Thursday, October 20, 2022

 

अष्टावक्र गीतासार !

 अष्टावक्र गीतासार

परवां माझे धाकट्या बंधूंनी अचानक प्रश्न केला की तुला अष्टावक्र गीतेबद्दल काय माहिती आहे. मी अचंभित झालो कारण परवांच पहाटे मला अष्टावक्र मुनींचे लहानपणीकल्याणमासिकात पाहिलेले चित्र आठवले होते. हा एक विलक्षण योगायोग मानून मी लगोलग नेर्लेकर बुक डेपोकडे कूच केले नि हातीं लागले ते पुस्तक घेऊन घरी आलो. त्याच दिवशी संध्याकाळी हेही समजले की श्रीश्री रविशंकर महाराजांनी याचे छान विवेचन केले आहे. पुढेमागे ते हाती आलेच तर त्याचाही परामर्ष नक्कीच घेईन, तथापि आज तरी मला कळले तेवढे सांगून मोकळा होईन म्हणतो


अष्टावक्र यांनामुनीअसं संबोधले जाते, म्हणून आधी ऋषी आणि मुनी यांतील पाठभेद समजून घेणे हितावह ठरेल. वसिष्ठ, विश्वामित्र किंवा इतर सर्व सप्तर्षी वगैरे ऋषी या कॅटेगरींतले, तर वेदव्यास नारद तुंबर शुक वगैरे मंडळींना  मुनी म्हटले जाते. मुळांत ऋषी म्हणजे सिद्धावस्स्था प्राप्त होण्यासाठी कठोर तपाचरण करणारे तीव्र संवेगी साधक, ज्यांचे षडविकार अद्याप पूर्णत: संपलेले नाहीत, तरमुनीम्हणजे आत्मज्ञान प्राप्त झालेले सिध्द म्हणून नावलौकिक मिळवलेले ! भूल चूक लेनी देनी ! ! 

असो.

मुळांत अष्टावक्र मुनींचा उपदेश जनक राजासाठी होता, जे आत्मज्ञान किंवा आत्मबोध होण्यासाठी अतिशय उत्कंठित अवस्थेंत लीन झालेले होते


आध्यात्मिक क्षेत्रांत तीन निष्ठा महत्त्वाच्या असतात - कर्म, ज्ञान आणि भक्ती, तर एक पाश्चात्य मनोवैज्ञानिक नि गहन तर्कशास्त्री कार्ल यंग मनुष्याची दोन प्रकारांत विभागणी करतो - एक बहिर्मुख नि दुसरे अंतर्मुख. बहिर्मुख लोक कर्म नि भक्तीचा सहसा आश्रय घेतात आणि अंतर्मुख मंडळी बहुधा ध्यान धारणा आणि ज्ञान प्राप्तीसाठी अनुकूल असतात. बहिर्मुख व्यक्तीला ज्ञानमार्ग सहजगत्या उमगत नाही तर सहसा बुध्दिवान आणि चैतन्य तत्वाचा परिचय असणारे ज्ञानमार्गाची कास धरतात. कदाचित म्हणूनच सामान्य माणसांच्या जीवनांत अष्टावक्र मुनींचे तत्वज्ञान आणि उपदेश फारसा प्रचलित झालाच नाही

अष्टावक्र मुनींच्या तत्वज्ञानांत कोणत्याही बाह्य उपचारांची वा सोपस्कारांची आवश्यकता नाही, तर अक्रिय राहून केवळ आत्मबोध म्हणजेच आपण शरीर, मन, बुध्दी अहंकार नसून आपण निव्वळ चैतन्यरूप आत्मतत्व आहोत ही जाण जाणीव निरंतर प्रस्फुटित राहते

भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद् गीतेंत ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा समन्वय असला तरी मुख्य भर अर्जुनाला युध्दप्रवण म्हणजेचकर्मावर झुकते माप देणारा आहे. खरेतर भगवंताचा उपदेश सर्वसामान्य प्रापंचिकां साठी आहे पण अष्टावक्रांचा उपदेश केवळ मोक्षप्राप्तीच्या मुमुक्षूंसाठी आहे. कदाचित म्हणून सर्वसामान्य माणूस  तिकडे ओढला जात नाही, निव्वळ ज्ञानप्राप्तीची  (आत्मज्ञान) उत्कंठा असणाऱ्यांसाठी अष्टावक्र मुनींचा उपदेश अभिप्रेत आहे. श्रीकृष्णाप्रमाणे ते अनेक मार्गांचे विवेचन करत नाहीत तर केवळबोध’ (आत्मबोध) जो अद्वितीय, भावातीत, देश-कालातीत आहे, जो कोणत्याही दृष्टांतांशिवाय तर्कवितर्काच्या पलीकडचा सूत्रबध्द असा अविष्कार आहे. तो निव्वळ ऐकण्या-बोलण्याचा विषय नसून आत्मसात करण्यासाठी आहे हे विसरता कामा नये


प्रखर वैराग्य अंगीं बाणविणे ही या मार्गाची पहिली पायरी आहे ! वैराग्य, अहंकार-शून्यता हीच ज्ञानप्राप्ती आणि अखेरमुक्तीची गुरूकिल्ली, अष्टावक्र गीतेचे सार  असल्याचे सर्व सूत्रें पाहिल्यावर आपसूक कळून येईल

जनक महाराजांनी  अष्टावक्र मुनींना विचारलेल्या प्रश्नांचा, शंकांचा संवाद म्हणूनजनक-अष्टावक्र-संवादस्वरूपात अष्टावक्र गीता प्रसिध्दीस आली आहे


जनक राजाला तरी आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी कोणती पात्रता होती याचा विचार केला तर अहंकार-शून्यता, संपूर्ण शरणागत भाव, देहासक्तीचा समूळ अभाव आणि सर्व बाह्योपचारांचा त्याग हीच त्यांच्यापात्रतेची गमक म्हणायला हवीत

महर्षी पातंजलींनी चित्तवृत्तींचा निरोध म्हणजेच योग असे सूत्र सांगितले, म्हणजेच निर्विकार असणे, साक्षीभाव जोपासणे असले तरी त्यांत यम-नियमादि सोपस्कार वा विधी नाहीत. खरेतर कोणत्याहीक्रियांची बंधनेच अधिक छळत राहतात, त्यांत फलाशा आलीच, अपेक्षा नि प्रतिक्रिया तर जणू हातात हात घालून आलेल्या ! इतकेच नव्हे तर अष्टावक्र मुनीसमाधीला सुध्दा मुक्तीला बाधा आणणारी असे मानतात ! कारण त्यांचा उपदेशजागरणाचा आहे, आपल्या स्व-स्वरूपाबद्दल जागरूक राहण्याचा ! ! त्या आत्मचैतन्याचाबोधहोणे हीच मुळांत मुक्ती होय. विषयांची आसक्ती विषाप्रमाणे त्याज्य झाली कीमोक्षहाताशी आला असे मानायला हरकत नाही

इति शम् ! ! 

रहाळकर

३० ऑक्टोबर २०२२


Tuesday, October 11, 2022

 

सेवेच्या संधी

 सेवेच्या संधी

खूप वर्षांपूर्वी शाळेत असतानाचे शाळेचे ब्रीदवाक्य सहज आठवले, “नॉट फेल्युअर, बट् लो एम् इज क्राईम” (अपयशी होणे हा गुन्हा नाही, पण नगण्य ध्येय बाळगणे हा गुन्हा ठरतो” ! 

आज अचानक ते ब्रीद वाक्य मनातून का जात नाही नकळे पण त्यावर उतारा म्हणून कॉलेजचे ब्रीद आठवले - ‘सर्व्हिस बिफोर सेल्फआणि म्हणून यां वरच थोडे चिंतन करावेसे वाटले. तसं पाहिलं तर या वाक्यांचा अर्थ खूप गहन आहे पण त्यांनाही जरा सुगम करून पाहीन म्हणतो

शाळेतल्या बालवयापासून आपण खरोखर काही उत्तुंग ध्येयें बाळगली होती का, हा विचारच मुळांत बेचैन करणारा आहे. खरंच त्या वयातउत्तुंगअशी ध्येयें कधीच नव्हती. गेला बाजार शिवछत्रपतींच्या गोष्टी ऐकताना फारतर आपणही त्यांतला एखादा मावळा असावे असे वाटले असेल कदाचित्, मात्र आपणच बाजीप्रभू, नरवीर तानाजी किंवा प्रत्यक्ष महाराजच असावेसे कधी वाटल्याचे स्मरत नाही ! अर्थात्मावळाअसणे हे खचितच नगण्य ध्येय म्हणणे हाच मुळात गंभीर गुन्हा ठरू शकतो म्हणा ! ! 


सर्व्हिस बिफोर सेल्फया शब्दांचा भलताच अर्थ मनांत धरून होतो मी आत्तांपर्यंत. मात्र अधिक विचारांतीं तोच अर्थ अभिप्रेत आहे असा जावईशोध मला आत्तांतरी भावतोय्

वास्तविकसर्व्हिसम्हणजे निव्वळ सेवा असून चाकरी, गुलामगिरी, एखादे कार्य वा कार्यप्रणाली - प्रोव्हीजन्सवगैरे अर्थ दुय्यम आहेत असे माझे मत आहे. आज तरी तुम्हालासेवायाच अर्थावर ऐकायचे आहे मज पामरा कडून


लहानपणापासून नंतर कित्येक वर्षें सेवाभाव असा केवळ मनांत दडून असावा, प्रत्यक्ष आचरण कितपत झाले असेल ते स्मरत नाही. तथापि वयाच्या पस्तीशी नंतर एका महान सेवा-संघटनेंत काम करू लागल्यापासून सेवा या शब्दाची व्याप्ती आणि आवाका हळूहळू ध्यानांत येवू लागला - अर्थात पूर्णत: अजूनही उमगलेला नाही

सेवा नि नि:स्वार्थ सेवा यांत तसे पाहिले तर मदहंतर आहे, कारण सेवा करता करतां अहंकार शनै:शनै: कमी कमी होत गेला की तीच सेवा नि:स्वार्थ होत जाते…… जरा कठीण होतंय् का पचायला ? तर ते असू देत, आधीसेवेबद्दलचबोलूं काही

तसं पाहिलं तर आपल्या देशांत सेवेच्या संधी अमाप आहेत हे लंडनला असताना श्रीशच्या एका स्नेह्याकडून ऐकले होते. तो स्नेही नि त्याचे सवंगडी सेवा, अर्थात समाजसेवा करण्यासाठी आसुसलेले, उतावीळ असत . मात्र बऱ्याच पाश्चात्य देशांत तशा संधी शोधाव्या लागतात, त्यांची आंखणी नि कारवाई पूर्व परवानगीविना करणे अशक्य असते. त्याच स्नेह्याच्या शब्दात सांगायचे तर भारतात आपण नुसती मान वळवली तरी असंख्य संधी समोर वाढून ठेवलेल्या दिसतील ! (अर्थात त्यासाठी मान वळवून डोळे उघडे ठेवणे अत्त्यावश्यक ठरते ! ! ) 

ते असो.

मी मघा म्हटलेल्या सेवा-संघटनेने माझे डोळे बऱ्या प्रमाणात उघडायला मदत केली नि नंतर जवळजवळ चाळीस वर्षे अनेक प्रकारच्या सेवा कार्यांत मला नि माझ्या कुटुंबाला प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे भाग्य लाभले. त्यापैकी काहींचा मी केवळ नामनिर्देश करीन म्हणतो, त्याबद्दल सविस्तर ऐकायची तुमची इच्छा झालीच तर मला केव्हाही, कुठेही निमंत्रण द्या, मी अगत्त्याने येईनच येईन ! ! पुन्हा असो

तर मी सांगत होतो विविध सेवा-संधींबद्दल. त्याचं असंय् की त्यांची सुरूवात आपल्या स्वत:पासून व्हायला हवी. इतरांना त्रास होणार नाही असे वागणे जर आपल्याला जमले तर तीच केवढी मोठी समाजसेवा होईल नाही ? म्हटलंच आहे, ‘हेल्प एव्हर, हर्ट नेव्हर’ (जमेल तितकी मदत करा, निदान कुणाला दुखवूं नका ! ) 

दुसरे असे की शक्यतो आपली कामें आपणच करा, जे आपले आईवडील आपल्याला कायम सांगत आलेत

तिसरे, गरजूंच्या गरजा ओळखायला शिका. गरजवंतांच्या जागी स्वत:ला पाहिले तर त्या गरजांचं महत्व आपोआप कळून येईल. गरज नसलेल्याला काही उचलून देणे म्हणजे सेवा नव्हे - दान तर नव्हेच नव्हे

आपल्या परंपरेंत अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान यां बरोबरच जबरदस्त करूणा - कंपॅशन - ला अनन्यसाधारण महत्व आहे. कुणालाच कमी लेखूं नये, हीन मानूं नये, तिरस्कार तर अजिबात नसावा


थांबा, मला प्रवचन झोडायचे नाहीये निदान आज तरी. म्हणून पुन्हा विषयाकडे येतो. मी सांगत होतो सेवेच्या संधींविषयीं. मात्र त्याआधी आम्हाला ज्या संधी मिळत गेल्या त्यांचे विषयीं जरासे

हल्ली अनेकानेक अनाथ पंगु आश्रम किंवा वृद्धाश्रम प्रकट होत आहेत. त्यांतील अनेक सुस्थितीत असणे शक्य आहे. मात्र कित्येक अपेक्षेनुरूप नसतीलही. अशा वद्ध मंडळींना वरचेवर भेट दिल्याने कित्येकांची सेवा आपसूक घडू शकते. त्यांना कुणीतरी बोलायला, ऐकायला हवा असतो हो ! विनामूल्य होऊ शकते अशी सेवा - देणारा नि घेणारा दोघेही कृतकृत्य ! ! अक्षय लाभ का व्यापार है यह


आम्हीससूनसारख्या सरकारी इस्पितळात रूग्णांना भेटण्याचे वेळेत गटागटाने जात असूं नि तिथल्या एकाकी, उदास रूग्णांशी वार्तालाप करून त्यांच्या चित्तवृत्ती उल्हसित करायचा प्रयास करत असू, क्वचित त्यांचे गांवी पोस्टकार्ड लिहून रूग्णांची खुशाली कळवीत असू, गरजूंना रक्तदाना मार्फत रक्ताची सोय करत असूं, तर रूग्णाच्या नातेवाईकांसाठी फूड पॅकेट्सची व्यवस्था करत असूं ! खूप खूप समाघान मिळत असे अशा सेवेतून

खेडोपाडीं आरोग्य सुविधा, नि त्याही मोफत, पुरवण्यांत आम्ही धन्यता मानत असूं. मात्र त्याच बरोबर प्रतिबंधात्मक उपाय रूजवण्यवर आमचा भर असे


सरतेशेवटीं या निमित्त मला एक सत्य अधोरेखित करायचे आहे. आपली परंपरा, संस्कृती वगैरे खरोखरच जतन करायची असेल तर ती व्याख्यानें, प्रवचने वा सर्कारी कार्यक्रमांनी साधणार नाहीत तर केवळ आपल्या प्रत्येकांतीलसेवाभावजोपासून त्याचे क्रियान्वयन होणे आत्यंतिक गरजेचे आहे. अजून बरेच काही सांगायचे राहून गेले आहे पण ते पुन्हा प्रवचनाकडे घसरूं नये म्हणून तूर्तास थांबतो

रहाळकर

११ ऑक्टोबर २०२२



This page is powered by Blogger. Isn't yours?