Friday, November 15, 2024
ओंकार दर्शन !
ओंकार दर्शन !
खूप वर्षांपूर्वी माझा दुराग्रही स्वभाव जाणून तीर्थरूपांनी माझ्याशी आध्यात्मिक विषयांवर बोलणे टाळले असावे. त्या काळी माझा डाव्या विचारसरणीचा पगडा त्यांनी ओळखला असावा. अर्थात त्याला कारणही तसेच विचित्र होते, कारण तारूण्याच्या मस्तींत मी त्यांना चक्क कार्ल मार्क्सचे वचन बोलून दाखवण्याचा मूर्खपणा करून बसलो होतो ! त्या क्षणीं तर त्यांनी केवळ हसण्यावर आपली प्रतिक्रिया दर्शवली होती, मात्र पंधराच दिवसांनी त्यांनी केलेले ‘संतांचा साम्यवाद’ या विषयावर केलेले प्रवचन ऐकून अक्षरश: थिजून गेलो होतो मी. एऱ्हवी संध्या, पूजा वगैरे टाळणारा मी चक्क पुन्हा संध्यावंदन करू लागलो, अर्थात खूपशा यांत्रिकपणे ! त्याच दरम्यान वडिलांनी मला संध्येतली चोवीस नावे म्हणून दाखवायला सांगितले आणि मी घडघडा केशवाय नम: नारायणाय नम: अशी सलग चोवीस नावे घेऊन दाखवली. मात्र त्यांचे अजिबात समाधान झाले नव्हते कारण प्रत्येक नामाचे आधी ‘ओम्’ हे संपुट मी लावलेच नव्हते ! मात्र अतिशय आग्रहाने ओंकार स्वरूपाबद्दल आणि त्याचे महत्व सांगायचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यावेळी ते कितपत झिरपले माझ्यात हे सांगणे अवघड असले तरी गेली जवळजवळ पन्नास वर्षे माझी पहाटेची ओंकार साधना क्वचित अपवाद वगळतां अव्याहत चालू आहे.
खरंतर वयाच्या पस्तीशींत असताना साई संघटनेत प्रवेश झाला नि विविध सेवाकार्यें नि आध्यात्मिक कार्यक्रमात सहभाग घडू लागला. पहाटेचे ‘नगर-संकीर्तन’ आणि त्या आधीचे एकवीस दीर्घ ओंकार यांची सुरूवातीलाच चटक लागली आणि त्या उत्साहाच्या भरांत कधीकधी वेळीअवेळी देखील ओंकार करायची खुमखुमी यायची तेव्हा !
नंतर कालांतराने ओंकार-साधनेचे महत्व हळूहळूं जाणवत गेले. कधीकधी अतिशय लयबद्ध रूपात ओंकार घडत तर कधी अगदीच यांत्रिकपणे. अर्थात एक महत्वाची बाब जाणवत राहिली की ज्या दिवशी मनासारखे ओंकार होत तो दिवस अतिशय चैतन्यमय आणि यशस्वीरित्या जात असे. यामुळेच असेल कदाचित् पण सहसा तसा अनुभव चुकवावासा वाटेनासा झाला असावा.
आम्ही लवळ्यास जाता येतां बरेच वेळां भुकूमच्या गणोरेबाबांच्या आश्रमात जात असूं. श्रध्देय गणोरेबाबांचा ओंकार साधनेवर भर होता. त्यांचे दर्शन घडल्यावर ते कधी कधी जवळ बसवून घेत आणि ओंकाराचे महत्व समजावून सांगत. आमच्या बालविकास केंद्रातही ‘ओंकार बिन्दु: संयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिन: ,कामदं मोक्षदं चैव, ओंकाराय नमो नम:’ हे स्तोत्र प्रत्यहीं शिकवले जात असे.
भगवद्गीतेतील सतराव्या अध्यायांत ओंकाराचे सुरस वर्णन माऊली करतात तर प्रारंभींही श्रीगणेशाला ओंकार-स्वरूपा म्हणूनच आळविले आहे त्यांनी.
वास्तविक ओंकार-साधनेवर अनेकानेक श्रेष्ठींनी भरपूर सांगून ठेवले असले तरी अल्प म्हणता म्हणता बरेच धार्ष्ट्य करीत आलोय आजवर, सांवरून घ्यावे एवढीच विनंती !
रहाळकर
१५ नोव्हेंबर २०२४.
Tuesday, November 12, 2024
मन भावन !
मन-भावन !
एक जुने सुंदर गीत नुकतेच ऐकण्यात आले - ‘बरसे बूंदियां सावन की, सावन की मन भावन की’ - लताजींच्या सुमधुर स्वरांत चिंब भिजलेले. लगेचच पं. अजोय चक्रब्रतींचेही ‘बरसे बदरिया सावन की’ हेही ऐकले आणि त्यांच्या मुलायम गंभीर स्वरांनी मंत्रमुग्ध करून टाकले. विशेषकरून ‘मीरा के प्रभु गिरिधर नागर, आनंद मंगल गावन की’ हा अंतिम चरण तर भावविभोर करून गेला !
मात्र इतके झकास मीरा भजन ऐकताना ‘मन-भावन’ या शब्दाने जणू ठाण मांडले हृदयात आणि त्यावर थोडे चिंतन करावेसे वाटले.
वास्तविक सुरेल गीत नि गंभीर चिंतन यांत परस्पर असा डायरेक्ट संबंध नसला तरी त्या गीतातील एखादा शब्द किंवा निव्वळ आलाप देखील मनाला हिंदोळे देऊ लागतो हा तुमचाही अनुभव असणारच म्हणा.
मन भावन म्हणजे मनाला भावणारे, आवडणारे, रिझवणारे नि सद्गद करणारे. कशामुळे घडते तसे ? जिथे आनंद आणि मांगल्याचे साम्राज्य असेल तिथेच मन रमते ना. कोणतेच मन कष्ट, दु:ख, मनस्ताप नि अपमान सहन करत नाही कारण मुळात ते आनंदस्वरूप, निरीच्छ नि स्वच्छ असते. मात्र बाह्य गोंगाट आणि अस्थिरता त्याला त्यांत गुरफटून टाकते.
एखादा अतिसुंदर देखावा, निसर्गाची मोहक छटा, शिल्पांत दडलेले भाव, चित्रकाराच्या विलक्षण रंगछटा, कवींच्या कल्पनेची झेप नि भरारी, उत्तम साहित्याविष्कार, इतकेच नव्हे तर बालकाचे निरागसपण , युवतींतील सौंदर्य, दानशूर माणसाची दिलदारी वगैरे कोणाचेही मन मोहरून टाकते ना !
हे सर्व मन भावन या सदरात मोडते यात दुमत असण्याचे कारण नाही.
रहाळकर
१२ नोव्हेंबर २०२४.