Tuesday, October 28, 2025
गिरिवर हनुमान !
गिरिवर हनुमान !
मी दररोज पहांटे मनाने दोन ठिकाणी जाऊन यायला सहसा चुकत नाही. पहिले आहे इंदौरचे बीरबंक हनुमान मंदिर आणि दुसरे शाजापूर नजिकचे गिरिवर हनुमान. मात्र त्याला महत्वाची कारणे आहेत. बीरबंक हनुमान आमच्या मेडिकल कॉलेजच्या वाटेवर होते आणि सकाळी साडेसातला कॉलेजला जाताना मी हमखास सायकल बाजूला लावून तिथे मथ्था टेकवत असे. त्यामुळेच माझे तिथल्ले शिक्षण उड्या मारीत झाले. तेव्हा मी खूप व्यायाम आणि शरीर सौष्ठवाकडेही पुरेसे लक्ष देत असल्याने बीरबंक कडून एक्स्ट्रा शक्ती मिळत असे मला.
मात्र गिरिवर विषयी बोलताना थोडा अधिक तपशील देणे अगत्याचे आहे. आमचा नुकताच विवाह झाला होता त्यामुळे ‘आहेरांत’ बीपी इन्स्ट्रिमेंट बरोबरच अनेक डॉक्टरी बॅगा नि काही शस्त्रक्रियेची अवजारेंही (फुकट) मिळाली होती. माझी ‘इमर्जन्सी बॅग’ त्यामुळे अद्यावत असे. खूपशी ‘फ्री सॅम्पल’ औषधें तर दररोज येत असत. या सगळ्यांचा ‘गिरिवर हनुमानाशी संबंध काय या तुमच्या न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर जरासे तबीयतने देणार आहे, धीर धरा सब्र करा लक्ष असू द्या ही विनंती.
एका संध्याकाळी जरा गम्मत झाली. दोन साधू आमच्या सर्कारी दवाखान्याच्या ओपीडीत आले आणि मला नजीकच्या खेडेगावीं चलण्याचा आग्रह करू लागले कारण त्यांचा वृद्ध महंत तिथल्या मारुती मंदिरांत वेदनेने तडफडत होता. मी ओपीडी संपतांच घरी गेलो आणि जवळच्या खेड्यात सायकलीने जाऊन येतो असे नवविवाहित पत्नी उषाला म्हटले. ती घरी एकटी थांबायला तयार नसल्याने एक टांगा ठरवून आम्ही दोघेही त्या गिरिवर हनुमान मंदिरांत पोहोचलो. थंडीचा कडाका वाढला होता तोंवर आणि खूप अंधारही झालेला. तो वृद्ध महंत अक्षरश: कोकलत होता पायाच्या असह्य दुखण्यामुळे. त्यांचे पाऊल क्रिकेटबॉल सारखे टरारून सुजलेले नि अंगात एकशेचार डिग्री ताप ! पाऊलातील साचलेला पूं तातडीने काढणे अत्यावश्यक होते. माझी इमर्जन्सी बॅग परिपूर्ण होती. एऱ्हवी साध्या डेटॉलचा वास सहन न करणाऱ्या उषाने एखाद्या तज्ज्ञ नर्स प्रमाणे मला साहाय्य केले. सर्व रक्तमिश्रित पूं चा निचरा करून बॅन्डेज बांधले, त्या महंताच्या दोन्ही कुल्ल्यांवर एकेक ॲन्टिबायोटिक टेरामायसिन आणि इर्गापायरिन हे वेदनानाशक इंजेक्शन ठोकले आणि रात्री अकरा वाजता घरी पोहोचलो. त्या किर्र अंधारांत देवळांत लावलेली एकमेव मिणमिणती पणती आणि आमचा पॉकेट टॉर्च या जोरावर संपूर्ण ऑपरेशन झाले होते. त्या महंताने किंवा साघूंनी फी विचारली नाही की मीही मागितली नाही. आठ दिवसांनी ते महंत चालत ओपीडीत आले, मला भरभरून आशीर्वाद दिले आणि निघून गेले !
मंडळी, तो माझा पहिला प्रसंग नि:स्वार्थ मोफत सेवेचा, भरभरून आशीर्वादच मिळवण्याचा आणि त्यामुळे विलक्षण आनंद, समाधान, तृप्ती मिळण्याचा ठरला नि जो मला हयातभर मिळतच गेला आहे आजवर.
तस्मात ही साठाउत्तराची कहाणी अशी पूर्ण झाली ! आवडली असल्यास अंगठा दाखवा आणि नसल्यास त्यालाच उलटा करून दाखवा, मात्र दाखवा जरूर ! !
रहाळकर
२८ अक्टूबर २०२५.