Tuesday, July 01, 2025
आषाढस्य प्रथम दिवसे !
आषाढस्य प्रथम दिवसे……!
परवांच मधुरा वेलणकर आणि समीरा यांची महाकवी कालिदासांवरील एक सुंदर व्हिडिओ क्लिप पाहिली आणि ऐकली नि तेव्हापासून आषाढस्य प्रथम दिवसे हे शब्द पुन्हा पुन्हा कानीं पडत राहिले. मात्र आज जुन्या कविता चाळत असताना मंगेश पाडगावकरांची ही कविता वाचण्यांत आली. वाटलं की तुम्हालाही त्या काव्यानंदांत सहभागी करून घ्यावे !
नंतर मला असं जाणवलं की संपूर्ण कविता नजरेखालून घातल्याशिवाय कवितेचा आशय नीट कळणार नाही कदाचित् , सबब आधी ती कविता……
“कसे काय अन् कोठे चुकले ? “
‘मी शास्त्रें ही कोळुन प्यालों
असे मुखोद्गत पुराण गीता ;
ईश्वर आहे अथवा नाही
बसून करितो चर्चा आतां !
जाणतसे इतिहास जगाचा
पारायण हो विज्ञानाचे
खगोल-भूगोलादिक विद्या
माझ्या जिव्हेवरती नाचे !
तत्वज्ञानें समाजरचना
यांतही मी झालों पारंगत ;
अर्थशास्त्र, परमार्थशास्त्र ही
यांची तर नेहमीची संगत !
‘आषाढाच्या पहिल्या दिवशी
जेव्हा आले मेघ अचानक
पागल वारा पागल धारा
खड्गापरि बिजलीची लखलख !
थेंब बिलोरी वेंचु लागली
ओणवून गवताची पातीं
मागे सारित केंस आपुले
खट्याळ छाया भिजती न्हाती !
जमून पोरें रस्त्यावरती
अंगावरती झेलित धारा
गाउं लागली धुंद अनावर
‘आला पाऊस आला वारा’ !
कुणी कोंडिली मुठीत अपुल्या
थेंबांची चमचमती दौलत
कुणी घेतली खट्याळ फिरकी
लचकत….थबकत…..झिंगत……डोलत !
मी ही पाहियले आकाशीं
पुन्हा एकदां डोळे उघडुन
ती मस्ती पण नव्हती हृदयीं
नव्हते तसले अद्भुत दर्शन.
सहस्त्र धारांची ती जादू
दिसून मज दिसली नाही
अणूअणूंतिल पागल धुंदी
कळली , पण जाणवली नाही……..!
आतां बसलो आहे शोधित
दीर्घ तपस्येंत ही जे का हुकले
हात कपाळीं लावुन बघतो
कसे काय अन् कोठे चुकले ‘ ! ! !
खरंच, मागे वळून पाहतांना असले काही वेडगळ विचार डोकावून जात असले तरी पुढे येणाऱ्या श्रावणधारांचे स्वागत करायला आपण उत्सुक असतोच की, मात्र त्या विषयीं पुढे कधीतरी !
रहाळकर
१ जुलै २०२५