Sunday, September 29, 2024
तोचि साधू ओळखावा !
तोचि साधू ओळखावा !
मंडळी, माझ्या बऱ्याचशा लिखाणांमधून साधु, संत, सत्पुरूष वगैरे शब्द वारंवार लिहिले जातात. वास्तविक आपण या सर्वांना ‘होऊन गेलेले’ या स्वरूपात ओळखतो. मात्र आपल्या अंवतीभवती तशी मंडळी हमखास वावरत असतात याचे अनेकांना भान नसते, कारण साधू संत वगैरेंबद्दल आपण काही ठोकळ आडाखे बांधून असतो. किंचित तिरप्या नजरेने पाहू गेल्यास ते कोणालाही सहज टिपतां येऊ शकतात.
साधू म्हटले की भस्म फांसलेला, केवळ लंगोटी किंवा गुडघ्यापर्यंत वस्त्र गुंडाळलेला, जटाधारी नि हातात भिक्षापात्र मिरवणारा एखादा भणंग नजरेपुढे ठाकतो तर संत म्हणजे गळ्यात खूपशा रूद्राक्षमाळा, भाळावर भस्म किंवा गंधाच्या रेषा ओढलेला, धीरगंभीर प्रसन्न व्यक्तिमत्वाचा नि सोबत कित्येक शिष्यवर्ग घेत वावरणारा असा बहुतेक वेळी समज असतो.
आपल्या भारतभूमींत असंख्य साधुसंत होऊन गेले असले तरी तसे सत्पुरूष आजही ओळखणे खरंतर फारसे अवघड नाही, कारण हा अनुभवाचा, अनुभूतीचा प्रांत आहे. निव्वळ बाह्य सोपस्कार न मिरवतांही कोणालाही संत ‘होणे’ शक्य आहे. आपली समाज-जीवनातील वर्तणूक आपल्याला चांगला, वाईट किंवा ‘सो सो’ ठरवू शकते मात्र आपण रात्रंदिवस, अगदी एकटे असतानाही कसे आचरण करतो त्यावर आपले ‘साधुसंतपण’ अवलंबून असते. मी माझ्या विचारांवर नि विकारांवर किती नियंत्रण ठेवू शकतो यावरच अर्थात ते निगडीत आहे.
अचानक मोरोपंतांची आर्या आठवली - सुसंगति सदा घडो । सुजन वाक्य कानी पडो ।।कलंक मनिचा झडो । विषय सर्वथा नावडो ॥ वगैरे.
हे प्रत्येकाला जमेलच असे नसले तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे ! तसेही आपण दर वर्षी एखादा नवा संकल्प मनाशी ठरवतेच ना, तर यावेळी संत होण्याचा चंग बांधायला काय हरकत आहे ?
माझे एक ज्येष्ठ नि श्रेष्ठ स्नेही म्हणत, ‘तुला संत व्हायलाच पाहिजे, कारण तेच तुझे प्राक्तन आहे, तोच तुझा स्वधर्म असला पाहिजे’ ! आणि मग पुस्ती जोडत, ‘रिमेंबर द श्लोका - शुचीनां श्रीमंतां गेहे योगभ्रष्टोsभि जायते’. यू आर डेस्टीन्ड टु बी ए संत ! !
(पुढच्या वेळी भेटू तेव्हा संतबिंत म्हणू नका, मला अजून तसा संकल्प करायचाय् ! )
रहाळकर
३० सप्टेंबर २०२४.
नाटक नाटक !
नाटक नाटक !
आज सकाळी सकाळी एका प्रवचन करणाऱ्या व्सक्तीचे शब्द कानांवर पडले आणि ती संथ लय, जाणून बुजून व्यक्त होत असलेला शांत अविर्भाव, किंचित अतिरेकी वाटावी अशी विनम्रता आणि भगवंताचे नाव घेताना दाटून येत असलेला उमाळा ऐकून त्यावर जरासे चिंतन करावेसे वाटले. अर्थात अशा स्वरूपाची अनेक उद्बोधनें याआधी कानांवर पडली असली तरी आजच्या या प्रवचनाने त्या विशिष्ट ‘स्टाईल’ किंवा लहैज्याने आतून एक वेगळाच विचार उफाळून आला नि तो असा की खरंच का हो असे प्रवचनकार आपले दैनंदिन जीवन तसे जगत असतील ?
सर्वप्रथम आठवले स्वामी माघवनाथ, ज्यांची प्रवचनें आम्हाल सलग पाच वर्षे दररोज ऐकतां आली. त्यांचे व्यक्तिगत जीवन देखील जवळून पाहण्याचा अनुभव आला तसेच त्यांचा अमाप लोकसंग्रह सुध्दा. त्यांचे विषयीं मनात तसूभरही किंतु-परंतु नाही. खरोखरच ऋषितुल्य दैनंदिन जीवन होते त्यांचे.
जे कधीही ‘आस्तिक’ म्हणून ओळखले गेले नाहीत मात्र जीवन - वैयक्तिक नि पारलौकिक देखील- खरेखुरे आध्यात्मित जीवन जगले ते होते एस् एम् जोशी, ना ग गोरे प्रभृति ऋषितुल्य मंडळी. त्यांनी कधीही पारमार्थिक प्रवचने वगैरे केली नसली तरी त्यांनी मानवी मूल्यांशी प्रतारणा केली नसावी असे माझे प्रांजळ मत आहे, आणि म्हणून त्या अर्थी ते निश्चितच आध्यात्मिक किंवा आस्तिक होते.
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची अनेकानेक उद्बोधने ऐकायला मिळाली मला. केवळ शब्दप्रभूच नव्हे तर खोलवर दडून बसलेला त्यांच्यातील संत कधीच लपून राहिला नाही.
आमच्या इंदूरचे प्रा. प्र गो घाटे तशाच पठडीतले. त्यांचेही वैयक्तिक जीवन आदर्श असेच होते. म्हणजेच ‘कथनी नि करनी’ यांत या मंडळींत कधीही गोंघळ झाल्याचे निदान माझ्या ऐकीवात नाही.
मात्र याच्या अगदी उलट अशाही काही व्यक्ती नजरेपुढे येतात ज्यांच्या बोलण्यात नि वर्तनात काडीभरही एकवाक्यता नाही. अशांनाच तर ‘भोंदू’ म्हणतात ना ! अर्थात ते ‘नाटक’ नाटकापुरतेच मर्यादित राहते म्हणा ! !
रहाळकर
२९ सप्टेंबर २०२४.