Friday, June 28, 2024

 

देव मला दिसला हो…..!

 देव मला दिसला हो …….!


आज आकाशवाणीवर शांताबाई शेळके यांचे एक अप्रचलित गीत ऐकले - ‘देव मला दिसला हो……!’ ते शब्द ऐकता ऐकतां गीत कधी संपले ते कळले नाही. गूगल् वर शोधूनही मला ते सापडू शकले नाही. तथापि, जे काही शब्द कानीं पडले होते तेही छानपैकीं आनंदीत करीत चिंतनासाठी पुरेसे आहेत

देव मला दिसला हो, झुळझुळणाऱ्या पाण्यामधुनी, पक्षांच्या चिवचिवटातुनि, सहज बोबड्या शब्दांमधुनी, देव मला दिसला हो……!’ 


वास्तविक देवदिसलाअसे म्हणताना वर्णन आहेऐकण्याचे’ ! मग लगेच जाणवले की कोणतीहीजाणीवशब्द, स्पर्ष, रस, रूप नि गंध या तन्मात्रांतून अथवा इंद्रियांच्या त्या त्या विषयांतूनच तर होत असते ना. अर्थात त्यांची जाणीव करून देते अंत:करण


आणि म्हणून एक प्रश्न विनाकारण सतावूं लागला की ईश्वराला, देवाला पाहायचे असेल तर यमनियमादि अष्टांग योग वगैरेंचा अट्टाहास कशासाठी ? इंद्रियनिग्रह, मनोनिग्रह, आसनसिध्दी वगैरेंची खरंच गरज आहे काय ? इंद्रियांच्या विषयांनी म्हणजेच शब्द-स्पर्षादि साधनांनीच जरदेवदिसत असेल, अनुभवतां येत असेल तर कठोर साधनांची आवश्यकताच काय ? ( मला ठाऊक आहे की वडीलधारी मंडळी या उच्छृंकल वटवटीला गालातल्या गालांत हंसतील, कदाचित डोळेही वटारतील. ) पण मला सांगा, हा प्रश्न तुम्हालाही भेडसावूं लागला तर तुम्ही काय कराल ? मी सांगू, तुम्ही काहीच करणार नाही कारण हे निरर्थक वाटेल तुम्हाला. कदाचित्सोशल मीडीयाचावापर कराल, कदाचित पूर्ण दुर्लक्ष कराल


देव पाहण्या किंवा शोधण्या ऐवजीं अंतर्मनांतूनच त्याला अनुभवतां आले तर ? मग एखाद्या शांताबाईंना तो झुळझुळणाऱ्या पाण्यांत दिसेल, पक्ष्यांच्या चिवचिवाटातून, बालकांच्या बोबड्या शब्दांतून किंवा गेलाबाजार मध्यरात्रीच्या प्रशांत शांततेंतही ! ! 

रहाळकर

२८ जून २०२४   


Wednesday, June 26, 2024

 

माझे सहाध्यायी

 माझे सहाध्यायी 

असे म्हणतात की नवरा-बायकोच्या जोड्या वर स्वर्गात ठरवलेल्या असतात. मी एक पाऊल पुढे टाकून म्हणेन की सर्वच सगेसोयरे, मित्रमंडळी इतकेच नव्हे तर समोरून येणारी अनोळखी व्यक्ती देखील पूर्व संकेतांनुसार आपल्या पुढ्यांत येत असते. सर्वकाही प्री-प्लॅंड, प्रोग्रॅम्ड

तोच धागा पकडून मी म्हणेन की शाळा-कॉलेज मधील आपले सहाध्यायी सुध्दा पूर्वनियोजित असले पाहिजेत. मात्र असे पूर्वनियोजित सहाध्यायी विलक्षण बुध्दिमान, चतुर, विनोदप्रिय, कर्तृत्ववान आणि खिलाडू वृत्तीचे असतील तरसोने पे सुहागा’ ! मी याही बाबतींत भाग्यवान आहे की माझ्या वेळचे कित्येक सहाध्यायी वर म्हटलेल्या गुणांनी ओतप्रोत असेच होते

त्या वेळचे कित्येक सहाध्यायी पुढे खूप नावारूपास आले तर काहींना दुर्दैवाचे फटके सहन करावे लागले. शेवटी प्रत्येकाचे प्राक्तन आणि विधिलिखित सुध्दावरुनचआले असते ना. नव्हे, माझे एक ज्येष्ठ स्नेही म्हणत, ‘ललाटरेषा ? किसने लिखी थी ? अरे, ‘तूने ही तो अपने कर्म से ! !’ असो, विषयांतर होऊ द्यायचे नाही असा निर्धार आहे आजचा


मी सांगत होतो माझ्या काही सहाध्यायां बद्दल. मला कौतुक आणि अभिमान आहे भोंडवे, पारोळकर, शरद भांड, बापट नि फाटक यांचा, जे कर्नल, ब्रिगेडियर इतकेच नव्हे तर मेजर-जनरल या रॅंक पर्यंत पोहोचू शकले. जोशी आणि नामजोशी चक्क आय..एस्. झाले तर बजाज डायरेक्टर मेडिकल सर्व्हिसेस . प्र. शासन मधून सेवानिवृत्त झाला. क्रिकेटमध्ये काकीर्डे, नरेंद्र मेनन, भगवानदास आणि भागवत यांनी रणजी ट्राफी गाजवली. कित्येकांनी निष्णात सर्जन, फिजीशियन आणि तज्ज्ञ विशेषज्ञ म्हणून नावलौकीक मिळवला तर काही समाजकार्यांत आकंठ बुडी मारत राहिले. राजकारणांत केवळ प्रकाश खराटे शिरला आणि त्याने मध्यप्रदेशच्या कांग्रेसी राजकारणात बऱ्यापैकी नाव कमावले


म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यातच ओळखू येतात, तसे अनेक सहाध्यायी त्या दिवसांतही इतरांपेक्षा वेगळे जाणवत. अर्थात या विधानाला दोन बाजू आहेत. काहीजण विलक्षण नावलौकिक कमावतील असे वाटणारे अचानक दुर्दैवाच्या फेऱ्यांत अडकून पडले तर माझ्यासारखे काही मठ्ठ चक्क यशस्वीही ठरले. जनू खांडेकर अमेरिकेतल्या एका नावाजलेल्या शिक्षण संस्थेत डायरेक्टर झाला तर प्रफुल्ल देसाई अमेरिकेतील एक निष्णात यूरॉलॉजिस्ट म्हणून नावाजला गेला. सरोजा कृष्णन गोपालन एक यशस्वी पीडियॅट्रिशियन म्हणून गाजली अमेरिकेत तर माझा जीवश्चकंठश्च पमू खिरवडकर इंग्लंडांत स्थायिक झाला


व्हेटर्नरीतला माझा क्लासमेट जे.एम्.शर्मा उत्कृष्ठ बास्केटबॉल खेळाडू होता, ज्याचे नावाने .प्र. मध्ये जे एम शर्मा बास्केटबॉल ॲकॅडमीचीची स्थापना झाली

डावखुरा चंद्रकांत चातुर अतिशय बुध्गिमान नि कायम पहिला येणारा, पण आईवडील अचानक निवर्तल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून कृष्णपुरा कॉर्नरवर द्रोणपत्रावळी विकण्याचे दुकान चालवीत राहिला आयुष्यभर

शाळेत असताना मधल्या सुटींतबंदी साखळीचा खेळ खूप रंगायचा आणि त्या गलक्याने आख्खा परिसर दुमदुमून जाई. दिक्षित, खांडेकर, चंपू जोशी वगैरे पोरें धमाल करीत


नुकताच गोव्यातून माझा सहाध्यायी डॉ. प्रकाश नायक कुराडे घरी येऊन भेटून गेला. त्याचेही वय अवघे चौऱ्यांशी, पण सकाळी सात ते संध्याकाळी सहासात पर्यंत अखंड रूग्णसेवेत गुंतून असतो. आजही शे-सव्वाशे पेशंट्स रोज तपासतो आणि एक अतिशय यशस्वी, मनमिळावू डाक्टर म्हणून त्याची ख्याती आख्ख्या मडगाव भागात अजूनही दुमदुमते आहे


आहे की नाही मी भाग्यवान, की मला असे सहाध्यायी लाभले

रहाळकर

२६ जून २०२४.   


This page is powered by Blogger. Isn't yours?