक महिना मात्र ते अतिशय शांत, अबोल आणि बरेचसे अंतर्मुख झालेले अनुभवले आम्ही. कुणाशीही काहीही बोलतां ते तासनतास दूर कुठेतरी पाहात, स्वत:शीच हंसत, आम्हाला काहीतरी सांगावेसे वाटले तरी क्षणार्धात हात झटकून पुन्हा स्तब्ध होत. काय चालत असेल त्यांच्या अंतर्मनांत ? खरंच कठीण आहे अंदाज करायला सुद्धा ! असो


मला बोलायचे होते सर्वसामान्य वृद्धांच्या एकलकोंडेपणातून येणाऱ्या वैफल्याचे, अगतिकतेचे, केवलपणाचे विषयीं. अशा दुर्दैवी मंडळींसाठी काय करणे शक्य होईल याचा विचार करताना जाणवले की निव्वळ अध्यात्माचेडोझदेत राहण्यात फारसे हंशील नाही. येनकेन-प्रकारेण त्यांना बोलते करता आले तरच त्यांच्या व्यथा कदाचित समजून घेता येतील. खूप वर्षांपूर्वी आम्ही सामुदायिक रित्या वृद्धाश्रम इतकेच नव्हे तर अंधशाळा, रिमांडहोम्स, कारागृहें आणि मनोरूग्णालयांतही भेटी देऊन तेथील सर्व वयोगटांतील व्यक्तींशी सुसंवाद करायचा प्रयत्न करीत असूं. अध्यात्म हा विषय अत्यंत माफक स्वरूपात आणत त्यांचा वैयक्तिक दिनक्रम कसा अधिक हवाहवासा करता येईल इकडे लक्ष देण्याचा प्रयत्न असे. अर्थातच हे एकट्यादुकट्याला करणे सोपे नाही आणि म्हणूनच एक सामाजिक बांघीलकी या स्वरूपांत वृद्धांच्या एकलकोंडेपणावर काहीतरी उपाययोजना करायला हवी

पहा तुम्हाला काही सुचतंय् का या बाबतींत

रहाळकर

२९ ऑक्टोबर २०२५      


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?