Thursday, October 31, 2024
‘सोलह आने सच्’ !
सोलह आने सच् !
‘सोलह आने सच्’ म्हणजे शंभर टक्के खरं. एखादी गोष्ट ठासून सांगायची असेल तर आपण ती दोनदा तरी म्हणतो, किंवा ‘आईशप्पत खरं’ अथवा ‘अगदी शंभर टक्के’ अशी ग्वाही देतो. आमच्या जमान्यात, खूप पूर्वी एका रूपयाचे सोळा आणे असत, एक आण्याला चार पैसे नि एका पैशाला तीन पै लागत. नव्या पीढीला तर नाहीच, पण आम्हालाही ते लक्षात ठेवणे अवघड होऊन बसलेंय आतां. अर्थात त्याची गरजही नाही म्हणा. बहुतेक. एकोणीसशे चोपन्न किंवा सत्तावन्न सालीं दशमांक पध्दत रूढ झाली असली तरी ‘सोलह आने सच्’ हा वाक्प्रचार कायम राहिला आहे.
तसं पाहिलं तर कोर्ट कचेऱ्यांत ‘गीतेवर हात ठेवून ‘मै सिर्फ सच् कहूंगा, सच् के सिवा कुछ भी नही’ वगैरे शपथ केवळ सिनेमा किंवा नाटकात घेतली जात असावी आणि समजा तशी शपथ घेतली जात असली तरी असत्त्याचाच बोलबाला अधिक असतो हे सर्वजण जाणून असतात. असो.
या ‘सोलह आने’चा प्रभाव मात्र शोधला तर दिसून येईल. ‘उन्नीस बीस’ का फर्क किंवा ‘ऐंशी तिथे पंच्यांशी’ असे शब्द आपण बरेच वेळां ऐकतो. किंवा ज्ञानेश्वरीत सोन्याच्या कसाला ‘पंधराविये’ असा शब्द येतो. तेवीस कॅरट् नि चोवीस कॅरट सुवर्णांत शुद्धतेंत खूपच सूक्ष्म फरक असेल कदाचित, पण ‘सोलह आने’ ला पर्याय नसेल. तेही असो.
मी मागे केव्हातरी म्हटले तसे निव्वळ सत्यावर अ-सत्त्याची दाट सावली कधी पडते ? मला वाटतं ते सत्य कथन करत असताना त्याला अधिक प्रभावी करण्यासाठी जेव्हा त्याला मिर्चमसाला जोडला जातो तेव्हा त्यांत असत्त्याची भेसळ कधी नि कशी झाली ते कळतही नाही. म्हणूनच मोजके नि नेमके बोलता आले पाहिजे. युधिष्ठिराला जेव्हा यक्षप्रश्न पडला तेव्हा ‘नरो वा कुंजरो वा’ अशी पळवाट त्या प्रत्यक्ष धर्मराजांना शोधावी लागली ! त्यातही आपले शब्द मागे घ्यावे लागणे या सारखा दैवदुर्विलास नसेल. मी सर्वसामान्यांबद्दल बोलतोय, एकाही राजकारण्या विषयी नाही याची कृपया नोंद घ्यावी.
एखाद्या उत्तम ‘डिबेट’ किंवा चर्चासत्राचे वैशिष्ठ्य असे हवे की पूर्वपक्ष किंवा उत्तरपक्ष यांनी प्रतिपादन केलेला विषय प्रभावीपणे नि सप्रमाण खोडून काढणे किंवा त्याला दिलदारपणाने दुजोरा देणे असा असला पाहिजे. असे कित्येक उत्तम परिसंवाद ऐकण्याचे भाग्य तर मला शाळाकालेज तसेच नंतरही लाभले आहे. म्हणूनच अशा चर्चा कानांवर पडण्यासाठी मी आसुसलेला असतो नेहमी.
अर्थात ‘सोलह आने सच्’ अशी वेळ अभावानेच येते हेही खरे आहे म्हणा !
रहाळकर
३१ ऑक्टोबर २०२४.
Tuesday, October 29, 2024
होळकर कॉलेज इन्दौर !
होळकर कॉलेज इन्दौर !
माझे कॉलेज जीवनाचा प्रारंभ दि ग्रॅंड एन्शंन्ट होळकर कॉलेजपासून सुरू झाला एकोणीसशें सत्तावन्न सालीं, पहिल्या वहिल्या स्वातंत्र्य-संग्रामाच्या ठीक शंभर वर्षांनी. तो संग्राम तसे पाहिले तर अजूनही सुरू आहेच म्हणा. असो.
माझे अख्खे शालेय जीवन डोईवर टोपी, अर्ध्या बाह्यांचा शर्ट, अर्धी विजार नि सॅन्डल्स अशा पेहेरावांत पार पडला. तोंवर पॅन्ट-बुशर्ट किंवा साधा पांढरा पायजामा किंवा ‘लेंगा’ परिधान केला नव्हता. तसे पाहिले तर पट्ट्या पट्ट्याचे पायजामे, जे सिंधी मंडळी हमखास वापरीत, ते मात्र बरेच वापरले गेले. त्यावरून आठवले सिंधी माणसांचे अतिक्रमण. शरणार्थी म्हणून आलेल्या त्या बिरादरीने संपूर्ण भारतांत आपले बस्तान बसवले नि पाहता पाहतां इथल्ल्या बाजारपेठांवर चांगलाच जम बसवला. असो.
पांढरा कुर्ता-पायजामा मी प्रथमच कॉलेज प्रवेश झाल्यावर शिवून घेतला आणि नौकरींत असताना कामावर जाण्याव्यतिरिक्त तोच पेहेराव आजतागायत माझे अंग झांकत आला आहे ! तेही असो.
मला होळकर कॉलेज मधल्या काही रम्य आठवणी सांगायचा मोह होतोय आज. पहा, वाटलेच तर वाचा पुढचे चऱ्हाट, नाहीतर खुशाल डिलिट करून टाका - मला वाईट वाटणार नाही.
तर, ते सोनेरी दिवस कसे आशा-आकांक्षानी पूर्णपणे व्यापून असतात याचा तुम्हालाही नक्कीच अनुभव असणार. नुसत्या आशाआकांक्षाच नव्हे तर सुनहरी स्वप्ने पाहण्याचा कालखंड असतो तो. एक वेगळीच ऐट आपल्या वागण्या-बोलण्यांत येते, केसांची झुलपें उडवावीशी वाटतात, मानेवरील कॉलर उगीचच ताठ होत असते नि जगावेगळा आत्मविश्वास पावलांना गतिमान करतो.
त्यातून होळकर कॉलेजसारख्या महाविद्यालयांत ॲडमिशन मिळणे म्हणजे ‘सोने पे सुहागा’ ! त्याच कालेजातून माझे वडील, काका, इतकेच नव्हे तर श्वशुर महोदय देखील सन्मानाने डिग्र्या घेऊन बाहेर पडले असल्याने बऱ्याच दंतकथा आधीच कानावर पडल्या होत्या. सॉरी, श्वशुर महोदयांची गाठ खूप उशीरा पडली, शिक्षण जवळजवळ संपल्यानंतर ! पुन्हा असो.
त्या काळीं कालेजला लागूनच मुलांचे हॉस्टेल देखील होते आणि माझे काका तेव्हाही खूप धष्टपुष्ट असल्याने त्यांनी केलेल्या नवीन रिक्रूट्सचे रॅगिंग तसेच हॉकीत मैदान गाजवल्याच्या सुरस कथा ऐकून होतो. त्या मानाने वडील कालेजच्या सांस्कृतिक विभागात आणि साहित्यिक क्षेत्रात अधिक सक्रिय राहिले होते. माझ्यासाठी मात्र कालेजचा एकूणच माहौल अचंभित करणारा मात्र खूप उत्साहवर्धक ठरला. कालेजच्या सर्व बिल्डिंग्ज कायम स्वच्छ सुंदर, प्रत्येक इमारतींवर बोगनवेल नि फुलझाडांच्या वेलींनी विलक्षण शोभिवंत आणि एकूणच रंगसंगती अतिशय मोहक अशीच होती.
कॉलेजचे कॅन्टीन खूप मोठे होते नि कायम गजबजलेले देखील. चहा-नाष्ट्यापासून दुपारच्या जेवणाची सोय होती. वर्ग सकाळी लवकर लागत, त्यामुळे दररोजचा चाय-पोहा कधी चुकला नाही. मात्र माझे तेव्हांचे आवडीचे ठिकाण म्हणजे लायब्ररी नि रीडिंग रूम. कधी क्लास बंक केलाच तर मी चक्क रीडींगरूमचा आश्रय घेई. त्या रीडींगरूम मधे देशविदेशातील कित्येक वृत्तपत्रे दररोज बदलली जात, तसेच अनेक नियतकालिकें साप्ताहिकें वगैरेंची रेलचेल असे. ‘शंकर्स वीकली’, ब्लिट्झ, धर्मयुग, इलस्ट्रेटेड वीकली, दि स्टेट्समन, दि गार्डियन तसेच ‘प्रावदा’, न्यूयॉर्क टाईम्स सारख्या मित्रांची तिथेच गट्टी जमली माझी.
गणित-प्राधान्य ‘ए’ ग्रूप घ्यायची इच्छा होती माझी आणि इंजिनियर व्हायचे म्हणून मॅट्रिकला मी ‘हायर मॅथ्स’ निवडले होते. तथापि, सायन्स मॅथ्स मिळून मार्कांची चाळिशीही पार करू शकलो नव्हतो मी. माझा ‘ए’ ग्रूपचा अर्ज पाहून प्राचार्य डॉ. भागवतांनी वडिलांना पाचारण करून, ‘ही इज ए डफ्फर इन सायन्स ॲंड मॅथ्स, लेट् हिम जॉईन आर्ट्स इन्स्टेड’ असा फुकट नि कुजकट सल्ला दिला. मला ‘आर्ट्स’ ला जायचे नसल्याने किमान ‘बी’ ग्रूप अर्थात बायॉलॉजी घेणे भाग पडले मला !
ते असो, माझा होळकर कालेजचा प्रवेश तर पक्का झाला होता आणि मी नव्या उमेदीने आणि मनापासून वर्गात हजेरी लावूं लागलो. त्या वर्षी वर्गात तीन मुली होत्या - आशा परचुरे, निर्मला अग्निहोत्री नि सरला साहाय ! अग्निहोत्री कायम फर्स्ट क्लास, परचुरे अतिशय शिष्ठ नि साहाय सिंधी असल्याने खूप नट्टापट्टा करणारी. साहाजिकच कुठे मन बसावे अशी एकही नव्हती ! असू देत !
बॉटनी आणि झूलॉजी हे विषय अगदी नवीन होते माझ्यासाठी म्हणून कुतुहलापोची दोन्ही विषय छान पचनीं पडले माझ्या. तिथेही फिजिक्स नि केमिस्ट्री हे दोन विषय छळायचेच, पण डॉ. भागवत नि मन्शारामानी या उत्तम प्राध्यापकांनी ते किंचित सोपे केल्यामुळे माझे पुढे फारसे अडले नाही.
तेव्हाचे इंग्रजीचे प्राध्यापक गोळे सर नि सुळे सर उत्तम प्रोज नि पोएट्री शिकवीत. ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ शिकवणारे सर तर साभिनय शिकवीत, त्या त्या ‘रोल’ मधे घुसून. इंग्रजी भाषेवर त्यांचेमुळेच प्रेम जडले कायमचे.
एऱ्हवी मित्र परिवार सहज जुळत नसल्याने दोनतीन मित्र मात्र कायमचे जोडले गेले खरे. खातेगावच्या पोष्ट ऑफिसाच्या बाहेर बसून लोकांची पत्रें, मनीआर्डरी लिहून देणाऱ्या ‘लिखान-नवीस’चा मुलगा मोहन रेगे माझा अंतरंग मित्र झाला तर ग्वाल्हेरला संगीत क्लास चालवणाऱ्या पंडितजींचा मुलगा रोहन कडुसकर हाही तेव्हाचा मित्र ! कदाचित पोष्टातल्या लिखान-नवीसची प्रेरणा घेऊन मी इतरांचे शब्द लिहू लागलो नि कडुसकरमुळे संगीत आवडू लागले असावे ! ! ते देखील असू देत बरे का !
मला वाटतं मला आता कंटाळा येऊ लागलाय नि तुम्ही तर केव्हापासून जांभया देत आहांत ! सबब थांबतो आतां.
रहाळकर
२९/१०/२०२४