Monday, March 02, 2026
पुनश्च श्रीगणेशा…..!
पुनश्च श्रीगणेशा…..!
जीवन-नाट्याचा चौथा अंक सुरू होत असताना या खुळ्याला पुन्हा श्रीगणेशाय नम: म्हणत पहिलीत जाऊन बसावेसे का वाटले असावे हा तुमच्या मनातला प्रश्न आधी मलाच पडला बरे का ! काल ‘संतांची गणेशवंदना’ हा विषय मांडल्यानंतर त्यांनी केलेली मंगलाचरणें झरझरा पुढ्यात येत गेली आणि प्रकर्षाने जाणवले की नेमके तिकडेच खूप दुर्लक्ष केलेय् मी. ती नित्य वाचनात आली असली तरी त्यांवर फारसे चिंतन मनन निदिध्यासन आणि मंथनही करावेसे कधी वाटलेच नव्हते. मात्र कालच्या अभ्यासानंतर राहून गेलेले ते काम हातीं घ्यायलाच पाहिजे असा आतून हुंकार आला, सबब आघी ही प्रस्तावना ! असो.
चिंतन, मनन, निदिध्यासन वगैरे नंतर, आघी तीं विविध मंगलाचरणे तरी नजरेखालून घालूंया ! सर्वप्रथम घरात असलेले जितके ग्रंथ शोधतां येतील त्यांवरची साचलेली धूळ झटकल्यानंतर काय काय उपलब्ध आहेत हे पाहताना मी चक्क खुळावलो की राव ! प्रथम हातात आला तो अण्णांनी वाचून वाचून जर्जर करून टाकलेले तुलसीकृत रामचरित मानस ! मग लगोलग श्रीमद् भागवतम्, संत दासगणू विरचित गजानन विजय, साई सत् चरित, मार्तंड-महिमा, कित्येक संतचरित्रें, डझनावरी छापील स्तोत्रांची पुस्तकें आणि बरेचसे अवांतर ग्रंथ देखील. जमेल तसा एकेकांचा परामर्ष घेईनच मात्र एक मात्र खरे की आता पुढची काही वर्षें तरी ‘आज काय करू’ हा विचारही मनात येणार नाही ! पुन्हा असोच ! !
मंडळी, एक महत्वाची बाब म्हणजे जवळजवळ सर्व संतांनी ‘मंगलाचरण’ लिहिताना केवळ श्रीगजाननालाच वंदन केले असे नसून देवी सरस्वती, सद्गुरू, माता-पिता, श्रोते, सुहृद आणि दुर्जनांनाही वंदन केलेले लक्षात येईल. म्हणून ‘मंगलाचरण’ हे सर्व-समावेशक असे स्तवन आहे.
आज साहाजिकच माझ्या तीर्थरूपांना अतिशय प्रिय असलेल्या ‘मानस’ मघील मंगलाचरण पाहूं. प्रथम संस्कृत श्लोक आणि लगेच त्यांचा हिंदीतून भावार्थ दिला असला तरी निव्वळ तुमच्या सोयीसाठी त्याच हिंदीचे मराठीकरण करण्याचा आटापिटा करीन म्हणतो.
१) ‘वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि ।
मंगलानां च कर्त्तारौ वन्दे वाणीविनायकौ ॥’
( अक्षरों, अर्थसमूहों, रसों, छन्दों और मंगलोंकी करनेवाली सरस्वतीजी और गणेशजीकी मैं वन्दना करता हूँ ॥१॥ - अर्थात् अक्षरें, वाक्यें, भाव-भावना (नव-रस) , छंद आणि जे जे मंगलकारक त्यांची निर्मिती करणारी वागेश्वरी देवी सरस्वती शारदा आणि श्री गजाननाला मी वंदन करतो.
२) ‘भवानीशंकरौ वन्दे श्रद्धाविश्वासरूपिणौ ।
याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा: स्वान्त: स्थमीश्वरम् ॥२॥’
(श्रद्धा और विश्वासके स्वरूप श्रीपार्वतीजी और श्रीशंकरजीकी मैं वन्दना करता हूँ , जिनके बिना सिद्धजन अपने अंत:करणमें स्थित ईश्वरको नहीं देख सकते) अर्थात्- श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या भवानी पार्वती आणि श्रीशिव शंभूंना मी वन्दन करतो ज्यांच्या कृपेविना सिद्ध मंडळी अंतस्थ ईश्वराचे दर्शन घेऊ शकत नाहीत.
३) ‘वन्दे बोघमयं नित्यं गुरूं शंकररूपिणम् ।
यमाश्रितो हि वक्रोsपि चन्द्र: सर्वत्र वन्द्यते ॥३॥’
(ज्ञानमय, नित्य, शंकररूपी गुरूकी मैं वन्दना करता हूँ , जिनके आश्रित होनेसे हि टेढा चन्द्रमा भी सर्वत्र वन्दित होता है ! म्हणजे ज्ञानमय, शाश्वत असलेल्या शंकररूपी गुरूंना मी वन्दन करतो ज्यांच्या आश्रयामुळेच निलाजरा चंद्र देखील वंदनीय ठरतो !
४) ‘सीतारामगुणग्रामपुण्यारण्यविहारिणौ. ।
वन्दे विशुद्धविज्ञानौ कवीश्वरकपीश्वरौ. ॥४॥’
( श्रीसीतारामजीके गुणसमूहरूपी पवित्र वनमें विहार करनेवाले, विशुद्ध विज्ञानसम्पन्न कवीश्वर श्रीवाल्मिकीजी और कपीश्वर श्रीहनुमानजी की मैं वन्दना करता हूँ . अर्थात्, श्रीसीतारामचंद्रांच्या गुणसमुच्चयरूपी वनांत विहार करणाऱ्या आणि विशुद्ध ज्ञान-विज्ञान पारंगत अशा कविश्रेष्ठ महर्षी वाल्मिकी तसेच कपिश्रेष्ठ अशा हनुमंतांना मी वन्दन करतो !
५). ‘उद्भवस्थितिसंहारकारिणीं क्लेषहारिणीम् ।
सर्वश्रेयस्करीं सीतां नतोsहं रामवल्लभाम् ॥५॥’
(उत्पत्ती, स्थिती और संहार करनेवाली, क्लेषोंको हरनेवाली तथा सम्पूर्ण कल्याणोंकी करनेवाली स्रीरामचन्द्रजीकी प्रियतमा श्रीसीताजीको मैं नमस्कार करता हूँ. (सोप्पं आहे हे) ! !
६). ‘यन्मायावशवर्त्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा
यत्सत्वादमृषैव भाति सकलं रजौ यथाहेर्भ्रम: ।
यत्पादप्लवमेकमेव हि भवाम्भोधेस्थितिर्षावयतां
वन्देsहं तमशेषकारणपरं रामाख्यामीशं हरिम्. ॥६॥’
( जिनकी माया के वशीभूत सम्पूर्ण विश्व, ब्रह्मादि देवता और असुर हैं, जिनकी सत्तासे रस्सीमे सर्प के भ्रम की भ्रान्ति यह सारा दृश्य-जगत सत्य ही प्रतीत होता है और जिनके केवल चरण ही भवसागरसे तरनेकी इच्छा करनेवालोंके लिये एकमात्र नौका है, उन समस्त कारणों से पर (सब कारणोंके कारण और सबसे श्रेष्ठ) ‘राम’ कहानेवाले भगवान हरि को मैं वन्दना करता हूँ ! अर्थात्- ज्या मायेच्या अधिपत्त्याखाली संपूर्ण विश्व, ब्रह्मादि देवता आणि असुरही आहेत, ज्यांच्या सत्त्तेमुळे दोरीच्या ऐवजी सर्प असल्याचा भ्रम निर्माण होतो आणि हे सर्व दृष्य जग खरे वाटते आणि ज्याचे केवळ चरण देखील हा भवसागर तरून जाण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी एकमेव नौका असते, या सर्व कारणांनी ‘कारणांचे कारण’ आणि सर्वश्रेष्ठ असलेले ‘प्रभु राम’ म्हटले जाणारे परमेश्वर हरि यांना मी नमस्कार करतो.
७). ‘नानापुराणानिगमागमसम्पतं यद्
रामायणे निगदितं क्वचिदन्यतोsपी ।
स्वान्त: सुखाय तुलसी रघुनाथगाथा-
भाशानिबन्धमतिमंजुलमातनोति. ॥७॥’
( अनेक पुराण, वेद और (तन्त्र ) शास्त्रसे सम्मत तथा जो रामायणमे वर्णित है और कुछ अन्यत्रसे भी उपलब्ध श्रीरघुनाथजीकी कथा को तुलसीदास अपने अंत:करणके सुख के लिये अत्यंत मनोहर भाषारचनामे विस्तृत करता है !
अर्थात् - कित्येक पुराणे, वेद आणि तंत्रशास्त्र-संमत आणि जे रामायणांत वर्णिलेले आहे आणि इतरही काही उपलब्ध स्त्रोतांतून मिळालेल्या श्रीरामचन्द्रांच्या कथा हा तुलसीदास निव्वळ आपल्य स्वानंदासाठी विस्ताराने सांगत आहे - “स्वान्त: सुखाय तुलसी श्री रघुनाथ गाथा” !
इति शम्.
रहाळकर
२ मार्च २०२६ होळी पौर्णिमा.