Friday, May 31, 2024
ऊपरवाला !
ऊपरवाला…….!
आज ‘प्रभात वंदन’ मध्यें ‘कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोघिशी काशी’ हे बाबुजींचे सुंदर गाणे ऐकले आणि त्यांतील प्रत्येक शब्द अगदी आतून दाद देऊन गेला.
खरेतर आपल्यातील प्रत्येकानेच आसमंतात भरून उरलेला ‘देव’ प्रत्यक्ष पाहिला आहे, अनुभवला आहे. मात्र त्याची शब्दांत किंवा गीतांतून अभिव्यक्ती करण्यासाठी काही निवडक मंडळींची योजना त्याच परब्रह्माने केलेली आपण पाहात आलोंय.
अगदी बालपणापासून देव वर आकाशात असतो असे आपण मानत आले आहोत. स्वर्ग देखील वर आकाशाकडे बोट करून दाखवला जातो - आणि नर्क जमीनीखालीं ! या पृथ्वीला मात्र मृत्युलोक म्हणून संबोधले जाते. खरंतर हे तीनही प्रत्यक्षात असतच नाहीत हे वास्तव कळायला म्हातारपण यावं लागतं ! म्हातारपणीं जाणवतं की स्वर्ग, नर्क नि मृत्यू हा निव्वळ भ्रम असतो. येत असलेला नि आलेला प्रत्येक क्षण या तीनही नसलेल्या अवस्थांची अनुभूती देत असतो असे तुम्हाला कधी वाटले आहे काय ? गुगली पडली की काय, पण जरासे थांबून विचार करून पाहूया !
मला सांगा, तुम्ही आम्हीच नव्हे तर जगातले सर्व भाविक आकाशाकडे पाहात त्या ‘परवरदिगार’ ऑल हाय अल्लामियां, येशू, झोरास्टर, बौध्द, वगैरे वगैरे सर्वजण कुठे शोधतात आपापल्या इष्टानिष्ट दैवतांना ?
या ‘उपरवाल्याला’ आळवावं कां लागतं ? तो जर सर्वव्यापी, सर्वान्तर्यामी असेल तर त्याला कोंदणात बसविण्याचा किंवा अडकवायचा खटाटोप कशासाठी ? खरेतर आपापले उपास्य दैवत कायम आपल्या जवळ असते, अगदी अंतरंगात ठाण मांडून बसलेले. त्याला शोधण्यासाठी ऊप्पर काय कू देखनेका !
खूप वर्षांपूर्वी पाहिलेल्या एका हिंदी सिनेमातले गाणे होते मोहम्मद रफीचे, बहुतेक कालाबाजार मधले. ‘अपनी तो हर आह एक तूफान है, ऊपरवाला जानकर भी अनजान है’ वगैरे. संदर्भ दुसरा असला तरी त्या गीतातले शब्द पुन्हा आठवले आज ! ‘ऊप्परवाला जानकर भी अनजान है ! !
रहाळकर
३१ मे २०२४
Monday, May 27, 2024
रेसिपी…..!
रेसिपी…….!
तुम्हाला कधी प्रश्न पडतो काय की डॉक्टर मंडळी औषधाचे प्रिस्क्रिप्शन लिहिताना आधी पाय मोडलेला ‘R’ कां लिहितात ते ? मला आठवतोय् आमच्या फॉर्मेकॉलॉजीच्या शिक्षकाने सांगितलेला अर्थ. ‘R’ हा रेसिपीचा शॉर्टफॉर्म होय. याचा पाय का मोडलेला ? मला माहीत नाही, तुम्ही शोधून काढा. रेसिपी हा मूळ ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ होतो - ‘In the name of God’ ! ईश्वराला स्मरून केलेली औषध योजना ! मजेदार आहे ना हा अर्थ ? तेव्हाही सर्व आरोग्य चिकित्सकांना माहीत होते की केवळ उपचार करणे त्यांचे हाती असते, जीवनदान करणारा फक्त नि फक्त परमेश्वर असतो. तोच कित्ता गिरवतील आजवरचे सर्व चिकित्सक हा ग्रीक शब्द ‘रेसिपी’ कळत न कळत (ईश्वराला स्मरून) वापरत आले आहेत.
हल्ली आपण पाहतो नि ऐकतो दररोज येणाऱ्या नवनवीन ‘रेसिपीज’. मात्र त्या सर्व ईश्वराला स्मरून केल्या असतील तरच त्या चविष्ट ठरतील असे माझे प्रांजळ मत आहे. रेसिपी पाठवणारीला माहीत असो वा नसो, ती सेवन करणारा कृतार्थपणे ‘अन्नदाता तथा पाककर्ता, पाकभोक्ताही सुखी भव’ असाच तृप्तीचा ढेंकर देत असतो.
पटतंय् का हे ?
रहाळकर
२७ मे २०२४
Sunday, May 26, 2024
Asynclitism !
एसिन्क्लिटिझम् - Asynclitism !
आमच्या वैद्यकीय क्षेत्रात कधीकधी अक्षरश: चक्रावून टाकणारे अनुभव येत असले तरी मानवी बुध्दिमत्ता त्यांची कारण-मीमांसा करण्याचे नेहमीच भान ठेवत असते. शास्त्रीय दृष्टिकोनातून तसे करणे केव्हाही स्वागतार्हच असते, नव्हे असायलाच पाहिजे. तथापि कधीकधी असे अनाकलनीय प्रसंग येतात जेथे माणसाच्या बुध्दीला मर्यादा येतात. मी प्रत्यक्ष असे काही दुर्धर आजार जवळून पाहिले आहेत जे वैद्यकीय दृष्ट्या ‘होपलेस’ होते मात्र कोणत्या तरी शक्तीच्या बळावर ते पूर्णपणे व्याधिमुक्त झालेले देखील पाहण्याचे माझ्या प्राक्तनांत लिहिले असावे. मलाच माझा हेवा वाटतो कधीकधी की ‘व्हाय मी ?’ याच देहीं याच डोळां ते पाहण्याचे भाग्य मला कसे काय लाभले !
मंडळी, आत्तांपर्यंत केवळ स्वगत करीत होतो मी पण ते तुमचेपर्यंत पोहोचलेच ! वर लिहिलेला अतिशय क्लिष्ट शब्द वास्तविक उच्चारायला देखील कठीण आहे हे खरे असले तरी मी आणि माझा बॅच पार्टनर प्रकाश बजाज याने अवघ्या तीन तासांत त्याचे ‘प्रेझेन्टेशन’ प्राघ्यापक नि इतर सर्व बॅचमेट्स समक्ष केले होते आम्ही मेडिकलच्या पाचव्या वर्षात शिकत असताना.
आम्हा दोघांची नाईट ड्यूटी गायनिक डिपार्टमेण्ट मध्ये लागली होती आणि पहांटे तीनचे सुमारास एक ‘अडलेली’ स्त्री दाखल झाली. हाऊसमन नि रजिस्ट्रारने तिला तपासून बहुधा ‘सिझेरियन’ करावे लागेल म्हणून कन्सल्टंटला पाचारण केले. स्वत: प्राध्यापक डॉ. जंगालवाला पंधरा मिनिटांत पोहोचले आणि आम्ही सर्व ‘थिएटर’ मधे शिरलो. सरांनी रूग्णाला तपासले आणि ‘फोरसेप्स’चा निर्णय घेतला. मोठा फोरसेप्स किंवा चिमट्याने बाळाचे डोके अलगत फिरवून क्षणार्धात बाळाची सुखरूप डिलिव्हरी झाली. परत निघता निघतां प्राध्यापकांनी आम्हाला ‘एसिन्क्लिटिझम्’ यावर सकाळी नऊ वाजतां संपूर्ण बॅच समोर सादरीकरण करण्याची आज्ञा केली. आम्ही दोघांनी तातडीने पूर्ण तयारी केली आणि झकास सादरीकरण केले. बाळाच्या कवटीची देखील निसर्गाने अशी काही रचना केली आहे की तिचीही लांबी-रूंदी-उंची मातेच्या ‘पेल्व्हिक बोन्सशी’ अर्थात प्रसूतीमार्गाशी चपखल जुळणारी असते, प्रत्येक कवटीचा ठराविक ॲंगल् असतो आणि लवचिकपण देखील. प्रेझेंटेशन पाहून सर खूप खुश झाले हे वेगळे सांगणे नको.
मात्र या अनुभवाचा प्रत्यक्ष उपयोग पुढे कितीतरी वर्षांनी झाला. माझा मुलगा तीनचार वर्षाचा असताना खेळतांना गॅलरीतल्या दोन खांबांमघे त्याने डोके घातले आणि काही केल्या ते मागे घेता येईना. सर्वांची धावपळ सुरू झाली नि तो तर रडून रडून पूर्ण थकलेला. मला अचानक ‘एसिन्क्लिटिझम्’ आठवले. मी अलगद त्याचे डोके किंचित वाकडे करून ते मागे ओढले आणि एका जीवघेण्या प्रसंगातून सर्वजण बाहेर पडलो !
मला वाटतं प्रत्यक्ष ज्ञानापेक्षाही त्याच्या पलीकडचा इन्ट्यूशन किंवा आतला आवाज अधिक प्रभावी ठरत असावा आणि तसा अनुभव आपण सर्वच वरचेवर घेत असतो.
Intuition म्हणजे नक्की काय हे कदाचित मनोवैज्ञानिक किंवा अधिक जाणकार विस्ताराने सांगू शकतील. मात्र मला वाटते ते असे की प्रत्येकातील आत्माराम आपल्याला क्षणोक्षणी हिंट्स देत असतो जिकडे आपण बरेच वेळा दुर्लक्ष करत राहतो.
रहाळकर
२६ मे २०२४