Friday, February 07, 2020
ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग सत्त्यांशी
ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग सत्त्यांशी
अज्ञान-लक्षणांची यादी देत आहेत श्री ज्ञानेश्वर महाराज !
‘तरी देह हाचि आत्मा । ऐसेया जो मनोधर्मा । वळघोनियां (समजून) कर्मा । आरंभु करी ॥
‘आणि उणें कां पुरें । जे जे कांही आचरे । तयाचेनि अविष्कारें । कुंथों लागे (फुशारक्या मारतो) ॥
उणेपुरे जे काही कर्म त्याचे हातून घडते त्या बद्दल स्वत:चीच वाहवा करतो. पछाडलेल्या माणसांसारखे उन्मत्तपणे वागतो. माझ्यासारखा कोणी श्रीमंत नाही, बुध्दिमंत नाही आणि मीच एकटा सर्वज्ञ आहे अशी बढाई मारतो.
इतरांचे भलें झालेले त्याला पाहवत नाही. नवज्वराने आजारी असलेल्या माणसाला जसे दूध देखील विषारी ठरते, किंवा सर्पाला दूध पाजले तरी त्याचे विषच बनते -
‘तैसा सदगुणीं मत्सरू । व्युत्पत्ती (ज्ञानाचा) अहंकारू । तपोज्ञानें अपारू । ताठा चढे ॥
‘किंबहुना तयापाशीं । अज्ञान आहे वाढिसीं (वाढते) । हे निकरें (निश्चयाने) गा तुजसी । सांगत असों ॥
‘आणिकही धनंजया । जो गृहदेह सामुग्रिया । न देखे कालचेया (मागील पुढील । जन्मातें ॥
‘कृतघ्ना उपकारू केला । कां चोरा व्यवहारू दिधला । निसुगु (निर्लज्ज) स्तविला । विसरे जैसा ॥
बेडूक सापाच्या तोंडांत असला तरी जवळून उडणारी माशी धरू पाहतो तसा ऐन म्हातारपणी, सर्व गात्रें गलित झालेली असूनही त्याला मृत्यू येणारच याची बित्तंबातमी नसते !
गळाला लावलेले आमिष धरण्यासाठी मासा जसा फसतो किंवा दिव्याच्या झगमगाटाकडे पाहून पतंग त्यावर झेंपावतो,
‘तैसा जीविताचेनि मिषें । हा मृत्यूचि आला असे । हें नेणेंचि राजसें । सुखें जो गा ॥ (तसा जीविताच्या निमित्ताने पुढ्यात आलेला मृत्यू तो राजस सुखांत निमग्न असलेला माणूस जाणत नाही )
‘किंबहुना पांडवा । हा आंगींचा (शरीरावर) मृत्यू नित्य नवा । न देखे जो मावा (भुलीने) । विषयांचिया ॥
‘तो अज्ञानदेशींचा रावो (राजा) । या बोला महाबाहो (अर्जुना) । न पडे गा ठावो । आणिकांचा ॥
(या पुढे वार्धक्याच्या खुणा खूप विस्ताराने सांगतात श्री ज्ञानदेव. अगदी तसेच वर्णन श्री समर्थांनी आपल्या दासबोध ग्रंथात केलेले आढळेल. )
‘न जावे तेथ जाये । न पाहावें ते जो पाहे । न खावें ते खाये । तेवींचि तोषे ॥ !
‘न धरावा तो संगु । न लागावे तेथ लागु (संबंध) । नाचरावा (टाळावा) तो मार्गु । आचरे जो ॥
‘नायकावे (न ऐकावे) तें आइकें । न बोलावे ते बके । परि दोष होतील हे न देखे । प्रवर्ततां (आचरताना) ॥
पुढे विविध देवी-देवतांच्या मागे लागणाऱ्या अज्ञानी माणसांचे वर्क्षन येते तें मुळांत वाचण्यासारखे आहे . एक झलक -
श्री ज्ञानदेव पुढची उपमा कशी देतात ते पहा !
नातरी कांताच्या मानसीं । रिगोनि स्वैरिणी जैसी । राहाटें जारेसी । जावयालागीं ॥ (व्यभिचारिणी स्त्री जशी पर पुरूषाकडे जाण्यासाठी आपल्या नवऱ्याचा विश्वास टिकून राहावा म्हणून वरवरची सालस वर्तणुक दाखवते)
‘तैसी मातें किरीटी । भजती गा पाउटी (पध्दत) । करूनि जो दिठी (दृष्टी) । विषोसूये ॥ (त्याप्रमाणे माझ्या भजनाचे मिषाने ज्याची नजर विषयभोगाकडेच लागलेली असते )
आणि माझी भक्ती करूनही जर अपेक्षित विषयभोग प्राप्त झाले नाहीत तर हे सगळे थोतांड आहे असे म्हणत तो भक्तीच सोडून देतो !
एखाद्या अडाणी माणसाप्रमाणे तो निरनिराळ्या देवीदेवतांची पूजा करतो. एखाद्या पंथाचा थाटमाट दिसला की तिथे जाऊन तो चक्क तिथला गुरूमंत्र घेऊन मोकळा होतो. सर्व प्राणीमात्रांशी क्रूरपणे वागतो. पाषाणालाही देव मानतो, देवाची प्रतिमा तयार करून तिला घराच्या कोनाड्यांत उभी करतो आणि स्वत: तीर्थयात्रेला निघून जातो. कुठल्याच देवीदेवतांची तो एकनिष्ठ भावाने भक्ती करत नाही.
घरांत माझी प्रतिष्ठापना केली असूनही इतर देवतांची व्रतवैकल्यें करीत सुटतो.
एकादशीला जशी माझी पूजा बांधतो तशी नागपंचमीला नागाची ! चतूर्थीला गणपतींचे आराधन करतो नि चतुर्दशीच्या दिवशीं दुर्गेला म्हणतो ‘मी तुझाच गो माये’ ! नित्यनैमित्तिक कर्मे सोडून नवचंडी यागाला बसतो नि रविवारीं भैरोबाला नेवैद्य करतो !
अवघ्या गावांत वेश्यावृत्ती करणारी बाई जशी अखंड सौभाग्यवती असते तसा हा ‘भजनशीळ’ भक्ती करीत राहतो !
‘ऐसेनि जो भक्तु । देखसी सैरा धांवतु । जाण अज्ञानाचा मूर्तू । अवतार तो ॥
‘उपनिषदांकडे न वचे (पाहात नाही) । योगशास्त्र न रूचे । अध्यात्मज्ञानीं जयाचें । मनचि नाही ॥
अशा पुरूषाची बुध्दी आत्मचर्चेंत रस न घेतां कुठल्यातरी निष्फळ शास्त्राकडे धांव घेते. तो कर्मकांडांतच रमतो, अठराही पुराणें त्याला मुखोद्गत असतात, ज्योतिष , वास्तुशास्त्र नि कामशास्त्रांतही तो प्रवीण असतो. इतकेच नव्हे तर अख्खा महाभारत ग्रंथ त्याला माहीत आहे नि सर्व वेदही तो जाणतो. पाककला, नृत्यनाट्य, वैद्यक, नीतिशास्त्र, व्याकरण, तर्कशास्त्र वगैरेंवर त्याचे प्रभुत्व आहे.
मात्र अध्यात्मज्ञानाबद्दल तो अगदीच अनभिज्ञ आहे, जन्मत:च आंधळा असल्यासारखा ! इतर सर्व शास्त्रांत पारंगत असूनही अध्यात्मज्ञान नसेल तर जळोत ती सर्व शास्त्रें मूळ नक्षत्रांत जन्मलेला आईबापांचा मरण ओढवून घेतो तशी, असे श्री ज्ञानदेव म्हणतात !
‘मोराआंगीं अशेषें । पिसें असती डोळसें । परी एकली दृष्टी नसे । तैसें तें गा ॥ (मोराच्या पिसाऱ्यावर अनेक डोळे दिसतात ; मात्र एकातही दृष्टी नसते - त्या प्रमाणें अध्यात्मज्ञानावाचून इतर सर्व शास्त्रें दिखाऊ असतात)
या नंतर श्री ज्ञानदेव “ज्ञेय”, म्हणजे जे जाणून घ्यायचे, त्या परब्रह्मा बद्दल निरूपण करतील. अवधान दीजे जी !
क्रमश:.....