Thursday, September 04, 2025

 

तळ्याकाठीं !

 तळ्याकाठीं……! 

अचानक कवी अनिलांची एक रचना आठवली - ‘अशा एखाद्या तळ्याकाठीं बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वत: निवारा शोधीत थकून आली असते…….!’ पूर्ण कविता सांगू की नको या संभ्रमात आहे आत्तां, कारण ते तुम्हाला कितपत हवे आहे ते माहीत नाही. तथापि आज खूपच पाहाटे जाग आली तेव्हा याच पंक्ती मी कदाचित स्वप्नांत वाचत असावा. होय स्वप्नातसुद्धा मला कविता वाचायचा छंद आहे. खरंतर स्वप्न ऑर नो स्वप्न, कविता ही कविताच असते जी कुठल्या ना कुठल्या स्मृतींना उजाळा देखील देत असते


मला आठवतेंय् गरोठ-शामगढ नजिकचे आता खूप नावारूपास आलेले तीर्थक्षेत्र. मात्र अदमासें पंचाहत्तर वर्षांपूर्वीं आई-वडिलांसोबत खूप खोल दरींत उतरूनताखाजीकिंवा तल्खलेश्वर हे क्षेत्र अण्णांनी शोधून काढले होते. त्या विशाल दरींत एक भले मोठे सरोवर नितळ स्वच्छ पाण्याने भरलेले मला स्पष्टपणे आठवतेय. जेमतेम नऊदहा वर्षांचा असेन मी तेव्हा, पण त्या विस्तीर्ण शांत जलाशयाच्या प्रेमांत पडलो मी. आजही शांतपणे डोळे मिटून बसलो की ते सरोवर झपकन आठवते आधी आणि मी हरवून बसतो स्वत:ला. असाच अनुभव मला कॉर्नवॉलच्यामीनाक्वर आला होता - अतिविशाल ॲटलान्टिक महासागराच्या एकालगूनकडे पाहताना. फार काय, खडकवासला येथील विशाल जलाशय पाहून तसा अनुभव कुणालाही घेता येईल. मात्र त्यासाठी थोडी सवड हवी, निवान्तपण हवे, मुख्य म्हणजे गर्दीगोंगाट अजिबात नसावा

असा एखादा झकास योग जुळून आला तर मनसुद्धा कसे हळूहळू निस्तरंग होऊ लागते, एका विलक्षण शांतीचा अनुभव येऊ लागतो…….! 


मला वाटतं मी अधिक लांबण लावण्यापेक्षा अनिलांची ती कविताच तुम्हाला वाचून दाखवतो

अशा एखाद्या तळ्याकाठीं 

बसून राहावे मला वाटते

जिथे शांतता स्वत: 

निवारा शोधीत थकून आली असते

जळाआंतला हिरवा गाळ

निळ्याशी मिळून असतो काही

गळून पडत असताना पान

मुळी सळसळ करत नाही

सावल्यांना भरवीत कांपरे

जलवलयें उठवून देत

उगीच उसळी मारून मासळी

मधूनच वर नसते येत.

पंख वाळवीत बदकांचा थवा

वाळूत विसावा घेत असतो

दूर कोपऱ्यात एक बगळा

ध्यानभंग होऊ देत नसतो.

हृदयावरची विचारांची धूळ

हळुहळू जिथे निवळत जाते

अशा एखाद्या तळ्याच्या कांठी

बसून राहावेसे मला वाटते ! !’ 

बास्स्……

रहाळकर

सप्टेंबर २०२५      


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?